Saturday, March 18, 2023

 Women's day .. 

Womanhood साजरा करायचा दिवस 
आजवर कितीतरी विशेषणं 
तिच्या मागे लागली 
स्वावलंबी, करारी, खंबीर, धाडसी 
प्रत्येक वेळी येणारं संकट 
वेगळं होतं 
अडचणी वेगळ्या होत्या 
तरी 'ती' आणि तिची जिद्द मात्र
तेवढीच ठाम होती !
प्रवास सोपा नव्हता,
उंबरा ओलांडून शाळेत जाणारा
रस्ता मुळीच माहित नव्हता 
तरी 'त्याने' कवाडं उघडली 
हाती पाटी देऊन 
'आनंदी' हि घडवली 
आलवणात जखडलेला तिचा 
श्वास मोकळा केला 
स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार
तिला परत मिळवून दिला .. 
म्हणून तर ती आता,
नदीसारखी अवखळपणे वाहते
कधी प्राजक्ताचं 
इवलं फुल सुद्धा होते  
तिच्यातील राधा समर्पण शिकवते 
तर कधी कभिन्न पहाडासारखी 
ठाम सोबतही करते 
'त्याचे' ऋण मनात ठेवून 
अनाथांची 'सिंधू' बनते,
कधी 'प्रकाश' वाटेवर
त्याला देखणी साथ देते
आजकाल विमानात ती
'पायलट' म्हणून भेटते
मोकळ्या स्वच्छ आकाशात, 
स्वप्नांची झेप घेते... 
तिच्या अस्तित्वाचा परीघ 
ती नजाकतीनं घडवते
'तू आहेस ना ...' हे ऐकताच  
समाधानानं भरून पावते!

 कॉलेज म्हटलं कि रोज काहीतरी घडत असतं आमच्या इथे. सध्या मुलं exam preparatory leave वर आहेत त्यामुळे शांतता आहे वर्गात आणि ओघाने ऑफिस मध्ये. पण अशी शांतता फार काळ टिकत नाहीआमच्याकडे आणि तसंच झालं आज, ऑफिस सुरू होऊन तासभर झाला असेल नसेल इतक्यात सेंट्रल लायब्ररी मधून ईमेल आली की काही स्टाफकडे बरेच दिवसांपासून, वर्षांपासून लायब्ररीची पुस्तकं आहेत, तरी ती पुस्तकं लगेच परत करायला सांगावीत. मग काय,मी पाठवून दिली ती मेल पुढे, छान रेशमी शब्दांची झालर लावून.

