Saturday, April 30, 2016

कॉफी आणि बरंच काही ... 


आज सकाळी सकाळी चक्क विवेकचा फोन आला आणि तेही ' संध्याकाळी कॉफी ला सगळे भेटू, ग्रुप वर टाक ' या आदेशासकट. मी फक्त ' सूर्य आज कुठे उगवला ' असं म्हणेपर्यंत त्याने फोन ठेवला सुधा, किती हि घाई.     'काय झाल आज याला, काही काम आहे कि सहज भेटायचं आहे ', असे अनेक विचार मनात डोकावून गेले.

विवेक माझा शाळेपासूनचा मित्र. शाळा सोडून पंचवीस वर्ष होऊन गेली पण शाळेने दिलेला मित्र मैत्रींणींचा ठेवा आजही बरोबर आहे आणि म्हणूनच आत कुठेतरी लहानपण अजूनही जिवंत आहे. 'बावळट, मूर्ख' सारखे शब्द आजही यथेच्य विहार करू शकतात या मैत्रीत आणि याच मैत्रीच्या हक्काने काहीही मागू शकतो एकमेकांकडे,  नाहीतर बायकोलाही आणली नसेल पण मैत्रिणींसाठी अमेरिकेहून 'पर्स' आणि जपान वरून 'बाहुली' आणणारे हे मित्र तसे दुर्मिळच.

मिळालेल्या आदेशाचे पालन करून मी ग्रुप वर मेसेज टाकला व रात्री आठ वाजता नेहमीच्या अड्ड्यावर ठरल्या प्रमाणे सारे पोहोचले. नेहमीप्रमाणे मी सर्वांत आधी आणि नंतर नीरज, ललीत विवेक व अर्चना सर्वात शेवटी येणार हे कायमचं ठरलेल. कितीही बोललं तरी उशिरा येण्याची सवय अर्चना काही सोडत नाही. 

खर तर वयानं मोठे झालो होतो पण या कॉफ़ीच्या नावाखाली अधून मधून लहानपण जगत होतो आम्ही. रोजच्या धावपळीत आणि कामाच्या व्यापात ते निवांत क्षण वेगळी ऊर्जा द्यायचे. महिन्यातून एकदा भेटायचं हे ठरलेलं आणि जमलंच तर अधे मध्ये पण ठरवून भेटायचो. कधी खूप कंटाळा आला म्हणून तर कधी वीकएंड ला चालायला जायचं आणि वैशाली रुपाली मध्ये नाश्ता करायचा हे ठरलेलं. 

"काय झाल रे आज अचानक ' तू ' बोलावलस कॉफीला ?" विवेकला आमचा प्रश्न अपेक्षित होताच. " दोन वर्ष ऑफिसच्या कामाकरता लंडनला जायला सांगितले आहे, अजून तारीख नाही ठरली पण कदाचित महिना अखेर पर्यंत जावं लागेल." एकदम गुगलीच टाकली याने आल्या आल्या. इतक्यात अर्चना म्हणाली, "अरे वा, भारीच कि". नीरज म्हणाला " किती मोठा प्रोजेक्ट आहे? तुझा रोल काय ? तोच कि काही वेगळं काम आहे?" याचे प्रश्न पण एकदम त्याच्याच सारखे असायचे, स्कॉलर स्टाईल. ललित म्हणाला, "अरे सतीश आहे लंडन ला, कोणीच नाही अस नाही रे", पार लंडनला पोहोचला पण हा विचारांत. "अरे एकटा जातो आहेस कि सर्वांना नेतोयेस ? मुलांच शाळेच काय ?आई येणार आहे ना तुझ्याबरोबर ?", माझे प्रश्न एकदम सुटसुटीत होते. 

सर्वांचे इतके सारे प्रश्न ऐकून विवेक गोंधळून गेला. "अरे हो हो, किती बोलाल ? दम खा जरा. मी जाणार नाहीये", आतां यॉर्कर होता हा विवेकचा . " ए बावळट काय चालू आहे तुझ ? नक्की सांग काय ते " अर्चना तिच्या अंदाजात सुरु झाली. हैप्पी गो लकी आहे ती . मला मात्र समजेना हा विवेक नक्की काय बोलतोय. समजायला जरा तसा  अवघडच आहे तो. इतकी वर्ष झाली तेव्हा आता कुठे त्याचा अंदाज येत होता पण तरी खोली मात्र सापडली नव्हती.

"अरे मला नाही जायचं, कंटाळा आला आहे यार असं कधी एक, तर कधी दोन वर्षांकरता बाहेर जायचा. मुलांचा शाळेचा विचार करून त्यांना इथे ठेवल तर तिकडे मी एकटा. नाही करमत त्यांना आणि मलाही. किती दिवस असं रहायच ? आता नको, बास." विवेकच हे रूप नवीन होत. आत कुठेतरी त्याची चाललेली घालमेल आज त्याच्या चेहऱ्यावर दिसतं होती.

करियर साठी नोकरी मध्ये धावतां धावता हातून निसटलेल्या किती तरी लहान सहान गोष्टी आयुष्याच्या एका वळणावर एकदम दिसू लागतात तसं काहीसं झालं होतं त्याचं. एकीकडे मिळालेल यश तर दुसरीकडे हरवलेले काही अमुल्य क्षण !! खरं तर यात तुलना होऊच शकत नाही पण नकळत जेव्हा आपलंच मन हि तुलना करू लागत तेव्हा विचारांचा गुंता होऊन जातो. 

