Thursday, July 1, 2021

Cheerful stories of Lockdown !


पहिलटकरीण असल्यासारखं मागच्या लॉकडाऊन ला फारच गडबड झाली होती पण या वेळा अनुभवाची शिदोरी कामी आली. घरी पुरेसं गरजेचं सामान भरून ठेवल्यामुळे बाहेर जायचा तसा फारसा प्रश्न येत नाहीये तरी अंडी, फळं, ब्रेड आणि भाजी करता अधून मधून बाहेर जावं लागतंच ना .. त्यातही नक्की सकाळी ९ ते १ वेळ आहे कि ७ ते ११  हा गोंधळ आहेच. दुधाचं दुकान ७ ला उघडतं पण भाजीवाला ८ शिवाय उगवत नाही आणि ब्रेड अंडी बटर वाला पूर्ण झोप झाल्याशिवाय ९ पर्यंत दुकानच उघडत नाही. कशी सांगड घालणार मग एका फेरीत सर्वाची आणि ती घातली व ठरवलं कि ९ वाजता जावं म्हणजे एकाच फेरीत सर्व कामं होतील तर बरोबर पावणेनऊला ९.१५ च्या मिटिंगचा मेसेज येतो. अरे काय हे .... 

मी एक स्टडी केलाय मागच्या लॉकडाऊन पासून .. मागच्या वेळी सगळ्या मिटिंग दुपारी असायच्या. बरोबर.. कामवाल्या बायका नाहीत,सगळं काम घरी त्यामुळे सकाळी सकाळी virtual ऑफिसमध्ये शांतता असायची आणि दुपारनंतर सगळं काही पेटायचं पण या वेळी सकाळीच सगळं काही पेटतं. वेगवेगळ्या मिटिंग वेगवेगळे बॉस सकाळीच का ठरवतात .. एक मिटिंग ९ ला, दुसरी मिटिंग १० ला .. अरे काय चाललंय. नॉर्मल ऑफिस असताना उठतो त्या वेळी उठलं ना तरी आवरत नाही आमचं ९ पर्यंत आणि मिटिंग काय ठरवता यार सकाळी सकाळी ...  

घड्याळांत साडेआठ पावणे नऊ झालेलं असतात तेव्हा मावशी येतात कामाला. 'मी घरी म्हणजे सुट्टीवर' असा ठाम समज झाला आहे त्यांचा तरी मी रोज सांगत असते त्यांना अहो मी घरून काम करते, सुट्टी नाहीये माझी तरी त्यांना काही खरं वाटत नसावं बहुदा . 'ताई घरी हाये तोवर आराम करा थोडा, कशाला दगदग करायची इतकी '.. या वाक्याने सुरू होणारी त्यांची गाडी थांबतच नाही. किती बोलतात त्या.. एरवी मी रोज भेटत नाही त्यामुळे गप्पांचा बॅकलॉग भरून काढतायेत सध्या. एकीकडे पोळ्या, दुसरीकडे भाजीची फोडणी, मध्ये मध्ये लहान मुलासारखं लुडबुड करून 'आज काय आहे ब्रेकफास्टला यम्मी' असे प्रश्न विचारणारी भुणभुण आणि त्यात यांची बडबड. एकदम चुरचुरीत फोडणीत चटपटीत गप्पा आणि हे सगळं कमी म्हणून ऑन टॉप ऑफ इट बॉसनी ठेवलेली सकाळची  ९.३० ची  मिटिंग... बॉसला बायकोला मदत नसते का हो करायची ? रोज प्रश्न पडतो मला. पण विचारताच येत नाही. बरं आमच्या घरी एकीकडे इतकं वातावरण पेटलेलं असताना दुसरीकडे केयुरसर मात्र बाहेर हॉल मध्ये लॅपटॉप घेऊन शांतपणे काम करत असतात. कशाशीच आपला संबंध नसल्यासारखे . टेरेस मधून छान वारं येत असतं , पडदे उडत असतात कसं एकदम कूल .... म्हणजे एकीकडे आमचा डिस्को भांगडा चालू असतो आणि इथे instrumental song .... बॉस साठी राखून ठेवलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मग मला घरातंच मिळतातं  .. 

