Wednesday, August 25, 2021

 बायांनो जगणं सोडू नका ...


मनातलं बोलून उपयोग झाला नाही  
तरी व्यक्त होणं थांबवू नका 
बायांनो बोलणं सोडू नका.. 
एखादी खपली दुखरी असते 
म्हणून कोणी फुंकर घालेल,
याची वाट पाहू नका 
चंद्रावरती सुद्धा एक डाग आहे,
बायांनो, हे अजिबात विसरू नका !
रिमझिम कधी धुवाँधार 
अवेळी मनांतच बरसतो पाऊस 
पण म्हणून श्रावणांतलं
मनसोक्त भिजणं थांबवू नका
बायांनो जगणं थांबवू नका..
प्रवास एकटीचा आहे, 
कधीतरी अवचित उमगेल  
पायांतील सारी शक्तीच जणू संपली
कदाचित असंही वाटेल,
तरी बायांनो, तुमचं चालणं सोडू नका ..
शांत नदीसारखं झुळूझुळू वाहत रहा, 
कोणी नाकारलं, म्हणून खचू नका 
त्या अढळ ध्रुव ताऱ्याकडे
पाहणं सोडू नका..
आयुष्य सुंदर आहे, कमाल आहे 
सुखदुःखाच्या रंगांनी सजलं आहे 
त्या रंगामध्ये रंगून जाणं सोडू नका 
बायांनो जगणं सोडू नका, बायांनो जगणं सोडू नका !!

 दादा..


अगदी निवांत वेळी, जूना फोटोंचा अल्बम घेवून बसाव आणि प्रत्येक फ़ोटो मधे साठवलेली आठवण अगदी परत परत पाहावी तसंच काहीसं झालंय, दादांबद्दल लिहितांना...

जून महिना सुरु झाला आणि तीन वर्षांपूर्वी झालेला दादांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आठवला. नखशिखांत नटलेलं नागपुरचे घर, नातेवाईक मित्र मंडळींनी आलेली बहार, सनईचे सूर, फुलांचे तोरण, दारातील रांगोळी,पंचपक्वान्नांचा दरवळ, कार्यक्रमाची तयारी करतांना घरातल्या मंडळींची चाललेली लगबग आणि हा कौतुक सोहळा पाहून,अनुभवून समाधानानं भरून पावलेले दादांचं ते प्रसन्न रूप .. 'सुवास' नी डोळेभरून पाहिलेला दादांसोबतचा तोच शेवटचा सोहळा !

दादांना जाऊन आता वर्ष होईल पण अजूनही ते नाहीयेत हे खरंच वाटत नाही .. 'माणिकss ' म्हणून त्यांनी आईंना मारलेली हाक आजही तितकीच ताजी आहे, सकाळी उठल्यावर दादांच्या हातच्या चहाची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे तर वर्ध्यावरून येताना आम्हाला आवडतो म्हणून आठवणीने आमच्यासाठी आणलेला तो गोरसपाक सुद्धा तितकाच आठवतोय ! आजही पार्ले जी बिस्कीट पाहिलं कि आठवण होते दादांची. खरंच .. खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून दादा अजूनही सोबत आहेत.

