Wednesday, September 27, 2017

नौदल ....
आज बऱ्याच दिवसांनी रविवारची सकाळ निवांत होती.आम्हा दोघांना ऑफिसला आणि कांतेयला शाळेला सुट्टी, त्यामुळे बाबा कालच इकडे आले होते राहायला. या मस्त हवेत, टेरेस मध्ये येणार कोवळ ऊन अंगावर घेत ; आमच्या चौघांच्या रंगलेल्या गप्पा आणि सोबत कांदे पोहे व मस्त वाफाळलेला आल्याचा चहा...सुट्टीच्या दिवसाची अशी एकदम परफेक्ट सुरवात होती. 
 
बोलता बोलता सहज विषय निघाला आणि बाबांच्या जुन्या आठवणींमध्ये आम्ही सारेच रमलो. वयाच्या १९ व्या वर्षी बाबा भारतीय नौसेनेत कसे गेले इथपासून, तेव्हाची प्रवेश परीक्षा, सुरवातीचे प्रशिक्षण, वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग झाल्यावरती घरापासून दूर राहतानाचे अनुभव,पुण्यात NDA मध्ये असतानाच्या आठवणी, ६२ आणि ६५ च्या युद्धातील अविस्मरणीय क्षण,सिंगापूरला जाऊन त्यांनी घेतलेले सबमरीनचे प्रशिक्षण तसेच INS राजपूत , INS ब्रह्मपुत्रा , INS जमुना आणि INS विक्रांत या  वेगवेगळ्या जहाजांवरचा अनोखा अनुभव आणि INS विक्रांत वर असलेल त्यांच विशेष प्रेम ... सार काही थक्क करणार होतं. आज कांतेय साठी आठवणींचा खजिना परत उलगडत होता. 
 
१९६१ साली माल्टाला ( फ्रान्स / ब्रिटन ) भारतीय नौदलाची विशेष तुकडी पाठवण्यात आली होती. विक्रांत जहाजाची भारतीय नौदलाशी झालेली ती पहिली ओळख. तेथे ते जहाज कमीशन झाले म्हणजॆ आपल्या ताब्यात आले. नौदलाच्या त्याच तुकडीत बाबा होते. INS विक्रांत वरून माल्टा ते मुंबई हा त्यांनी केलेला विक्रांतवरचा पहिला अविस्मरणीय प्रवास.......आयुष्यात इतक्या सुंदर आठवणी बाबांना भारतीय नौसेनेने दिल्या होत्या ज्याची झलक आजची त्यांच्या डोळ्यांत दिसत होती. 

तेव्हा काळाची गरज म्हणून कमावणं गरजेचं होत, कुळकायद्यात शेत जमीन गेलेली, नोकरी नाही, भावंडांत मोठं असल्याने  कुटुंबाची जबाबदारी होती. अशा परिस्थितीत समोर दिसला एकच मार्ग.. अर्ज केला. परीक्षा दिली आणि निवड सुद्धा झाली. एका लहान गावातून अनवाणी निघालेला 'तो' नौदलात दाखलहि झाला. पहिल्याच दिवशी मिळाले तीन प्रकारचे युनिफॉर्म आणि प्रत्येक युनिफॉर्म बरोबर घालायचे वेगवेगळे बुटांचे तीन जोड .... ते पाहून 'त्याच्या' डोळ्यांत टचकन पाणी आलं. अनवाणी पायानी इथवर येऊन , जणू सर्व प्रश्नाची उत्तर 'त्याला' इथेच मिळाली. आता सोबत होती ती निळ्या आकाशाची , अथांग सागराची आणि त्या बोटींची. क्षितिजावर खूप सारी स्वप्न होती आणि मनात ती पूर्ण करण्याची धडपड. एक एक पाऊल पुढे टाकत खुप लांबचा पल्ला गाठला पण सुरवात कोठून केली हे 'तो' कधीच नाही विसरला.
 