आता आजचच उदाहरण घ्या. थोडा उशीर काय झाला उठायला तर सगळया गोंधळात गरमागरम पोहे खायचे राहिले,  परत एकदा आयता चहा हवा होता तो पण राहिला आणि मिटिंग ची वेळ झाली. मग आवरून लॅपटॉप उघडून समोर बसले .. अरे वाह अजून येतायेत मंडळी म्हणजे उशीर नाही झाला आपल्याला हे बघून बरं वाटलं. चेहऱ्यावर उगाचच एक smile आलं. मग उठून खिडकीचे पडदे सारखे केले, खोलीचा दरवाजा लोटला आणि आरामात खुर्चीत बसले मिटिंगसाठी. एक एक करत सर्व मंडळी जमली, गुड मॉर्निंग wish करून झालं, एकमेकांची चौकशी झाली, आठवडाभर न भेटलेले रोजचे सवयीचे चेहेरे दिसले, रोज ऑफिस मध्ये करतो ती मजा नाही यांत पण एकमेकांना बघूनही खूप बरं वाटलं. मिटिंग सुरु झाली. 

अवघ्या काही मिनिटांत मी मिटिंग मध्ये बोलत असतांना खोलीचा दरवाजा उघडून कांतेय आत आला. मला वाटलं काही पुस्तक किंवा अभ्यासाचं काही घ्यायला आला असेल. त्यामुळे मी लक्ष नाही दिलं. मी  हेडफोन्स पण नव्हते लावले आणि बोलत होते. तर हा पठ्ठ्या ट्रे मध्ये ग्लास भरून पाणी घेऊन आला होता. एकदम तो बाजूला आला म्हणून मी pause घेतला आणि तेव्हाच " पाणी आणलंय मालकीणबाई "...असं म्हणून ग्लास माझ्या बाजूला ठेवून पसार झाला. मी अवाक झाले. तो एकच वाक्य बोलला पण ते सर्वांनी ऐकलं होतं. ओह गॉड .. सगळे हसायला लागले. " its ok dear, he is so cute, naughty boy, it 's fine, मुलं असं नाही करणार तर कोण करणारं ".. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रियांनी त्या क्षणी मला सावरलं. आणि माझ्या लक्षांत आलं आज कितीतरी दिवसांनी मनापासून इतके खळाळून हसणारे चेहेरे आणि तो सर्वांचा हसण्याचा आवाज आम्ही प्रत्येकानेच अनुभवला होता. 








 

 दाटून कंठ येतो...


काही गाणी आयुष्यातील अवघड वळणांवर पुन्हा नव्याने भेटतात..खरं तर शब्द तेच,भाव तोच,तीच आर्तता,चालही तीच तरी प्रसंगानुरूप अर्थ मात्र अजूनच गहिरा होत जातो,  मनाला स्पर्शून जातो आणि डोळ्यांत मळभ भरून यावं असं काहीसं होतं. असंच आहे शांताबाईंनी लिहिलेलं एक अजरामर गाणं. मागच्या काही दिवसांत परत एकदा ओळख झाली या गाण्याशी .. नव्याने ! कारण या वेळी संदर्भ, परिस्थिती सारं काही बदललं होतं... आणि विचित्र योगायोग, तो पण कसा तर माझ्या बाबांच्या सर्वात आवडत्या गायकाने म्हणजेच श्री.वसंतराव देशपांडे यांनी गायलेले हे गीत राहुल देशपांडे या माझ्या आवडत्या गायकाच्या आवाजात त्याच्या YOUTUBE चॅनेल वर रिलीज होणं व ते सुद्धा बाबा गेले त्याच आठवड्यात आणि तेंव्हाच मी ते ऐकणं ..  'दाटून कंठ येतो.....' 

