' आठवण '
क्षितिजावर अस्ताला,
तो जातो, अन् ती येते
हुरहुरत्या सांजेला, धुंद
मोगऱ्यासारखी दरवळते
आठवण तुझी अशी,
अगदी हळुवार येते..
आणि येतां जातां डोळ्यांत,
मागे पाणी ठेऊन जाते . …
नसूनही मग तू असतोस,
इथल्या प्रत्येक क्षणांत
अन् निसटलेले गवसतांत,
चार क्षण परत मलाच
मिळालेले ते क्षण सारे,
मुक्तपणे मी जगून घेते
हात तुझा हाती घेऊन,
स्वप्नांमधे हरवून जाते…
कधीतरी मग पहाटवारा,
प्राजक्ताशी येऊन थांबतो
गडद काळा अंधारही,
अलगतपणे सरू लागतो
आकाशातील केशरी सडा,
हलकेच काही चाहूल देतो
क्षितिजावरती त्याचा पुन्हां,
खेळ नव्याने रंगून जातो …
अन् वाट पाहण्याचा जुनाच प्रवास
परत नव्याने सुरु होतो …….