योगायोगाने भारतीय नौसेना सप्ताह सुरु होता. NDA मध्ये बाबा १९५८ साली होते म्हणजेच ५८ वर्ष झाली होती NDA सोडून. काय हा योगायोग ...  हाच धागा पकडून आम्ही बाबांना त्याच जागी घेऊन जायचे ठरवले जिथे त्यांच्या आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी होत्या. घरापासून अर्ध्या तासाचे अंतर होते आणि त्या अर्ध्या तासांत बाबा मात्र अठ्ठावन्न वर्ष मागे जावून पोहचले होते.तेव्हाच चित्र आणि आजच चित्र यांत खूप बदल झाले होते आणि बाबा तेच बदल डोळ्यांत साठवत होते.
 
इतका जुना ऑफिसर आलाय हे समजल्यावर त्यांना भेटायला साहजिकच तेथील काही ऑफिसर आले आणि पाहता पाहता काही क्षणात तेथील वातावरण एकदमच बदलून गेले. बाबांच्या काळातील गोष्टी विचारण्यात ते ऑफिसर आणि त्या सांगण्यात बाबा अगदी रमून गेले. शरीराने थकलेला जीव पण अजूनही तीच ऊर्जा , तोच अभिमान आणि तोच गर्व. जणू आज खऱ्या अर्थाने बाबा त्यांच्या 'फील्ड' वरती होते. त्या सर्वांचे हावभाव, बोलण्यातील जोश , चेहऱ्यावरचा आनंद मी डोळ्यांत साठवत होते. त्या सर्वांच्या गप्पा अशाच रंगत गेल्या. त्या काही वेळात बाबा जणू 'ते' आयुष्य परत जगले.
 
अखेर निघायची वेळ झाली. सर्वांशी हस्तांदोलन करून बाबा निघाले. आम्हाला सोडायला गाडीपर्यंत एक ऑफिसर आवर्जून आले. गाडीत बसतांना एक क्षण थांबून बाबा मागे वळले आणि म्हणाले,'कभी जरुरत पडे तो बुला लेना,आ जायेंगे,' तेव्हा मात्र तो ऑफिसर एकदम भारावून गेला. एक कडक सॅल्यूट मारून पुढे आला आणि बाबांना त्यांनी नमस्कार केला . नि:शब्द होवून आम्ही फक्त पाहत राहिलो. खूप विलक्षण, खूप वेगळा अनुभव होता तो. आजच्या दिवसानं बाबांसारखच मला पण खूप काही दिल. नक्की काय, हे शब्दांत मांडता येण्याच्या खरंच पलीकडचं होत.... 
 
 

मैत्रीचं  गणित

आम्ही डझनभर  मैत्रिणींनी एक खास बेत आखला होता, मैत्री दिनाचा. खरं तर 'आमची मुलं' हा एक धागा होता आम्हाला एकत्र आणणारा. आजवरच्या  आयुष्यात मैत्रीची समजलेली व्याख्या , मैत्रीची गरज, मैत्रीच महत्व, मैत्रीतील अनुभव प्रत्येकीच्याच बरोबर होते. आमच्या मुरलेल्या या मैत्रीत आमच्या मुलांची मैत्री मात्र एकदम ताज्या लोणच्याप्रमाणे करकरीत होती, आंबट, गोड, तिखट अशा सगळ्या चवींनी परिपूर्ण. त्यांच्या निरागस, अवखळ, धांदरट वागण्यात अजूनही लहान असल्याची झाक होती. मोठं होणं त्यांना जमलंच नव्हतं जणू. अजूनही आपल्याच विश्वात रमलेली, आयष्यातील वेगवेगळ्या स्तरावरील  स्पर्धेपासून कोसो दुर होती ती. बाहेरील जगात काय चालू आहे याचा पुसटसाही स्पर्श अजून त्यांना शिवला नव्हता. त्यांच्या याच निरागसपणाला आम्ही आमची ' थीम ' बनवली. त्यांच्या मनातील सप्तरंग आम्ही आमच्या कपड्यांवर उतरवले आणि त्यांच्या बालपणातील अनेक अविस्मरणीय आठवणी आम्ही नव्याने त्यांच्यासमोर उलगडल्या.