दादांचा आणि माझा बावीस वर्षांचा सहवास .. या सहवासांत दादांनी खूप काही दिलं, खूप काही शिकवलं .. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ! अशी खूप कमी माणसं आहेत आजुबाजूला जी खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत आणि दादा या बाबतीत खरंच खूप खूप श्रीमंत होते. नात्याचे मैत्रीचे अनेक धागे त्यांनी जपले, जोपासले. बहीण भावंडं असोत, मित्रपरिवार असो, नातवंड असोत किंवा नातवंडांचे मित्र मैत्रिणी, प्रत्येकाशी त्यांच एक सुरेख नातं होतं; निस्वार्थ, प्रेमळ, आपुलकीचं आणि मुख्य म्हणजे मैत्रीचं ! कारण कोणत्याही नात्यांत जेव्हा मैत्री असते ना तेव्हाच ते नातं बहरतं !! अगदी इथे पुण्यात माझ्या शेजारी राहणाऱ्या पटवर्धन काकूंकडे सुद्धा आई दादा आले कि कॉफी पार्टी ही ठरलेली .. प्रत्येकाशी त्याच्या वयाप्रमाणे लहान , मोठं होऊन संवादातून वयातली दरी मिटवण्याचे कसब त्यांच्याजवळ होतं. एक वडील म्हणून,नवरा म्हणून,आजोबा म्हणून,सासरे म्हणून,शिक्षक म्हणून, भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून बहुतेक या साऱ्याच भूमिकांमध्ये मी त्यांना खूप जवळून पाहिलंय आणि मला वाटतं त्यांनी जगलेली प्रत्येक भूमिका ते भरभरून जगले व म्हणूनच आज प्रत्येकाला त्यांची उणीव भासते. केयुरला अनेक वेळा फोन उचलून आत्ता हि गोष्ट दादांना सांगावी असं वाटतं तर कधी छान sketch जमलं कि 'आजोबांना हे नक्की आवडलं असतं', हि भावना कांतेयला स्पर्शून जाते. आजही दादांच्या आवडीचा पदार्थ केला कि त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही...

दादांचं अनपेक्षितपणे जाणं मनाला अगदी चटका लावून गेलं. खूप काही बोलायचं होतं त्यांच्याशी.. मनातलं कधी बोलून दाखवलं नाही ते कधीतरी व्यक्त करायचं होतं. त्यांच्यासोबत आनंदाचे अजून खूप सारे क्षण गोळा करायचे होते, त्यांना त्यांच्या सर्व नातवंडांचं कौतुक करतांना पाहायचं होतं. आजही त्याच उत्साहाने आईंसोबत वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला जातांना त्यांना पाहायचं होतं आणि हो ,आम्हाला पण त्यांच्याकडून अजून थोडं कौतुक करून घ्यायचं होतं.. हक्कानं कौतुक करणारी, पाठीवर शाबासकीची थाप आणि आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवणारी आपलीच माणसं अशा प्रकारे निघून गेली ना कि अगदी पोरकं वाटायला लागतं ..

दादा गेले पण जातांना एक शिकवण देऊन गेले. मला आठवतंय, दादा आजारी पडायच्या अगदी एक दिवस आधी मी दादांना एक गोष्ट लिहून पाठवली होती, तो गोष्ट होती दादा आणि त्यांच्या भावंडांबद्दल. ती वाचुन दादांनी लगेच मला मेसेज तर केलाच पण लगोलग फोन सुद्धा केला आणि म्हणाले 'तुम्ही सगळे जण सुद्धा कायम असंच एकत्र राहावं हि माझी इच्छा आहे'. खरं तर असं बोलण्याचा,सांगण्याचा त्यांचा स्वभाव नाही त्यामुळे मला वाटलं आज असं का बोलतायत दादा ? पण मग मीच विचार केला काही हक्कानं, प्रेमानं सांगतायत..थोडे हळवे झालेत ! मी म्हटलं त्यांना 'हो दादा नक्कीच प्रयत्न करू' आणि तेच माझं त्यांच्या सोबतचं शेवटचं संभाषण ठरलं. आता ती गोष्ट आठवली कि वाटतं, जाता जाता जणू संस्कारांची एक शिदोरी देऊन गेले दादा .. आता ते संस्कार जपणं, रुजवणं आपल्याच हातात आहे, नाही का !!!


Tuesday, August 24, 2021

 कॅमेऱ्यामागचा 'चेहरा'..


ठराविक दिवशी विशिष्ट व्यक्तीची आठवण आवर्जून येते. आज जागतिक छायाचित्र दिवस.. मग गौतम सरांची आठवण येणार नाही असं कसं होईल !  