१९७९ पासून आजवर हे गाणं कितीतरी वेळा ऐकलंय, कधी नकळत कानावर पडलंय पण यावेळी ते ऐकतांना जे वाटलं ते खूप खूप वेगळं होतं.. लग्न झालं तरी एकाच शहरात राहताना बाबांपासून दूर असं कधी जावंच लागलं नाही. मनात आलं कि कधीही घरी जायचं आणि बाबांना भेटायचं इतकं सोपं होतं सारं.. पण सध्याच्या परिस्थितीत हेच इवलसं अंतर कधी मोठं होत गेलं, तेही काही क्षणांत ते कळलंच नाही. निरोप न घेताच बाबा निघून गेले,कायमचे... कोरोना या एका शब्दाने हे अंतर इतकं वाढलं की त्यांना एकदा स्पर्श करण्याचं, जवळून डोळे भरून पाहायचं सुख सुद्धा त्याने हिरावून घेतलं.. 

आपण आई होतांना पोटांत जाणवणारी बाळाची हालचाल किती सुखद असते नाही. त्या नऊ महिन्यात आपल्या बाळाने ऐकलेला आपला आवाज, आपल्या हृदयाची धडधड व आपला स्पर्श 'आई' म्हणून सर्वात आधी आपल्याला आपल्या बाळाशी जोडतो. बाळाच्या जन्मानंतर त्याला बाबाचा स्पर्श,बाबाचा आवाज आणि सहवास मिळायला सुरवात होते. असं म्हणतात मुलं आईच्या आणि मुली बाबाच्या जास्त लाडक्या असतात. खरं तर आपल्या काळजाचा तुकडाच, मग मुलगा काय किंवा मुलगी काय .. पण तसूभर का होईना मुली बाबाच्या जास्त लाडक्या असतात, हेच खरं.मला अजूनही आठवतंय मी लहान असतांना बाबा ऑफिस मधून यायच्या वेळी घराबाहेर पायरीवर बसून बाबांची वाट पाहण्यात काय मजा यायची. कोपऱ्यावर बाबा येतांना दिसले कि चेहऱ्यावर हसू पसरायचं.कधीही 'काय आणू तुझ्यासाठी?' असं बाबांनी विचारलं तर 'फुटाणे आणा' हे माझं उत्तर ठरलेलं. 'अग तेव्हा फुटाणे आणण जमायचं, पैसे नसायचे फारसे जवळ.पण तू कधी खर्चात नाही टाकलंस पोरी मला' असं ती जुनी आठवण सांगताना कातर होणारा बाबांचा स्वर आजही कानात ताजा आहे !

त्या दिवशी राहुल देशपांडे यांच्या आवाजात हे गाणं ऐकतांना अशा कितीतरी आठवणी डोळ्यांत एकदम तरळल्या. माझ्या जन्मानंतर त्या आनंदात माझ्यावर कविता लिहिणारे बाबा, त्यांच लेखन कौशल्य माझ्या ठायी यावं म्हणून मुद्दाम माझं नाव 'कविता' ठेवणारे माझे बाबा मग परत परत मला दिसत राहिले. या गाण्याच्या पहिल्या कडव्यापासून सुरु झालेला माझा बाबांसोबतच्या आठवणींचा प्रवास,आम्ही एकत्र घालवलेल्या अनेक क्षणांना परत एकदा स्पर्श करून आला आणि शेवटच्या कडव्यावर मात्र पुरता अडखळला.. असं वाटलं जे गमावलंय त्याची सावली या गाण्यात डोकावते आहे. 'घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे' ... हि ओळ काही क्षणांकरता बाबांजवळ घेऊन गेली. त्यांच जाणं आपल्याला किती पोरकं करून गेलंय हे सांगून गेली... 'आत्मजा' या शब्दांतील गोडवा खऱ्या अर्थाने ज्याला समजला होता आता तोच आपल्याजवळ नाही पण तरीही जातांना त्याने आपल्याकडून सुखानं राहण्याचं वचन घेतलंय.. 