शाळेत पहिल्यांदा ओळख झाल्यापासून आजवर त्यांनी अनुभवलेल्या अनेक क्षणांना एका खास 'फोटो फिल्म' मध्ये बांधण हा एक अनोखा अनुभव होता, जो त्यांना खूपच भावला. "येsss  दोस्तीssss  हम नही छोडेंगे, तेरे जैसा यार कहाँ , पासून ते आजच्या दिल दोस्ती दुनियादारीssss या गाण्यांनी बॅकग्राऊंडला एकदम झक्कास माहोल निर्माण केला. त्यांना त्या आठवणी एन्जॉय करताना पाहून आमच्या मात्र डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या.

आपण लहान मुलांना अनेकदा त्यांना समजेल अशा सोप्या शब्दांत अर्थ सांगत असतो. पण अशा गोष्टी लक्षात ठेवून ते ह्या गोष्टी कोठे वापरतील याचा नेम नसतो. त्यांच्या लहानपणीची आठवण त्यांनाच सांगून 'ओळखा पाहू कोण हा ', हा खेळ खेळताना याची प्रचिती आली.

एका मुलाने लिहिलेल्या गणेशोत्सवाच्या निबंधातील काही ओळी मी वाचून दाखवल्या ... "आम्ही कोकणस्थ म्हणून आमचा गणपती दिड दिवसाचा असतो. गणपती येतात त्या दिवशी आई उकडीचे मोदक करते. भरपूर तूप घालून मोदक खायचे आणि तंगड्या पसरून झोपायच, असा बेत असतो. दुसऱ्या दिवशी विसर्जनाला गेलं कि खूप घारी गोरी माणसं भेटतात. गणपती विसर्जन करून आल्यावर मला अजिबात वाईट वाटत नाही कारण मग दुसऱ्यांच्या घरी खिरापतीला जाता येतं आणि देखावेही पाहता येतात."

इतक्या निरागसतेने असा खरा खरा निबंध आपण तरी लिहू का ? हि वाक्य ऐकून प्रत्येक जण खळखळून हसत होता आणि जेव्हा मी विचारलं,' ओळखा पाहू , या निबंधाचा लेखक कोण ?' तेंव्हा  'हा मानसच' असा जल्लोष  झाला कारण वर्गात बाईंनी हा निबंध आवर्जून वाचून दाखवला होता सर्वांना.

पुढची आठवण अजून थोडी वेगळी. खरं तर कोणालाच हि गोष्ट माहित नव्हती. पाचव्या वर्षी आईशी खेळतांना, बाजूला बाबा लॅपटॉप वर काम करत असतांना " आई, बाबा देवाघरी गेले कि त्यांचा फोटो कुठे लावायचा ?" हा प्रश्न आईला विचारणारा तो कोण ; हे मात्र मुलांना ओळखता आलच नाही. जेव्हा हा प्रश्न पडणारा तो सौमिल आहे असं सांगितलं तेव्हा मात्र, "अरे सौमिल तुला तेव्हा पण असेच प्रश्न पडायचे का ?" असा एकच ओरडा मुलांनी केला.

दुसरीत असतांना वर्गात मोर हा निबंध शिकवला होता. परीक्षेत मात्र  बैल या विषयावर निबंध आला. तरीही अजिबात न डगमगता , " बैलाला पाऊस आवडतो. पिसारा नसला म्हणून काय झालं , पाऊस आला कि बैल शेपटी वर करून थुई थुई नाचतो ," हे लिहिणारा कांतेय आता स्वतःही पोट धरून हसत होता.