'कॅमेऱ्यामागचे जादूगार' अशी ओळख असलेलं नाव,म्हणजे गौतम राजाध्यक्ष ! कमालीचे जिवंत भासणारे व आपल्याशी संवाद साधणारे ‘चेहरे’ हि त्यांनी काढलेल्या छायाचित्रांची खासियत. लिंटास इंडिया सारख्या ख्यातनाम जाहिरात कंपनीत काम करत असतानाआपल्या लेखनात आलेला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ते कॅमेऱ्याची मदत घेत. पुढे १९७४ सालापासून त्यांनी आपला फोटोग्राफीचा छंद व्यवसाय रुपात आकारास नेला. १९८० मध्ये शबाना आझमी, टीना मुनीम, जॅकी श्रॉफ या हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची त्यांनी काढलेली व्यक्तिचित्रे प्रकाशझोतात आल्यापासून त्यांच्या व्यक्तिचित्रात्मक छायाचित्रणास प्रसिद्धी लाभली. स्टारडस्ट, फिल्मफेअर सारख्या मासिकांसाठी त्यांनी फोटोग्राफी केली. 

१९९७ मध्ये प्रकाशित झालेले 'चेहेरे' हे त्यांचे पुस्तक खूप गाजले. माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय पासून दुर्गा खोटे, स्मिता पाटील, शांताबाई शेळके, जे.आर.डी. टाटा, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, लता मंगेशकर, आशा भोसले, गुलजारजी, पंडित भीमसेन जोशी,जावेद अख्तर, कैफी आझमी अशा तमाम मंडळींची प्रतिबिंब त्यांच्या छायाचित्रांमधून उमटली ! कसबी छायाचित्रकार, प्रभावी व्यक्तिमत्त्व, तल्लख बुद्धी, अभिजात रसिकमन, उत्तम वक्ता या गुणवैशिष्टयांमुळे गौतम राजाध्यक्ष केवळ ‘स्टार फोटोग्राफर’ न राहता स्वत:च ‘स्टार सेलिब्रेटी’ बनले.

बरोबर दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या विद्यापीठात School of Photography या नवीन कॉलेजचं काम सुरू झालं. या करता गौतम सरांचं मार्गदर्शन तर मिळणार होतंच शिवाय चेअर प्रोफेसर म्हणून ते इथल्या विद्यार्थ्यांना शिकवणार सुद्धा होते. त्यामुळे हा प्रोजेक्ट खूप special होता. केयुरचा फोटोग्राफी हाच विषय असल्यामुळे तो अगदी सुरवातीपासून गौतम राजाध्यक्ष सरांसोबत काम करत होता. त्याच्यासाठी तर हि एक फार मोठी सुवर्ण संधी होती. 

गौतम सरांचा स्वभाव अतिशय मृदू होता त्यामुळे विभिन्न क्षेत्रातील, विविध वयोगटातील, विविध विचारांची माणसं त्यांच्याशी अगदी सहजपणे जोडली जात. समोरच्या व्यक्तीच्या कार्य क्षेत्राविषयी जाणून घेत, गप्पा मारत ते समोरील व्यक्तीचा स्वभाव खुलवत व त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत. त्यामुळे केयुरची खूप पटकन मैत्री झाली त्यांच्याशी. हो मैत्रीच, कारण दोघांच्या वयामधली दरी कॅमेऱ्यामुळे कधीच पुसली गेली होती. फोटोग्राफी या विषयावर किती बोलावं, किती शिकावं आणि त्यांना किती ऐकावं असं झालं होतं त्याला. या विषयावरील चर्चा, त्यांचे अनुभव यातून खूप शिकता आलं. फोटोग्राफीच्या तीन वर्षाच्या डिग्री प्रोग्रॅम करता कोणता अभ्यासक्रम असला पाहिजे हे ठरवणं व तो कोर्स सुरु करणं हे सुरवातीचं मूळ उद्दिष्टय होतं  कामाचं. सोबत या अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या लॅब कशा असाव्यात, उपकरणे कोणती हवीत, शिकवण्याची पद्धत कशी असावी, या सारख्या अनेक गोष्टींवरती सुद्धा काम सुरु होतं. मुंबई पुणे अशा त्यांच्या चकरा वाढल्या होत्या. गौतम सर आठवडा आठवडा कॅम्पस मधील गेस्ट हाऊस मध्ये राहायचे. केयुरच्या मोबाईल वर 'गौतम राजाध्यक्ष calling' असं पाहायची हळूहळू सवय झाली. एकत्र काम करता करता फॉर्मल बोलणं मागे पडून एक सहजता आली होती या नात्यात.. 

