Wednesday, January 4, 2023

 दंतस्य कथा रम्या 


साहसकथा मनुष्याला कायमच आवडतात त्यामुळे ‘युद्धस्य कथा रम्या’ असं म्हटलं जातं. युद्धाशी आपला संबंध म्हणजे रोजच्या जगण्यात असते तेवढी लढाई पुरेशी असते आपल्याला. कधीतरी लुटुपुटुची लढाई तर कधी गनिमी कावा वापरून जिंकलेलं युद्ध आणि हार पत्करायची वेळ आलीच तर तह करता येतो, मग अजून काय हवं ! पण तरीही रोजच्या लढाईत कधी कधी परीक्षेचा क्षण येतोच.दंतशल्यचिकित्सकाकडे जाण्यास केवढं साहस लागतं ते जायची वेळ आली कि आपसूकच समजतं.
तो दंतशल्यचिकित्सक मग कितीही हॅंडसम असला, त्याच्याकडची पेशंटचेअर कितीही गुबगुबीत व आलिशान असली तरीही तिथल्या छिन्नी हातोडीचा आभास निर्माण करणाऱ्या इवल्या इवल्या शस्त्र सामग्रीला पाहून धडकी भरते. सोबत वेगवेगळा आवाज काढण्याचं त्या शस्त्र सामग्रीच्या अंगी असलेलं कसब नुसतं त्यांना पाहून सुद्धा कानांत तो आभास निर्माण करतं. त्यामुळे तिथे जायला लागणं म्हणजेच एक महायुद्ध असतं, स्वतःशी, मनातल्या भीतीशी !
एक दात जरी दुखत असला तरी तो सर्व दात तपासतो. मग फिलिंग रूट कॅनॉल सिरॅमिक कॅप असे शब्द कानावर पडू लागतात. हे सारं वरून गेलं कि काय असा संभ्रम पडतो आणि मग तो सुरवात cleaning सारख्या सोप्या सुटसुटीत शब्दाने करतो. बरं यात गंमत अशी आहे कि हा शब्द कितीही सोपा साधा वाटला तरी तो अनुभव मात्र श्वास रोखून धरण्यासारखा असतो. अहो खरंच , कारण cleaning करता करता मध्येच डॉक्टर थांबतात आणि सांगतात 'अहो श्वास घ्या'.....पुढच्या 'फुल्या फुल्या फुल्या' ऐकू येत नाहीत म्हणजे पुढचे भाव आपोआप त्यांच्या मनांत प्रकट होत राहतात. 
सध्या माझ्या राशीला 'साहसी आणि धाडसी कामे कराल' असं भविष्य लिहिलं असल्याने हा योग जुळून आला आहे. दंतशल्यचिकित्सकाकडे साधारण आपण कोणाच्या तरी रेफरन्सनी जातो तसं माझ्या ref नी माझ्या ऑफिसमधल्या डझनभर मैत्रिणी ऑलरेडी त्याच्याकडे जातात. त्याचे आई बाबा आम्ही लहान असतांना आमचे फॅमिली डॉक्टर होते शिवाय माझ्या भावाचं आणि त्याचं नाव एकच त्यामुळे त्याच्याकडे जाण्याचा माझा emotional connect त्याला सांगून त्याची जबाबदारी मी सुरवातीलाच वाढवली आहे. एकतर माझ्या मनात असलेली भीती इतकी खोल आहे की ते पाहून दुसऱ्या डॉक्टरांवर तो माझी जबाबदारी देऊच शकत नाहीत. शिवाय क्लिनिक मधल्या इतर चेअरवर न बसता एका ठराविक चेअरवरच मी बसणार ही माझी अट त्याच्या सपोर्ट स्टाफला पण ऎकावी लागते. एकूण काय तर लाखांत एखादा माझ्यासारखा दुर्मिळ पेशंट सध्या त्याच्या नशिबात आणि क्लिनिकच्या खुर्चीत आहे.
