सारंगा तेरी याद में..
पार्श्वगायनाची आयुष्यात मिळालेली पहिली संधी .. गाण्याच्या इतक्या रिहर्सल नंतर मुखोद्गत झालेलं गीत.. त्याच गीताच्या रेकॉर्डिंग करता दिल्लीहून पहिल्यांदा मुंबईला आल्यावर नेमकं रेकॉर्डिंगच्या दिवशी चुकलेला स्टुडिओचा रस्ता आणि तो तरुण गायक.. तर तिकडे स्टुडिओ मध्ये वाट बघणारे संगीतकार अनिल विश्वास.. 'कोणत्या पोराच्या नादी लागता, दुसरा गायक बोलावून गाणं रेकॉर्ड करा'..असा त्यांच्यावर दबाव आणणारे निर्माते..
या पार्श्वभूमीवर त्या तरुण गायकाची स्टुडिओ मध्ये उशिरा एन्ट्री होते.रागाचा पारा मस्तकापर्यंत पोहचलेले अनिल विश्वास त्याला बघताच खाडकन त्याच्या श्रीमुखात लगावतात आणि या पहिल्याच स्वागताने तो तरुण गायक नखशिखांत हादरतो... तरीही सगळा अपमान, सगळं दुःख हृदयात साठवून, डोळ्यातील पाणी कडांवर थोपवून रेकॉर्डिंगला उभा राहातो आणि तो दर्द त्याच्या गाण्यातून बाहेर पडतो..
'दिल जलता है तो जलने दे,
आसू न बहा फरीयाद न कर'...
पार्श्वगायक मुकेश यांनी गायलेलं हे पहिलं गीत !
तो जमाना सैगल साहेबांचा होता त्यामुळे प्रत्येक गायक त्यांचाच आदर्श डोळयांसमोर ठेवायचा. मुकेश जेव्हा गात तेव्हा सैगल साहेबांचा भास व्हायचा त्यामुळेच दिल्लीतील पंचकोशीत मुकेश यांना 'दुसरा सैगल' म्हणून लोक ओळखायचे.त्या काळातील अभिनेते मोतीलाल हे मुकेश यांचे जवळचे नातेवाईक; त्यांचाच हात धरून मुकेश या क्षेत्रात आले.
एकदा मोतीलाल यांच्या घरी पार्टी होती आणि त्यात मुकेश सर्वांच्या आग्रहाखातर सैगल साहेबांची गाणी गात होते. नेमकं त्याच वेळी सैगल साहेब तिथे आले. मुकेशचं गाणं ऐकून ते स्तंभित झाले. गाणं संपताच त्यांनी मुकेशला घट्ट मिठी मारली व म्हणाले 'लोकांना आता दुसरा सैगल मिळाला आहे, त्यामुळे मी आता मरायला मोकळा. असाच तन्मयतेने गात राहा', असा आशीर्वाद देऊन त्यांनी आपली हार्मोनियम मुकेश यांना भेट दिली.
राजकपूर व मुकेश हे गुरुबंधू. दोघांनीही पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे संगीत साधना केलेली. पुढे मुकेश हाच 'राजकपूरचा आवाज' बनला.भावनेने आणि भाविकतेने गीत गाणाऱ्या या गायकाने पार्श्वगायनाकडे, गाण्याकडे कायम परमेश्वराचं स्तवन म्हणून पाहिलं. पार्श्वगायनासाठी गीत हाती आलं की ते सर्वप्रथम आपल्या हस्ताक्षरात लिहून काढत व नंतरच त्यावर काम सुरू करत.
असं म्हणतात, मुकेश यांना सैगल ढंगातून बाहेर काढलं व त्यांना त्यांची शैली प्राप्त करून दिली ते संगीतकार नौशादजींनी. मेला चित्रपटात दिलीपकुमार यांच्यासाठी त्यांनी मुकेशचा आवाज वापरला. 'मेला', 'अनोखी अदा',यातील गाण्यांमुळे ते लोकप्रिय झाले.
मुकेश यांच्या आवाजाला मर्यादा होत्या.त्यामुळे सी. रामचंद्र म्हणत, 'मुकेशचं पारशी माणसासारखं आहे. पारशी माणुस खूप दूरवर पायी फिरावयास जात नाहीत, तिथल्या तिथेच फिरत राहतो, मुकेश सुद्धा त्याच चाकोरीत फिरत राहतो'..
संगीतकार सलील चौधरी यांच खरं प्रेम मुकेश होतं. कई बार यूँ ही देखा है, मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने, कही दूर जब दिन ढल जाए सारखी चिरतरुण गाणी म्हणजे नजाकतीनं घडवलेली काव्यशिल्प आहेत.
'यहुदी' चित्रपटांतील 'ये मेरा दिवानापन है', हे गाणं तलत मेहमूद यांनी गावं हा हट्ट दिलीपकुमार यांनी तर हे गाणं रफी साहेबांनी गावं हा हट्ट दिग्दर्शक बिमल रॉय यांनी धरला होता. पण संगीतकार शंकर जयकिशन यांना या गाण्यासाठी मुकेशचं हवा होता कारण चाल बांधताना कोण या गाण्याला न्याय देईल याचा आराखडा त्यांच्या मनांत स्पष्ट होता. शेवटी रफी, मुकेश, तलत या तिघांच्या चिठ्या टाकल्या गेल्या व मुकेश यांच्या अविस्मरणीय गीतांच्या यादीत या गाण्याने भर पडली.
असं म्हणतात, मुकेशच्या आवाजाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यात आघाडीवर असणारे संगीतकार होते, कल्याणजी आनंदजी. करूण रसातील मुकेश यांच्या आवाजातील गाणी हे या त्रयीचं एक खास वैशिष्टय !
मन्ना डे मुकेशजींच्या आवाजाबद्दल म्हणायचे,'मुकेशचा आवाज म्हणजे घन मेघांनी व्यापलेलं,खाली झुकलेलं शोकमग्न आकाश'.. म्हणून तर त्यांनी गायलेल्या गीतांचा सुगंध पारिजातकाच्या फुलांसारखा आजही दरवळतो आहे...
No comments:
Post a Comment