सोसायटीत 'ती' एकच मुलगी होती म्हणून रामायणांत नेहमी तीच सीता व्हायची. एकदा ती बाहेर जात असतांना 'सीता शॉपिंग ला चालली म्हणून आज रामायण होणार नाही' असं पळत पळत सर्वांना ओरडून सांगणारा हनुमान तसा दुर्मिळच. हि आठवण सांगितल्यावर अनुष्का मात्र एकदम सीता म्हणून फेमस झाली.

'माणसाला घर बांधायला आर्किटेक्ट , मजूर आणि बिल्डर लागतो पण पक्षी हात नाहीत तरी फक्त आपल्या चोचीने आपल्यासाठी घरट बांधतो', इतकी मोठी गोष्ट सहजपणे हिच मुलं लिहूनही जातात.

आज मुलं जशी त्यांच्या बालपणात रमली तशी प्रत्येक आई बाबांची जोडी सुद्धा परत भूतकाळात गेली, आठवणींच्या जगात थोडं फिरून आली.निरागसता या शब्दाचा अर्थ हे अनुभवताना जणू नव्यानं उलगडत होता. आज अगदी मनापासून वाटलं , मुलांनी मोठं होऊच नये. त्यांच्या निरागस आयुष्यात त्यांनी आणि आपण असंच रमाव.

मैत्रीदिन हे एक निमित्त होतं, एकत्र येण्याचं. आज गुरुवार होता, उद्या शाळा होती, ऑफिस होत तरी प्रत्येक जण आपलं काम ऍड्जस्ट करून वेळेत हजर होतां कदाचित मैत्रीचा हवा असलेला कोपरा प्रत्येकालाच गवसला होता. अभ्यासात माहीत नाही पण इथे मात्र मैत्रीचं हे गणित खूपच पक्कं झाल होतं... 

Monday, September 18, 2017


इंजिनियर डे !!



शनिवारची सकाळ ... अगदी निवांत. शाळा नाही, ऑफिस नाही, डब्याची घाई नाही. आज याचं ऑफिस होत खरं पण डबा नव्हता त्यामुळे एकदम आरामात सर्व काही चालू होतं. सकाळी सकाळी नवऱ्याने चहा तयार म्हणून उठवाव, यापेक्षा छान दिवसाची सुरवात अजून काय असावी. चहा पिऊन, आवरुन तो ऑफिस ला निघाला तरी मी मात्र पेपर पसरुन वाचत होते. चहा झाला, पेपर वाचला, पुरवणी सुद्धा सगळी वाचून झाली. आता मात्र घड्याळाचे काटे मला पुढच्या कामाची सूचना देऊ लागले. शेवटी एकदाची उठले. कप विसळले, वॉशिंग मशीन सुरु केल, कांतेयला उठवल, नाश्ता तयार केला...परत एक कप चहा केला. कांतेय ला कॉफी करून दोघांनी गप्पा मारत नाश्ता केला. मग थोडा वेळ Whats App वर सगळे ग्रुप उठले आहेत कीं नाही ते चेक केलं. आता काय कराव हा विचार करत होते तर दारावरची बेल वाजली. 

कांतेयनी दार उघड़ताच दोन वीस बावीस वर्षाची मुलं दारात उभी. त्यांच्या हातात ड्रिल मशीन आणि काही सामान होत. कांतेय नी काही विचारेपर्यंत ते घरात आले. गॅस पाईप च काम सोसायटी मधे सूरु असल्याने तेच काम करायला हे आले असणार असा विचार करेपर्यंत त्यांनीच आपणहुन सांगितल की ' गॅस पाईप का काम करने आये हैं।'