नेमकं याच वेळी केयुरच पण एका दाताचं फीलिंगच काम निघालं. मग काय क्लिनिक मध्ये एकदा मी माझ्या खुर्चीत आणि समोरच्या खुर्चीत तो. मी इकडे इतक्या टेंशन मध्ये कधी एकदा हे ड्रीलिंग संपतं आणि बाहेर जाते या मनस्थितीत आणि हा दुसऱ्या डॉक्टरांशी गप्पा मारतोय, दाताच्या कॅपचं designing, त्या कॅप चं थ्री डी measurement  scanning वगैरे बद्दल. जणू product designing वरती एक पॅनल discussion सुरू होतं. मला वाटलं डॉक्टरांना सांगावं, यांना बाहेर काढा  क्लास मधून..किती  बोलतायेत! असं वाटेपर्यंत त्याचं काम झालं. 
पुढच्या आठवड्यात मला ट्रिपला जायचं होतं, त्यामुळे दाताला पैलू पाडण्यात खंड पडणार होता. निघतांना डॉक्टर मला म्हणाले, 'बिनधास्त जा, परत आल्यावर पुढचं काम करू. माझी आठवण अजिबात काढू नका, दात काही दुखणार नाही तुमचा'. हे ऐकून हुश्श करत एक आठवडा सुट्टी मिळावी अशा आनंदात मी बाहेर पडले.
मैत्रिणींबरोबर तिकडे ट्रिपवर असतांना दोन तीन दिवसांनी माझ्या सोबत असलेल्या माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा दाताची कॅप तुटली म्हणून फोन आला. मैत्रिणीने त्वरित डॉक्टरांना फोन लावला. तिची मुलगी मुंबईत, आमचे डॉक्टर पुण्यात आणि आणि आम्ही कच्छच्या रणात तरी प्रश्न सुटला !
परत आल्यावर दोन दिवसांनी असलेली माझी अपॉइंटमेंट सर्दी झालीये, चार दिवसांनी थोडा खोकला आहे मग काय ऑफिस मध्ये खूप काम आहे या कारणांनी तीन चार वेळा मी कॅन्सल केली. 'काम तर पूर्ण करायला हवं ना, मग जायला पाहिजे', अशी स्वतःची समजून घालून finally मी परवा परत डॉक्टरांकडे गेले.'कशी झाली ट्रिप' या प्रश्नानंतर 'सध्या खूप काम दिसतंय सिंबायोसिस मध्ये,दोन आठवडे आला नाहीत'? असा प्रश्न विचारून डॉक्टरांनी गुगली टाकली. यावर मी त्यांच्याकडे बघायचं टाळत 'हो हो' म्हणत विषय बदलला व चुपचाप खुर्चीत बसले. दाताचं पुढचं काम सुरू करताना, 'आज हा दात काढू यात'?असं डॉक्टरांनी म्हणताच 'नाही नाही आज नको' असं म्हणत मी खुर्चीत खडबडून उठून बसले. हे पाहून ते म्हणाले, 'अहो, नाही दुखणार फार, तासाभराने मस्त मिल्क शेक, ice cream खाऊ शकता, उद्या इडली उपमा खा'.. हे ऐकताना वैशालीची इडली सांबर, आमायाचा उपमा आणि सुजाताची मस्तानी साक्षात समोर दिसू लागली तरीही माझा निश्चय मी सोडला नाही. मी म्हटलं 'तुम्ही म्हणाला होतात रूट कॅनेल केलेल्या दाताच्या कॅपचं measurement घेऊ आधी म्हणून'.. 'आहे लक्षांत माझ्या, ते करायचं आहेच पण आधी हे करू शकतो. पण ठीक आहे, आत्ता तुमचं ऐकतो, तुम्ही सांगाल तो मुहूर्त ठरवू आपण दात काढायचा सध्या कॅपच काम करू'..असं त्यांनी म्हणताच जणू एक लढाई जिंकल्याचा आनंद झाला.
एकूण काय तर एक धारातीर्थी पडलेला दात  आता पुढील मुहूर्ताच्या प्रतीक्षेत आहे तर दुसरा दात नवीन कॅप मिळणार म्हणून आनंदात आहे. आणि मी मात्र हे युद्ध कधी संपणार या प्रतीक्षेत आहे !


No comments:

Post a Comment