' अस्तित्व '
'अस्तित्व' म्हणजे काय ?
खरं सांगू , ' तुझ असणं हेच अस्तित्व ', असं वाटायचं.
पण 'शरीराचं असणं' म्हणजेच असतं का अस्तित्व ? कां ' मनाने जवळ असणं ' महत्वाचं,
खरचं माहित नाही.…
पण आता वाटतं, नसण्याच्या पलीकडे सुधा, असतच कि एक ' अस्तित्व ' ,
शांत… नि:शब्द … स्तब्ध… अबोल…
आता फरक इतकाच, ' कालच्या असण्यावरून आजच्या नसण्याचा ' …
पण म्हणून काही 'तुझं अस्तित्व' नाही बदललं,
तू गेलीस पण तुझं असणं, इथेच ठेवलसं, मागे
घराच्या प्रत्येक कोपऱ्यांत, तुळशीत, देवघरांत, अंगणात …
रिकाम वाटलं तरी तुझ्या अशा असण्यानी, घर अगदी भरून गेलंय …
या आठवणी आणि आभासांनी,
पण तरीही वाटतं कधीतरी, हे श्वास अजूनही खोळंबलेत, तुला पाहण्यासाठी…
या कानांना अजूनही आस आहे, तुझ्या आवाजाची…
तुझ्या जाण्याचा पुरावा नाही माझ्याकडे पण तू असण्याचा आहे,
कित्येक क्षणांत, कित्येक जागी, या मनांत , डोळ्यांत , स्वप्नांत ….
शेवटी आपल्या मानण्यावरच असतं ना हे ' अस्तित्व ' ,
जसं माझं तुझ्यासाठी अन् तुझं माझ्यासाठी ….