'अच्छा हुआ आप आए। अभी मैं वॉचमन को बताने हि वाली थी की आप को ढूंढकर भेज दे'। रोज ऑफिस मुळे हे काम राहतच होतं. आज घरी आहे तर हे काम करून घ्याव का नको; हा विचार करतच होते मी. इतक्यात  घरकाम करणाऱ्या सविताची सुद्धा तेव्हाच एंट्री झाली. ती म्हणाली, 'ताई ते येवून गेले होते परवा, तुम्ही घरी नाही म्हणून मी काम करू दिल नाही. बर झाल असत तुम्हाला अदुगर विचारल असतं तर, मीच करुन घेतल असत. खुप कचरा होतो हे काम करतांना, माहित असतं तर मी तेव्हाच सर्व करुन घेतल असतं, तुम्ही येई पर्यंत साफ़ बी करुन ठेवल असत. आता बर झाल, माझ्या कामाच्या आधी आले हे. जल्दी जल्दी करो भैया।' मी काहिहि बोलायच्या आधी त्यांनीच सर्व काही ठरवल.मग आमची वरात स्वयंपाक घराकडे वळली. 

 'कहाँ लगाओगे पाईप ? ड्रील कहाँ पे करोगे ? पाईप कहाँ से आयेगा ?' या माझ्या प्रश्नांवर त्यांनी मला सर्व काही नीट समजावल. ओट्याच्या मागील भिंतीवर असणाऱ्या टाईल्स पूर्ण भिंती वर नसून वरच्या अंदाजे 2 फुट जागेवर नाहीत. गॅस साठी पाईप येण्याकरता त्यांनी सांगितलेली ड्रिल ची जागा टाईल्सवर असल्याने तिथे ड्रिल न करता एक फुट वरती भिंतीवर ड्रिल कराव, अस मी त्यांना समजावत होते.त्यावर 'नहीं नहीं, इधर ही ड्रिल करेंगे। उधर बीम हें।सब के यहाँ इधर ही ड्रिल किया हूँ।' अस उत्तर आल. 'अरे, बीम इस तरफ हे, मैं आपलो यहाँ बोल रही हूँ करने के लिए, आप बोल रहे हो ना उसके सिर्फ एक फिट ऊपर'..

'नहीं नहीं, पानी का पाईप टूट जायेगा उधर।' मला काही समजेना पाण्याचा पाईप तर तिथे नाहीए. 'अरे, भैया आप बोल रहे हों ना बस उसके थोडा ऊपर तो हें, वहाँ कहाँ हैं पानी का पाईप ?' 'अरे दिदी, नीचे के घर पर जाके देखो. सबके घर यहीं पे बिठाया हें '.. असं म्हणून त्याने मला, मी त्याच ऐकाव असं सांगितल. " रुको फिर, मैं आती हूँ देखकर," म्हणून खालच्या फ्लॅट मधे पाहुन आले.

मी परत आले. ' देखा न दिदी, झूठ थोड़े न बोले हें '... मी पण कबुल केल, 'हां भैया, ठीक हें आप कि बात. फिर भी ड्रिल करते समय टाईल् टूट गया तो?' त्यावर तो म्हणाला, ' उनका तोडा क्या, आपका कैसा तोड़ेंगे'.. तरीही माझी शंका होतीच, 'उनका नहीं टुटा मतलब हमारा भी नहीं टूटेगा क्या ? टुटा तो वो भी आप को लगाना पड़ेगा फिर'.मी सर्व जबाबदारी त्यांच्यावरच सोपवून दिली. ' अरे दिदी, रुको। हमारे इंजिनियर को बुलाएँगे अभी । आप जहाँ बोले हो वहा ड्रिल करना या नहीं उसका फैसला वह करेंगे, वो बोलेंगे तो सुनेंगे। आपका नहीं सुनेंगे। हम इधर ही ड्रिल करेंगे।' अस म्हणून त्यानी त्याच्या इंजिनियर ला फ़ोन लावला.