मला आठवतंय, माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये स्टारडस्ट, फिल्मफेअर सारख्या मासिकांमधले त्यांनी काढलेले माधुरी, जुही, रेखा यांचे फोटो पाहून असं वाटायचं कसले भारी आहेत हे फोटो. तेव्हा फोटोग्राफी बद्दल फारसं ज्ञान नव्हतं पण एवढं नक्की समजायचं कि खूप खास , वेगळे फोटो असायचे ते. एकदा कुतूहलाने, हे फोटो कोणी काढले आहेत हे बघितलं आणि समजलं, तेव्हा ओळख झाली 'गौतम राजाध्यक्ष' या नावाशी. त्यांनी काढलेला फोटो एकदा पाहिला कि तो फोटो VISUAL MEMORY मध्ये एकदम फिट बसायचा, अशी जादू होती त्यांनी काढलेल्या फोटोंमध्ये. केयुरला एकदा मी सांगितलं होतं, कि कॉलेज मध्ये असतांना एक स्वप्न होतं माझं एकदा तरी आपला फोटो काढून घ्यावा, गौतम राजाध्यक्ष यांच्याकडून ! 

एक दिवस संध्याकाळी सरांचा फोन आला ते पुण्यात पोचले हे सांगायला कारण दुसऱ्या दिवशी सकाळी एक मिटिंग होती. सरांनी केयुरला 'उद्या ब्रेकफास्टला ये, मग एकत्र जाऊ', असं सांगितलं कारण त्यांचा तिथीने वाढदिवस होता, त्या दिवशी. फोन झाल्यावर सरांकरता काय घेऊन जावं, असा प्रश्न केयुरला पडला. खरं तर इतक्या मोठ्या स्टार सेलिब्रेटी ला वाढदिवसाला काय द्यायचं हा आमच्यासाठी तसा गंभीर प्रश्न होता. खूप विचार करून मी सुचवलं, 'केयुर मी घरीच केक बनवते, तू घेऊन जा उद्या. आवडेल सरांना, काय वाटतं '.. त्याला माझा विचार आवडला. मग काय प्रचंड उत्साहाने मी लगेच लागले तयारीला, मस्त केक बनवला. घरभर पसरलेला केकचा तो टिपिकल सुवास 'केक छानच झाला आहे' जणू हेच सांगत होता. सकाळी उठल्यावर मस्त पॅकिंग केलं. केयुर ठरलेल्या वेळी केक घेऊन गेला. 

गौतम सर खातील का केक मी बनवलेला, आवडेल का त्यांना आपण असा केक पाठवला आहे ते .. असे अनेक प्रश्न मनांत येत होते.  एकीकडे ऑफिस करता तयार होता होता मन मात्र प्रश्नांमध्ये अडकलं होतं. केयूर ला जाऊन जवळपास अर्धा पाऊण तास झाला होता. इतक्यात केयुरचाच फोन आला, ' अग गौतम सरांना बोलायचं आहे'.. आणि त्यानी फोन सरांना दिला. मी पुरती गोंधळून गेले, पहिल्यांदाच बोलणार होते त्यांच्याशी. बोलायला सुरवात करताच काही क्षणांत मग ते दडपण निघून गेलं. मी त्यांच्यासाठी स्वतः केक बनवून पाठवला या गोष्टीचं त्यांना खूप कौतुक वाटलं. फोनवर माझं पोटभर कौतुक तर त्यांनी केलंच शिवाय केक खूप आवडलाय आणि तो मी कोणाबरोबरही SHARE करणार नाही व एकटा संपवणार असंही सांगितलं. 'आज मिटिंग झाली कि परत जायचंय मुंबईला पण परत आलो कि केयुर नी सांगितलंय मला, ते तुझं कॉलेज मधलं ड्रीम पूर्ण करू, काढूया तुझा फोटो. इतके दिवस का नाही बोललीस'.. असं म्हणाले. मी इतकी खुश झाले कि 'और क्या चाहिये' असं झालं मला !