इ मेल ला उत्तर देताना भावना शब्दांत मावल्या नाहीत कि आमच्या ऑफिस मधली मंडळी माझ्या केबिन मध्ये येऊन त्यांच्या भावना अगदी मोकळेपणाने व्यक्त करतात, सोबत 'कॉफी मागवा' असं सांगून, आजूबाजूच्या अजून चार जणांना कॉफी प्यायला निमंत्रण देतात. अशी गोलमेज परिषद अधून मधून भरत असते आमची. आज तर 'मुख्य लायब्ररीतली पुस्तकं परत केली नाहीत' अशा गंभीर स्वरूपाचा विषय होता मग काय भरपूर स्कोप होता चर्चा करायला. वालावलकर सर आपल्या गंभीर आवाजात म्हणाले, 'मॅडम मी आजवर लायब्ररी मधून पुस्तकंच घेतली नाहीयेत मागच्या पंधरा वर्षांत मग माझं नाव कसं काय आलं लिस्ट मध्ये? कोणीतरी माझ्या नावावर पुस्तकं घेतंय म्हणजे'. "अहो सर, असं कोणी तुमच्या नावावर पुस्तकं कशी घेईल, सगळं काही online आहे ना, मग आपला ID दुसरा कोणी कसं वापरू शकेल"?  मी त्यांची शंका दूर करत होते पण त्यांना काही पटेना."अहो ते ऑनलाईन आत्ता झालं, पण ती पुस्तकं तर त्या आधीपासूनच घेतलेली असणार कोणीतरी, मग कशी सापडणार आता ऑनलाईन, त्यामुळे तुम्हीच शोधा कोण माझ्या नावावर पुस्तकं घेतंय ते". इतक्यात सरदेसाई सर आले, "या मेल मध्ये लिहिलेली सर्व पुस्तकं दहा वर्षांपासून आहेत माझ्याकडे मग काय आता एवढा fine भरावा लागणार मला" ?..  त्यावर शिल्पा मॅडम मोठ्यांदा हसून म्हणाल्या, "3650 दिवसांचा fine, अहो त्या किमतीत तर चार डझन पुस्तकं येतील".. 'अहो मॅडम थांबा जरा', मी आपलं मध्ये पडत "नाही सर, fine कशाला लागेल. स्टॉक चेकिंग सुरु आहे म्हणून परत करा पुस्तकं, हवं तर re-issue करून घ्या".. आपल्या परीने सांगायचा मी प्रयत्न करत होते. या सर्व गोंधळात मधुमिता मॅडम मधेच म्हणाल्या, "अरे कविता, मै उस कॅम्पस से यहा आई पर उस कॅम्पस कि किताबे अब भी मेरे पास है, तो अब क्या करू?"... देवा , काय चाललंय हे. मी मधेच आवाज दिला, "सुरेश, कॉफी आण लवकर, स्ट्रॉंग कॉफी आण".. इतक्यात नेहा मॅडमची entry झाली. "अरे कविता मला तर शोधावी लागतील पुस्तकं, ऑफिस मध्ये तर नाहीयेत, घरी नेली होती का ते बघते.. लिस्ट मध्ये एक readers digest पण आहे, ते तर कुठं गेलं असेल आता, हरवलं असेल बहुदा, मुलांसाठी न्यायचे ग".. बापरे, 'ये किस्सा बहोत पुराना लगता है', असं मनातल्या मनात मी पुटपुटले कारण त्यांची मुलं आता मास्टर्स करायला बाहेरच्या देशात आहेत.​ ​

एकूण काय तर विद्यार्थी नाहीत म्हणून आज प्राध्यापकांनी गोंधळाची आघाडी सांभाळलेली पाहून मी, 'लायब्ररी कमिटीच्या कुलकर्णी सरांना बोलवा' असा निरोप पाठवला. या गदारोळात आपलं नाव लिस्ट मध्ये नसल्याचं भलतं सुख मी अनुभवत होते. इतक्यात कुलकर्णी सर आले आणि मागोमाग कॉफी पण आली. कॉफी पिऊन वातावरण जरा निवळलं. कुलकर्णी सरांसोबत सर्वांनी सेंट्रल लायब्ररीत जाऊन issue sort out करा या मतावर पांगापांग झाली. हुश्श ... 

इतक्यात फोन आला. आमची इकडची स्वारी तिकडच्या कॅम्पस मधून बोलत होती. "अग, तू काही पुस्तकं घेतली आहेस का सेंट्रल लायब्ररीतून".. हे ऐकताच मी चक्रावले, आता हा कुठून आला मधेच आणि तत्क्षणी माझी ट्यूब लाईट पेटली. माझ्याकडे लायब्ररीची बरीच पुस्तकं होती आणि मजा म्हणजे ती मी माझ्या नावावर न घेता ज्याच्या नावावर घेतली होती तो साक्षात फोन वर होता समोर त्यामुळे लिस्ट मध्ये माझं नाव का नाही याचा उलगडा एका क्षणांत झाला. मग काय, 'अहो कुलकर्णी सर थांबा, थांबा.. मी पण आले', असं म्हणत कपाटातली पुस्तकं गोळा करून धडपडत मी लायब्ररीच्या दिशेने निघाले...

 सावली 

कसं सांगू तुझ्याविना 
इथे काय होते, 
आठवांचे गोंदणजुने,
नभांत दाटते
कधी जीव शहारतो, 
मन इवले झुरते 
थरथरत्या स्पर्शाचे,
डोळी वात्सल्य दाटते 
तुझ्या हाताचा पाळणा,
तुझे अंगाईचे बोल 
डोळे मिटताच येते, 
सारे नजरे समोर.. 
तुझी 'कविता' स्मरते,
'रामरक्षा' ऐकू येते 
दिवेलागण होताच 
देव्हाऱ्यात भेट होते.. 
आता नाही 'आई', 
आता नाही 'तू' हि 
आम्ही 'सावली' तुमची,
आता एकमेकांसाठी  ... 

