Monday, June 27, 2016

मैत्री

एक स्ट्रॉन्ग कॉफी,
मस्त छान वाफाळलेली
कयानीच्या केक सोबत,
मैफल गप्पांनी रंगलेली

वेळ काढून भेटण्यात,
खरंच वेगळी मजा असते
मन मोकळं करायला,
हिच सोबत हवी असते

मैत्री म्हणजे शब्दांशिवाय,
कधी मन जाणून घेणं
कौतुकाची थाप देवून,
एकमेकांना आधार देण

आनंदात तर येतात सारे,
दुःखात मैत्री धावून येते
न मागता न सांगता,
खूप काही देऊन जातं

निखळ मैत्रीत अजून,
सांगा बर काय हवं ?
शब्दांत सांगता न येणारं,
ते हळवं नातं खरं .....
 

Monday, June 13, 2016


' अल्लड पाऊस '

चिंब ओले आसमंत, वाहे अल्लड हा वारा 

मुक्तपणे बरसला, गर्द मेघांचा हा थवा 

साद गंधातून नवी, ओल्या मातीतून आली

भिजे आभाळ ते निळे अन् पायवाट जूनी  
              
अशावेळी उगा वाटे, पुन्हा पावसांत जावे 

रिमझिम त्याच्यासवे, थोडे आपणही गावे 

निथळती झाडवेली, इंद्रधनू अंबरात 
 
साठवून ओंजळीत, घ्यावे सतरंगी क्षण …
 

Saturday, June 4, 2016

' आईचा फ़ोन  '

आताशा या फोनवर
तुझा आवाजच येत नाही,
'कशी आहेस ?' म्हणून तू
विचारपूसही करत नाहीस

मी लावून सुधा हा फोन
तुझ्यापर्यंत पोहचत नाही
आई, तुझ्याशी आता
मला बोलताच येत नाही

रोजचा तुझा एक फोन,
आतां सारखा आठवत राहतो
अजूनही तो आवाज तुझा,
माझ्या या कानामध्येच राहतो

मनामध्ये दाटलय खूप,
आतां मनात मावत नाही,
तुझ्यानंतर बोलायला
मला मात्र कोणीच नाही

का इतक्यात गेलीस तू ?
अजून खूप बोलायच होतं
'नंतर बोल, आधी खावून घे'
असं अजून ऐकायच होतं

तू नाहीस म्हणून आतां,
फोटो तुझा बघत असते
बाबा म्हणतात 'फोटो का?',
तुझी आई तर इथेच असते

खर सांगू आई तुला ,
तू खूप काही घेऊन गेलीस
अन् जातां जातां एका क्षणांत
मला मोठ करून गेलीस ….