दोन सप्टेंबरला आमचं हे फोन वर बोलणं झालं व नंतर ते मुंबईला गेले. तेरा तारखेला संध्याकाळी केयुरशी बोलले फोनवर, दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुंबईवरून येणार होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 'हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ते काल रात्री गेले' असा फोन आला. त्या फोनवर तर अजिबात विश्वासच बसला नाही, विश्वास ठेवावा असं वाटलंच नाही. पण जेव्हा त्यांच्या घरी फोन केला तेव्हा समजलं, बातमी खरी होती. हे समजताच केयुर मुंबईकरता निघाला. त्यांच शेवटचं दर्शन घेतलं. तिथून परत निघतांना त्यांच्या सेक्रेटरीने केयुर ला थांबवलं आणि तो म्हणाला, 'सरांनी काही फोटो ठेवले आहेत पॅक करून, त्यांनी काढलेले, कॉलेजमध्ये लावण्याकरता, तुमचं बोलणं झालं होतं ना' .. आणि तो वरती त्यांच्या रूममध्ये गेला. जिन्यावरून खाली उतरतांना त्याच्या हातांत ब्राउन रंगाच्या कागदात पॅक केलेल्या आठ दहा फ्रेम होत्या आणि त्यावर केयुरचं नाव लिहिलं होतं, त्यांच्याच अक्षरांत ...

रात्री केयुर घरी आला तेव्हा कितीतरी वेळ आम्ही त्या फोटोंकडे पाहात राहिलो. मी केयुर ला म्हटलं सुद्धा एक फोटो आपण ठेवू यांत का आपल्याकडे, सरांची आठवण म्हणून .. पण तो नाही म्हणाला. सरांनी कॉलेज करता दिले आहेत ना हे फोटो मग ते तिथेच हवेत. आजही कॉलेज मध्ये त्या फोटोंकडे पाहिलं की गौतम सरांची आठवण येते ! 

 Happy World Photography Day !!!! 


 जिंदगी 'गुलज़ार' है .....


कधी कधी प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी काही नाती आपण मनातल्या मनांत जपत असतो. असंच एक नातं आहे आपल्या सर्वांचं.. शब्दांच्या जादूगाराशी, गुलजा़र साहेबांशी ! 
कवी, गीतकार, दिग्दर्शक, पटकथा लेखक या सर्वांमध्ये 'गीतकार' म्हणून ते कायमच जास्त आवडले.

किशोर कदम, अर्थात कवी सौमित्र यांनी एका कार्यक्रमांत त्यांची एक आठवण सांगितली होती. नदीच्या काठावर गुलजार साहेबांबरोबर उभे असताना पाण्याचा प्रवाह बघत त्यांनी गुलज़ारजींना प्रश्न केला, ''आपको तैरना आता है?'' गुलजार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, ''नही, सिर्फ डूबना आता है.'' तेव्हा 'गुलजार' या व्यक्तिमत्वाच्या कैफात आकंठ बुडालेल्या मला 'डूबना' ही कल्पना नव्याने उमगली, असं ते म्हणाले होते. 

त्यांच्या गाण्यांमधील नायिका खूप जवळच्या वाटतात. नायिकेच्या मनातलं जसंच्या तसं शब्दांत मांडता येणं खरं तर किती अवघड आहे. स्वतः अनुभव घेऊन ती आर्तता शब्दात उतरवणं हे एक वेळ समजू शकतो पण एका स्त्रीचं मन, तिच्या भावना समजून त्या त्याच ताकतीने कागदावर उतरवणं किती अवघड असेल एका गीतकारासाठी ! गुलजारजी म्हणतात,''चाल लावून गीत तयार होत नाही तर स्वतःच्या शब्दांत त्याला भिजवावं लागतं, त्यातील आर्तता समजून घ्यावी लागते, जगावी लागते."