दहावी बारावीच्या परीक्षा सुरु असल्याचं पाहून आपण आणि आपली मुलं यातून सुटल्याचा आनंद फार म्हणजे फारच अवर्णनीय असल्याचा फील येतोय सध्या.आता घरातली चिमणी पाखरं मोठी झाली आणि घरट्यातून उडून गेली आपलं जग शोधायला..सतत आपल्या आजूबाजूला लुडबुड करणारी,मध्ये मध्ये घुटमळणारी त्यांची आपल्याला झालेली सवय आता आठवत राहते. तरी आठवण आली की फोन मुळे ही अंतरं काही प्रमाणात का होईना लहान होतात. 'जेवलास का? काय जेवलास आज ? लवकर झोपावं रे रात्री, वेळेवर पोचतोस ना कॉलेजला', अशा सूचना, चौकशांनी सुरू झालेला फोन मग रंगत जातो. 'you need to work on this mom, किती टोकत असतेस', असं appraisal चं फील देणारं वाक्य सुद्धा ऐकावं लागतं कधी कधी. त्यावर माझं ठरलेलं वाक्य, 'अरे आईच आहे जिला हा जन्मसिद्ध अधिकार आहे टोकण्याचा, कारण त्या मागे तिचं प्रेम, माया, काळजी, ममता, वात्सल्य'.. पण या पुढचं वाक्य पूर्ण होऊच शकत नाही इतकी हास्याची कारंजी मग समोरून​ उडू लागतात.. 

आता कालचीच मजा सांगते. चक्क चक्क एक पत्र आलं,फोटो पोस्ट कार्ड आणि ते सुद्धा कोची वरून.पाहिलं कोणाचं आहे​ आणि ​कोणासाठी लिहिलंय तर ते missing ​होतं. एवढंच काय पत्यावर फक्त प्लॅट नंबर होता, सोसायटीच्या नावासहित. आमच्या पोस्टमन काकांचंच कौतुक कि आडनाव नसूनही फक्त फ्लॅट नंबर वरून त्यांनी ते आणून दिलं आम्हाला. अक्षरावरून ओळखलं हे तर आई बाबांसाठी कोची वरून study tour वर असलेल्या  आमच्या राजपुत्रानं​ लिहिलेलं .. क्या बात है !

हावरटासारखं वाचायला सुरुवात केली तर, 'हे बघा एक फोटो पोस्ट कार्ड. मागचा image एक fishing net चा आहे, मागे जहाज आहे. कोचीवरून hello म्हणायचं होतं आणि काहीतरी पाठवायचं होतं मग पत्र पाठवलं bye bye' आणि शेवटी 'मराठी मध्ये चुका अस्तील माफ करा', असं लिहिलं होतं तेही मुद्दाम चूक लिहून.. 

​मग काय ​पत्र मिळताच त्याची पोच देण्यासाठी फोन केला 'अरे असं पत्र कोण लिहितं.. आणि मराठी मध्ये पत्र लेखन होतं ना​ शाळेत​, विसरलास का'.. तर माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी म्हणाला, 'अरे उशिराच मिळालं पत्र तुम्हाला. शिवजयंती तर होऊन गेली, त्या दिवशी मिळायला हवं होतं'.... कारण काय तर कोचीमध्ये दहा रुपयांचा पोस्टल स्टॅम्प छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला मिळाला होता जो त्या पत्रावर होता. हे ऐकून मी निःशब्द झाले..

एक मात्र नक्की या वयाची मुलं पाहून वाटतं, आपल्या बोलण्यातून, वागण्यातून किती समजदार झाली आहेत, mature झाली आहेत तर दुसरीकडे त्यांचा खोडसाळपणा, मस्ती पाहून वाटतं, मोठं होताना आपल्यातील लहान मूल ​किती छान जपलं आहे त्यांनी ... आपल्यालाही हे लहान मूल जपता आलं पाहिजे​ !​