माहेर
'माझे माहेर पंढरी.. आहे भिवरेच्या तीरी '.. लहानपणी ऐकलेल हे गाणं. तेव्हा याच गाण्याने भीमसेनजींच्या आवाजाची ओळख करून दिली आणि दुसरी ओळख झाली 'माहेर' या शब्दाशी. तेव्हा त्या शब्दाचा अर्थही समजत नव्हता आणि "करी माहेरची आठवण ssss " मधील आर्तता सुद्धा ...
" घाल घाल पिंगा वाऱ्या , माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची , कर बरसात "....
आज हे गाणं ऐकताना डोळे भरून आले. सुमन कल्याणपुरकरांचा आवाज ... जितके वेळा ऐकलं तेव्हा प्रत्येक वेळी मन मात्र 'माहेर' या शब्दावरच अडखळल.
आजकाल WA, facebook, skype , VIDEO CALL च्या जमान्यात आई फक्त एक कॉल , एक मेसेज दूर असते. हवी तेव्हा भेटते , हवं तेव्हा तिच्याशी बोलता येतं , तिला पाहता येतं. पण आपल्या आईसाठी, आजीसाठी हे इतक सोपं नव्हतं आणि म्हणूनच कदाचित त्या वेळी ते गाण्यातून व्यक्त केलं गेलं.
आईला भेटण्यासाठी आतुरलेल्या मनाला वाऱ्याबरोबर निरोप द्यावा लागे..
'' सुखी आहे पोर सांग आईच्या कानांत... माहेरीच्या सुखाला ग मन आसवलं "...
तर कधी पाखराला सांगावे लागे,
"माझिया माहेर जा , रे पाखरा माझिया माहेरा जा
देते तुझ्या सोबतीला आतुरले माझे मन
वाट दाखवाया नीट
माझी वेडी आठवण,
तुझी ग साळुंकी आहे बाई सुखी,
सांगा पाखरांनो तिचिये कानी एवढा निरोप माझा "..
माहेरची ओढ इतक्या सुंदर शब्दांत व्यक्त झालेली अजून कुठे सापडणार नाही.
हि गाणी ऐकल्यावर आठवत आईचं माहेरपण. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबा आणि मामाकडे तर दिवाळीच्या सुट्टीत बाबांच्या गावाला आजीकडे जाण्याचा कित्येक वर्षांचा नेम होता.
दर महिन्याला आजोबांचं येणार पत्र , त्यावर आईच उत्तर म्हणून अजून एक पत्र, दर सुट्टीत गेल्यावर आजोबांनी आईसाठी घेतलेली साडी, भाऊबीजेला न चुकता येणारी मामाची भाऊबीजेची मनिऑर्डर आणि प्रत्येक वेळी निघताना भरून येणारे आई आणि आजोबांचे डोळे ... हे कधी चुकल नाही, नेहमी असच घडत गेलं.
कदाचित त्या काळी एवढी मोकळीक नव्हती. चालीरीती, परंपरा आणि प्रत्येक नात्याची एक ठरलेली सीमा .. कर्तव्याची जाणीव, प्रेम होतच आणि त्याच बरोबरीने आदरयुक्त भीती सुद्धा. त्यामुळे सासर आणि माँहेर या दोन व्याख्या अगदी स्पष्ट होत्या आणि त्या तशाच जपल्या हि गेल्या.
' माझिया माहेरा जा , पाखरा ... माझिया माहेरा जा ' हे जोत्स्ना भोळेंच्या आवाजातील गाणं ऐकताना 'माहेर' या शब्दातील गोडवा जरा अजूनच वाढला.
आपण कितीही मोठ्या झालो तरी ती ओढ मात्र अजूनही आपले डोळे ओले करतेच कारण ' भातुकली ते पाठवणी ' पर्यंतचा आपला तो प्रवास त्या एकाच शब्दांत सामावला आहे ........