प्रियकराला भेटण्यासाठी निघालेली त्यांची नायिका 'मोरा गोरा रंग लैले, मोहें शाम रंग दैदे ', म्हणते तेव्हा शाम रंग मागणारी त्यांची नायिका किती वेगळी आहे ते जाणवतं. प्रेमात पडल्यावर तिला, ' जीने की तुमसे, वजह मिल गयी है, बड़ी बेवजह जिन्दगी जा रही थी'.. असं म्हणावसं वाटतं... "आपकी बातों में फिर कोई शरारत तों नही,बेवजह तारीफ करना आपकी आदत तो नहीं", असं म्हणत ती त्याच्या डोळ्यातील भाव वाचते तर कधी " तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं" म्हणत " काश ऐसा हो, तेरे कदमों से, चुन के मंज़िल चले और कहीं, दूर कहीं".. असं स्वप्न सुद्धा पाहते. "कतरा कतरा मिलती हें.. जिंदगी हें..  बेहेने दो".. गात तिला प्रत्येक क्षण जगायचा आहे. एक सौ सोला चांँद कि राते आठवून "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हें, सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे है" ते परत पाठव असं सांगताना, ती पतझड, तिचं 'मेरा वो सामान लौटा दो' हे आर्जव खूप खोलवर रुततं. ' दो नैनो में आसूंँ भरे है, निंदिया कैसे समाए", असं गात "जिंदगी तो काटी ये रात कट जाए" या शब्दांतून तिची तगमग व्यक्त होते. 'खाली हात शाम आई है, खाली हात जायेगी', ऐकतांना ते शब्द आरपार अस्वस्थ करतात .... प्रत्येक गाण्यात तिचं एक वेगळं रूपं दिसतं !

गुलजार साहेबांची गाणी म्हणजे प्रत्येक गाण्यात एक गोष्ट असते, आपली .. आपण अनुभवलेली, आपलीच वाटणारी इतक्या चपखलपणे शब्दांमध्ये मिसळून जाणारी ! प्रत्येक गाणं त्यांचं वेगळेपण दाखवून जातं. 

'तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मैं , हैरान हूँ मैं '... हेच वास्तव आहे, जे स्वीकारावं लागतं. ' जीने के लिए , सोचा हि नहीं , दर्द संभालने  होंगे , मुस्कुराये तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे'....हे प्रत्येकाला स्वतः अनुभवावं लागतं. 

'जब तारे जमीन पर जलते हें , आकाश जमीन हो जाता हें, उस रात नहीं फिर घर जाता, वो चाँद यहीं सो जाता हें.. पलभर के लिए इन आँखो में , हम एक जमाना ढुंढते है' .... हि आपलीच गोष्ट.  'इन भूलभुलैया गलियों में अपना भी कोई घर होगा, अंबर पे खुलेगी खिडकी या खिडकी पे खुला अंबर होगा ' आणि हे आपल्या सर्वांच्या डोळ्यांतील, आपण प्रत्येकाने कधी ना कधी पाहिलेलं एक गोड स्वप्न.. शब्दांमधून कागदावर उतरलेलं !  

रात्रीची वेळ.. फक्त दोघांची. बाहेर कोसळणारा पाऊस. खिडकीबाहेर पाहणारा तो, आपल्याच विचारात हरवलेला. त्याच वेळी ती येते, त्याला पाहते आणि अलगत त्याच्या जवळ जाऊन गुणगुणते "मेरी जाँ .. मुझे जाँ न कहो मेरी जाँ "... हे ऐकून आपण प्रेमात पडतो, ते गाणं आपलं होतं. बाहेरचा रिमझिम पाऊस, खिडकीतून दिसणारा पाऊस.. अंगणातील फुलांना भिजवणारा पाऊस, त्या दोघांचा पाऊस आणि न भिजताही आपल्याला चिंब भिजवणारा पाऊस...