मराठीत या नात्याचं शांताबाईं इतकं सुरेख,अलवार,नाजूक शब्दचित्र दुसरं कोणीच चितारलेलं नाही. अगदी कमीत कमी वाद्यांच्या संगतीत राहुलच्या आवाजात हे गाणं ऐकतांना आपसूकच डोळे मिटले.. अव्यक्त भावनांना शब्द आणि सूर दोन्ही सापडले..वाटलं,हे गाणं जितकं बाबांचं आहे तितकंच ते माझं पण आहे ...  


 करून तर पहा ..


कालच मैत्रिणीकडे गेले होते, नेहाकडे. महिनाभरापूर्वी तिचे वडील गेले. वडिलांना जाऊन आठवडा होत नाही तोच तिच्या मुलाला आणि नवऱ्याला कोरोना झाला त्यामुळे ती खूप टेन्शन मध्ये होती. कोरोना या शब्दाची भीती बसली होती तिच्या मनांत. पण सगळं व्यवस्थित सांभाळलं तिने. आता दोघेही कोरोना मधून बरे झाले म्हणून आवर्जून ठरवून गेले तिच्याकडे, सर्वांना भेटायला आणि तिच्याशी गप्पा मारायला. वाटलं, इतके दिवस कोणी आलं गेलं नसेल, आपण गेलो तर बरं वाटेल सर्वांना. तिला आवडतात म्हणून मटार करंजी, पायनॅपल शिरा आणि केक टोस्ट घेऊन गेले. तिला सांगितलं, 'आलं घालून वाफाळलेला चहा मात्र तुझ्या हातचा हवा'. खूप खूष होती मी आले म्हणून. मग काय गप्पा झाल्या, खाऊची तारीफ झाली. चहाचे कप घेऊन मग आम्ही दोघी टेरेस वर गेलो. मस्त गार हवा, निळ्या काळ्या रंगांनी भरलेले आकाश, पक्षांचा चिवचिवाट आणि खूप दिवसांनी मिळालेला निवांतपणा .. अजून काय हवं !

माझ्या हातावर हात ठेवून नेहा म्हणाली, 'खूप बरं झालं आलीस' ..तिच्या स्पर्शातून खूप काही समजलं, तिने न सांगताच ! तशा दोन / तीन चकरा झाल्या होत्या माझ्या ते सर्व जण घरीच quarantine असतांना पण भेट नव्हती झाली. दारा बाहेर सामान ठेवून फोन केला होता, 'दार उघडून पिशव्या घे ग खाऊच्या आतमध्ये'.. खरं तर असं सांगताना मला आणि ऐकतांना तिला पण नक्कीच कसं तरी झालं असणार, पण नाईलाज होता. सतत भेटणाऱ्या आम्ही मैत्रिणी आजकाल जी काही भेट व्हायची ती फोन वरच त्यामुळे आपल्याच मैत्रिणीला इतके दिवसांनी प्रत्यक्ष पाहून खूप बरं वाटलं.. जवळपास दिड वर्ष झालं आता, आपल्या सर्वांचच पूर्वीचं आयुष्य हरवून. कधीही वाटलं भेटावं तर आमचं नेहमीच्या जागी कॉफी आणि बरंच काही ठरलेलं .. पण हळूहळू सगळंच बदललं तरी जे समोर आहे त्याला स्वीकारून आपण सर्व जण चालतो आहोतच कि. फोन वरून, झूम कॉल वरून दुधाची तहान ताकावर भागवतो इतकंच त्यामुळे असं प्रत्यक्ष भेटण्यातली मजा काही औरच !! एका गोष्टीचं मात्र खूप समाधान आहे आणि अभिमान सुद्धा कि आम्ही मैत्रिणींनी कोणालाही गरज पडली तेव्हा न सांगता हक्कानं एकमेकींना खूप मदत केली... 'न सांगता' हे सर्वात महत्वाचं, कारण समजून उमजून विचार करून कोणासाठी हक्कानं काही करणं यातलं समाधान जो करतो त्याला आणि ज्याच्यासाठी करतो त्याला सुद्धा खूप काही देऊन जातं हे नक्की ! 

