मोहम्मद ज़हूर खय्याम हाशमी असं लांबलचक नाव असलेले 'खय्याम' म्हणजे एकदम उसुलवाला बंदा! ' मेरा संगीत मेरी इबादत है', म्हणणाऱ्या खय्याम यांनी त्यांच्या साठ वर्षांच्या कारकीर्दीत ७१ चित्रपट आणि नऊ दूरदर्शन मालिकांना संगीत दिलं. त्यांनी अशा सिनेमांना संगीत देणं पसंत केलं ज्यांत गीतांचा दर्जा खुप वरचा होता.
प्रत्येक गाण्यावर त्या संगीतकाराची एक अमीट छाप असते. गाण्याची सुरावट, गाण्याच्या सुरवातीला वाजणारे म्युझिक व त्यामुळे होणारी वातावरण निर्मिती, दोन ओळींमधले छोटे छोटे म्युझिकचे पीसेस व एकूण वाद्यमेळ हे सर्व ऐकताच त्या गाण्याचं संगीत कुणाचं असेल, हे जाणकार रसिक क्षणात ओळखतात. संगीतकार खय्याम यांच्या बाबतीत तर हे विशेषत्वाने म्हणता येईल. ‘बहारों मेरा जीवन भी संवारो..’ (‘आखरी खत’), ‘कभी कभी मेरे दिल में..’ (‘कभी कभी’), ‘हजार राहें मूड के देखी..’ (‘थोडीसी बेवफाई’), ‘ये मुलाकात इक बहाना है..’ (‘खानदान’), ‘फिर छिडी बात बात फूलों की..’ (‘बाज़ार’) ही गाणी ऐकली तर लक्षात येईल, की त्यांचं गाणं एकदम सुरू होत नाही.
'शगुन' सिनेमांतील गाणी ऐकून फिदा झालेले कमाल अमरोही खय्यामजींकडे 'रझिया सुलतान' च स्क्रिप्ट घेऊन आले. 'रझिया सुलतान' म्हणजे बाराव्या शतकातील ऐतिहासिक ड्रामा होता. खय्यामजींनी सहा महिने कथेचा नीट अभ्यास केल्यावर लतादीदींना रेकॉर्डिंग साठी बोलावलं आणि सांगितलं, "लताजी, रझिया एक सम्राज्ञी आहे पण तिचा एका गुलामावर जीव जडलाय.रझियाची अवस्था मोठी विचित्र आहे. सम्राज्ञीचा आब पण राखायचा आहे आणि त्याचवेळी विरहाने तिचे मन आर्त झाले आहे. ती कशिश गाण्यात उतरली पाहिजे". लतादीदींनी त्यांच म्हणणं शांतपणे ऐकलं आणि एकाच टेक मध्ये "ए दिले नादान" हे सुपरक्लास गाणं दिलं. "मी हे गाणं गाऊन बाहेर आले पण नंतर दिवसभर ते गाणं माझ्या मनांत निनादत होतं. जणू काही मी ते गाणं माझ्या सोबतच घेऊन घरी आले होते", असं एका मुलाखतीत या गाण्याविषयी लतादीदींनी सांगितलं होतं.
या गाण्याचं वैशिष्टय म्हणजे खय्यामसाहेबांची आगळीवेगळी मनात दीर्घकाळ रेंगाळणारी चाल व या गाण्यात घेतलेले विशिष्ठ पॉज.. या गाण्यात पहिल्या ओळीनंतर दुसरी ओळ येत नाही, आधी त्या ओळीची सुरावट संतूरवर वाजते आणि मग पुढची ओळ ऐकू येते. व्हायोलिन बरोबर वाजणारे सारंगीचे सूर, वाळवंटात मार्गक्रमण करीत असलेला उंटांचा काफिला व तो संधिप्रकाश कापत जाणारा लतादीदींचा आवाज.. "जिंदगी जैसे खोयी खोयी है, हैरां हैरां है ... (पॉज) ... ये जमी चुप है (पॉज) ... आसमा चूप है(पॉज)... ! हे पॉज वाळवंटात एकट्या भटकणाऱ्या रझियाची घालमेल गडद करतात.
'पॉज कि आयडिया तो अमरोही साब की थी', हे खय्याम साहेब प्रांजळपणे सांगतात हा त्यांचा मोठेपणा !!!