इजाजत.. एक चिरतरुण काव्य ! कितीही वेळा बघितला तरी प्रत्येक वेळी तेवढाच आवडणारा आणि प्रत्येक वेळी काहीतरी नविन देवून जाणारा. तो पाहतांना 'पावसाच्या बरसणाऱ्या सरींच्या सोबत गुलजारजींची कविता त्यांच्याच आवाजात आपण ऐकतोय' असंच वाटत राहतं. या चित्रपटाच्या प्रेमात पडल्यापासून असा एकही पावसाळा गेला नाही कि 'इजाजत' पाहिला नाही, इतकी जादू या सिनेमाने केली आहे मनावर. इजाजत म्हणजे एक अलवार प्रेमकहाणी, नजरेत आणि कानांत साठवून ठेवावी अशी !

लहानपणी आई गेली, तिचा चेहराही आठवत नाही, जवळ तिचा साधा फोटोसुद्धा नाही. तरीही 'दो नैना और एक कहानी , थोडा सा बादल थोडा सा पानी' आणि 'सुरमई अंखियों में नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे' सारखं गीत ते लिहितात. या भावना मांडताना इतक्या बखुबी भाषा वळवण्याचं त्याचं कसब थक्क करणारं आहे.

संवेदनशीलता आणि तरल भाव हे गुलजार साहेबांच्या गाण्याचं खास वैशिष्ट्य ! आपल्या भावभावनांना वेगवेगळ्या रुपकांच्या कोंदणात सजवून त्यातील अर्थ अधिक गहिरा करण्याची त्यांची आगळी वेगळी शैली हे त्यांच्या गीतांचे अजून एक वैशिष्ट्य. आपल्या कल्पनांना शब्दरूप देऊन त्यांनी अजूनच मोहक बनवलं.  'इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है' यातला हळुवारपणा मनाला स्पर्शून जातो. माचिस मधलं ‘पानी पानी रे’ किंवा ‘राझी’मधलं ‘मुडके ना देखो दिलबरो’ ऐकताना डोळ्यात टचकन् पाणी येतं. 'रुके रुके से कदम, रुक के बार-बार चले, क़रार लेके तेरे दर से बेक़रार चले' , सारखी गाणी मन कासावीस करतात. 'मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने', सारखा आशावाद , 'थोडा है थोडे कि जरुरत है', मधलं समाधान, 'वो शाम कुछ अजीब थी', मधलं गहिरेपण, 'भुले हुए नामोंसे कोई तो बुलाए' मधील आर्तता, 'आँखो में हमने आपके सपने सजाये है' मधलं प्रेम,'हजार राहे मुडके देखी', मधली बेवफाई, 'जाने क्या सोचकर नही गुजरा, एक पल रात भर नही गुजरा', मधलं एकटेपण, 'जीना तो सिखा है मरके, मरना सिखा दो तुम', यातील मनाची अवस्था टिपायला फक्त आणि फक्त गुलजारचं हवेत.

आयुष्यातील वेगवेगळ्या वळणांवर त्यांनी लिहिलेली गाणी नेहमीच आपल्याला जवळची वाटली. आपण आपल्या अनेक भावनांचं प्रतिबिंब त्यांच्या गाण्यांमध्ये पाहिलं. कधी त्यांच्या गाण्यांनी प्रेमात पाडलं तरी कधी एकटं असतांना सोबत केली. 'कभी जिंदगी का एक पल नहीं गुजरता , कभी जिंदगी एक पल में गुजर जाती है', हे त्यांनीच त्यांच्या शब्दांमधून सांगितलं. त्यांच्या गाण्यांतून आपण मुसाफिर म्हणून जगलो, प्रेम करायला शिकलो.. 'आनेवाला पल जाने वाला है , हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जानेवाला है', म्हणत जगणं शिकलो ! 

त्यामुळे 'जिंदगी गुलजा़र है' म्हणता म्हणता 'गुलजा़रही जिंदगी है' कधी झालं हे समजलंच नाही ...

आज त्यांचा वाढदिवस ! गुलजा़र जी, तुम्हाला आभाळभर शुभेच्छा ! तुमच्या गाण्यांसोबत आमचा हा प्रवास असाच सुरु राहो !!!