या काळात जसं माणसा माणसांमधली अंतरं कमी झाली तशी काही अंतरं वाढली सुद्धा. प्रत्येकाला सुखद अनुभवच आले असं नाही तर अनपेक्षितपणे काही अनुभव डोळ्यांच्या कडा भिजवून सुद्धा गेले. नेहा म्हणाली, 'अग शेजारी राहणाऱ्या आरतीने फक्त फोन वर चौकशी केली ग, आता महिना होऊन गेला तरी आली नाही भेटायला. आपण इतके शिकलेले, सुशिक्षित लोक आणि आपणच असं वागायचं. खूप वाईट वाटलं. अग, माझ्याकडे काम करणाऱ्या राधाबाई रोज बेल वाजवत होत्या, ताई सांगा काय आणून देवू म्हणून  .. काय बोलू, काही जण माणुसकी पार विसरलेत ग'...

आज नेहाने सांगितले तसे कितीक अनुभव आपण सर्वानीच ऐकले आहेत, अनुभवले आहेत. कोरोना मधून बरं होऊन महिना झाला तरी कामाला येणाऱ्या बाईंना 'त्यांच्याकडे गेलीस तर आमच्याकडे येऊ नको', असं सांगणारी, लिफ्ट मध्ये एकत्र जायला नको म्हणून तोंडावर लिफ्टची दारं लावणारी मंडळी खरंच आपल्या समजण्याच्या पलीकडची आहेत .. अरे निगेटिव्ह रिपोर्ट आलाय , घरी व्यवस्थित sanitization करून घेतलंय आणि मुख्य म्हणजे आता बरं होऊनही दोन / तीन आठवडे झाले आहेत असं असतांनाही अशा सुशिक्षित लोकांकडून या दुखण्यातून बरं झालेल्या रुग्णांना,त्यांच्या कुटुंबियांना मिळणारी हि वागणूक पाहून त्यावर काहीही बोलूच नये असं वाटतं. विविध स्तरांवर हे चित्र कमी अधिक प्रमाणात सारखंच आहे. 'डॉक्टरांची मुलं आहेत ती, त्यांच्याबरोबर नका खेळू, त्यांचे आईवडील रोज जातात हॉस्पिटल मध्ये'.. अशी अगदी लहान मुलांपर्यंत पोहोचलेली या मानसिकतेची झळ फार फार वाईट आहे. 

मागच्या वर्षी आपण सगळेच घाबरलेले होतो. फारशी माहिती नव्हती त्यामुळे पुष्कळ भीती होती मनांत. कालांतराने थोडं चित्र बदललं. लस आली आणि थोडा दिलासा मिळाला. वेळोवेळी शासनाकडून जाहीर होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमुळे आपल्या सर्वांनाच एक प्रकारची मदत झाली. पण दुसरी लाट तिचं भयानक रूप घेऊन आली जे आपण सर्वांनी खूप जवळून पाहिलंय, अनुभवलंय .. आपला आयुष्याकडे पाहायचा दृष्टिकोन संपूर्णपणे बदलून टाकणारी हि लाट सोबत खूप काही घेऊन गेली आणि खूप काही शिकवून गेली. पण आपण खरंच काही शिकलोय का ? असा प्रश्नच पडतो असे कटू अनुभव ऐकले कि .. 

अजून लढाई नक्कीच संपलेली नाही त्यामुळे आपण प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलू यांत ना ..  योग्य काळजी घेऊन आपण आजूबाजूच्या एका कुटुंबाला जरी मदत करू शकलो ना तर त्यातून मिळणारा आनंद खरंच लाख मोलाचा आहे, करून तर पहा !!!

- कविता सहस्रबुद्धे