आता काय करायच, याचा फोन लागत नव्हता आणि लागला तरी त्याची महत्वाची मिटिंग होती त्यामुळे फोन घेईल कि नाही हि शंका होतीच. शेवटी ,बाजूच्या मैत्रिणीच्या घरी गेले, बेल वाजवली. तिचा नवराहि घरी नव्हता पण अजिंक्य , तिचा मुलगा होता. हुश्य , निदान तो तरी सापडला. नुकताच मेकेनिकल इंजिनियर ची पदवी फर्स्ट क्लास ने उत्तीर्ण झालेला. त्याला सांगितल, 'अरे चल जरा काम आहे, तो गॅस पाईप बसवायला आलाय, जरा बोल ना तू त्याच्याशी', त्यावर तो लगेच आला. 

'लो भैया, ये भी इंजिनियर हें, इसको बताओ, मुझे जो कुछ नहीं समझता वो इसको समझेगा '. तो हसला, 'अरे दिदी'..  हि दिदी साक्षात् तिच्या इंजिनियरला आपल्या समोर उभ करेल असं वाटल नसाव त्यांना. मग दोघांच्या इंजीनियरिंग नॉलेज ची प्रचिती त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आली. शेवटी ' अग, मावशी तिथेच कराव लागेल ड्रिल जिथे तो म्हणतोय', असं अजिंक्यनी सांगताच मी शरणागती पत्करली. तरीही 'ड्रिल करते समय टाइल टुटा तो ', या शंकेवर मी कायम होते. 'दिदी, इंजिनियर नहीं भरेगा टाइल का पैसा, हमको देना पड़ेगा।' त्यावर 'चलो जाने दो,ध्यान से करो काम,नहीं टूटेगा टाइल' अस त्यांना धीर देत मी मलाच समजावल. कदाचित त्याला हुश् झाल असाव. अजिंक्य तिथेच होता आणि पाहतं होता जे काही ते करतायेत ते बरोबर आहे ना , कारण मावशीने ज्या पद्धतींनी बोलावलं होतं त्या प्रमाणे त्या वेळी फक्त त्याच्यावरच विश्वास होतां तिचा.  

त्यानी सांगितलेली ड्रिलची जागा कशी योग्य आहे, हे जेव्हा पहिल्यांदा त्याने सांगितलं तेंव्हा मी त्याच ऐकल नाही याची सल अजूनही त्याला टोचत असावी बहुदा. शेवटी आपल मन मोकळ करुन तो म्हणालाच, 'दिदी, देखो, हम इंजिनियर नहीं हे पर उसका सब काम कर सकते हें। पढ़े नहीं ना, डिग्री नहीं हे हमारे पास , बस, इसलिए'... मी एकदम गप्प झाले, काय बोलू त्यावर.अगदी खर बोलत होता तो. मी म्हटल 'अरे भैया मैं पढ़कर भी कहाँ जान पायी आप क्या बोल रहे हों, इसीलिए मुझे आपली बात समझने के लिए इंजिनियर को बुलाना पड़ा , इसका मतलब आप भी इंजिनियर हो',अस म्हणताच तो हसला... 
खऱ्या अर्थाने ' इंजिनियर डे ' च्या शुभेच्छा मी माझ्या समोर उभ्या असलेल्या दोन्ही इंजिनियर्स ना एक दिवस उशीरा का होईना पण मनापासून दिल्या होत्या..फरक फक्त डिग्रीचा होता !!!


- कविता

Thursday, September 7, 2017

आठवणींच्या पावसांत या
भिजली माझी गाणी ग
ओघळला तो शब्द नि शब्द
कागद कोरा उरला ग
काय करू .... सांग सखी गं
तो अवचित बरसून गेला ग

तृणपात्यांवर कोसळला तो
मनांत बरसून गेला ग
क्षितिजावरती रंग सावळा
ठेवून मागे गेला ग ,
काय करू .... सांग सखी गं
तो अवचित बरसून गेला ग

रंग मनाचा अन् क्षितिजाचा
अवघा एकचि झाला ग
इथे सावळा तिथे सावळा
हरवून मजला गेला गं
काय करू .... सांग सखी गं
तो अवचित बरसून गेला ग....