© कविता सहस्रबुद्धे
(18 August 2021)



उमराव जान

दिग्दर्शक मुझफ्फर अली यांचा 'उमराव जान' हा चित्रपट लक्षांत राहिला तो शहरयार यांनी लिहिलेल्या खोल,भावपूर्ण गीतांमुळे, त्याला खय्याम साहेबांनी दिलेल्या लाजवाब संगीतामुळे, त्या गीतांना आपल्या स्वरातून चिरंतन करणाऱ्या आशाताईंमुळे आणि मुख्य म्हणजे चित्रपटात उमराव ची भूमिका जगलेल्या रेखा मुळे !  या चित्रपटातील भूमिकेसाठी रेखाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आशा ताईंना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका व खय्याम साहेबांना सर्वोत्कृष्ट संगीतकार हे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्या काळांत पडद्यावर नवाबी युग जिवंत करणाऱ्या मुझफ्फर अली यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 

हा चित्रपट मिर्झा हादी रुसवा यांच्या 'उमराव जान अदा' या उर्दू कादंबरीवर आधारित आहे. मुझफ्फर अली या चित्रपटातील उर्दू भाषेच्या सौंदर्याबद्दल बोलताना म्हणतात "सत्यजीत रे से उर्दू का इस्तेमाल फिल्मों में करना सीखा मैने कलकत्ते से, मतलब जो सत्यजीत रे बंगाली में इस्तेमाल करते थे अपनी ज़बान और संस्कृति को दुनिया के सामने रखने के लिए, उसीसे सिख मिली। दूसरा सीखा अलीग़ढ से। दुनिया का सारा दर्द वहाँकी शायरी में है। अलीगढ़ ने मुझे बहोत बड़ा तोहफा दिया है उर्दू के माध्यम से, उर्दू की सरजमींन है अलीग़ढ।"

या सिनेमाची त्यांच्या डोक्यात असलेली कल्पना म्हणजे, 'स्क्रीन प्ले को गझल के फॉर्म में लिखना'.. थोडक्यात गाण्यांमधून पटकथा लिहिणं आणि या करता त्यांच्या समोर एकचं नाव होतं, शहरयार !

या स्वप्नाला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी शहरयार यांना आपल्याच घरी राहायला आणलं. पुढे तब्बल दिड ते दोन वर्ष ते एकत्र राहिले या चित्रपटाच्या गाण्यावर काम करण्यासाठी. योगायोगाने समोर खय्याम राहायचे. मग काय 'हर शाम, शाम ए शहरयार और शाम ए खय्याम'....यातूनच लिहिली गेली एक से बढकर एक गाणी !!

खय्याम सांगतात, मुझफ्फर अलींच्या 'उमराव जान' साठी काम करतांना त्यांना खूप दडपण आलं होतं. कमाल अमरोही यांच्या पाकिजा नंतर तीच पार्श्वभूमी असलेला चित्रपट करणं हे एक आव्हान होतं. त्यांनी खूप मेहनत घेतली. नर्तकी उमरावजान शायरा होती, कथ्थक नृत्य शास्त्रीय संगीताचं तिनं शिक्षण घेतलं होतं. हे महत्त्वाचे संदर्भ खय्यामजींनी गीतं संगीतबद्ध करताना लक्षात ठेवले. आपल्या गाण्यांसाठी आशाताईं शिवाय दुसरं कोणतच नाव त्यांच्या समोर नव्हतं. खय्यामजींनी आशाताईंना पहिल्याच मिटिंग मध्ये सांगितलं, "हमे आशा नही, उमराव जान चाहिये". पडद्यावर साक्षात रेखा आणि आशाताईंच्या आवाजातील बहारदार गाणी यामुळे सिनेमा सुपरहिट ठरला.   

सर्वोत्कृष्ट संगीतकार हा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार खय्याम साहेबांना याच चित्रपटाने दिला. खय्याम म्हणायचे, "रेखा ने मेरे संगीत में जान डाल दी, उनके अभिनय को देखकर लगता है कि रेखा पिछले जन्म में उमराव जान ही थी"... एका चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ते म्हणाले होते,'रेखा ना होती तो उमराव जान का संगीत कभी हिट नहीं होता'....

© कविता सहस्रबुद्धे