विवेकच बोलण ऐकलं आणि क्षणभर सगळेच गप्प झाले. अशा वेळी विचार करून बोलणारा एकच जण होता इथे आणि तो म्हणजे, नीरज. आमचा ग्रुप उगाच नाही स्कॉलर म्हणायचा त्याला. नीरज म्हणाला, ' शांत हो अरे, कुठून कुठे पोचलास. नाही जायच ना, तर सांगून टाक बॉसला. तुला जे वाटतं आहे ते  बरोबर आहे कि नाही हे शोधायची गरज काय ? दुसरा कोणी जाऊ शकेल ना या प्रोजेक्ट वर ? मग झालं तर…'  बापरे एका मिनिटात प्रश्न सोडवला होता नीरजने. ते ऐकून सुद्धा किती बरं वाटलं. एक यशस्वी सर्जन होऊ शकला असता नीरज असं मला नेहमी वाटतं इतकी स्थिरता आहे त्याच्या विचारात आणि आचारात सुधा. त्याच्या याच गुणाने कदाचित वयाच्या पस्तिशीत नोकरी सोडून स्वत:ची कंपनी सुरु करण्याची हिम्मत त्याला दिली असावी.

" वेडा आहे का तू विवेक ? अरे असे चान्स परत परत येत नसतात. जावून ये कि ? काय होतं. हे शाळेचं वर्ष  संपल कि घेऊन जा मुलांना. मस्त एन्जॉय कर", अर्चनाने तो माहोल जरा हलका केला. तिचं बोलण सुरु झाल कि गप्प बसाव लागत इतक्या स्पीड ने सुरु होते तिची गाडी. "अरे, चाळीशी आल्यासारखा काय करतोयेस ? आणि आली असली तरी तसं वागायचं नसत. तू जा, मागून आम्ही येऊ. मग जाऊ आपण सगळे युरोप ट्रीपला, आपल नेक्स्ट गेट- टूगेदर तिकडे, काय मस्त आहे कि नाही कल्पना"..  कोणाच काय तर कोणाच काय. आता मात्र विवेकला काय बोलावं सुचेना, चीड चीड झाली त्याची. 

ललित त्याच्या नेहमीच्या शैलीत हसतं होता. त्याची परीस्थिती काही वेगळी नव्हती. बारा बारा तास कंपनीत तोही असायचाच कि आणि तेही कमी म्हणून रात्री घरून पण काम करायचा. त्यामुळे विवेकच बोलणं त्याला समजतं होतं आणि पटतं सुद्धा होतं. त्यामुळे 'जे ठरवशील ते नीट विचार करून ठरव', हा त्याचा सल्ला अगदी योग्य होता.

मी शांत होते. काहीच बोलले नाही. चाळीशी ओलांडली कि विचारांत घडत असलेला बदल मी स्वतः अनुभवत होते. आयुष्याकडॆ कृतज्ञतेने बघता आलं पाहिजे हा प्रयत्न करत होते. कुटुंबाबरोबरच आपल्या सोबत असलेले आपले मित्र मैत्रिणी किती महत्वाचं हे मी अनुभवत होते. वेळप्रसंगी असलेला त्यांचा आधार,व्यक्त होण्यासाठी असलेली हक्काची जागा, एकमेकांबरोबर मोकळेपणाने होणारे संवाद, लुटुपुटुची भांडणं यांनी आपलं आयुष्य किती समृद्ध आहे याची लख्ख जाणीव होत होती. त्यामुळे मी त्याला मन जे सांगेल तेच कर हा सल्ला दिला.  


इतक्यात ऑर्डर दिलेली कॉफी आली. आज कॉफी पिताना पहिल्यांदा जाणवल कि टेबल वर आलेल्या कॉफी मध्ये बरेच फ्लेवर होते; मोका, कॉल्ड कॉफी, आयरिश कॉफी, कॉफी विथ आइसक्रीम आणि साधी फिल्टर कॉफी सुधा. प्रत्येकाची आवड वेगळी होती पण चव मात्र कॉफीचीच होती…


- कविता मराठे 

 


' नास्तिक ते आस्तिक … एक प्रवास '


रविवारी किशोरचा फोन आला, सागरमाथा सर करून पुण्यात आल्यावर त्या दिवशी फोन वर अभिनंदन केल पण खूप काही बोलता आल नाही म्हणून काल त्यानेच मुदाम फोन केला आणि मनसोक्त गप्पाही झाल्या.

जिथे लहानाचा मोठा झाला त्या परिसरात कौतुक सोहळा झाला, अगदी खास मराठमोळ्या  पद्धतीत.  एवरेस्ट मोहीमेवरून त्या दिवशी तो पुण्यात परत आला होता.  काल बोलतांना फोनवर तोच आवाज , तोच आत्मविश्वास  होतां आणि या वेळी त्याला समाधानाची झालर होती. जे ठरवल ते मिळाल्याची, मिळवल्याची… 

मी म्हणाले  "अरे आराम कर थोडे दिवस मग भेटूच ", तर म्हणाला " अग बँकेत निघालोय ".मी  चकितच झाले. " यू आर सिम्पली ग्रेट , दोन दिवस पण नाही झाले तुला येवून आणि रुटीन सुरु ,  कसा आहेस तू ? तर म्हणाला " मी एकदम मजेत , १२  किलो वजन कमी झालय, थोडा थकवा आहे, बाकी फिट . कधी भेटायचं ते ठरव म्हणजे सगळे भेटू".  एवरेस्ट मोहिमेवर निघायच्या आदल्या दिवशी शाळेच्या ग्रुप बरोबर कॉफी आणि गप्पा झाल्या होत्या आणि एवरेस्ट सर करून आल्यावर परत त्याच जागी भेटायच हे  सुधा ठरल होतं.

आता न राहवून मी म्हटल, " तू जायच्या आधी नाही बोलले पण आता बोलल्याशिवाय राहवत नाहिये.  गणपतीला नक्की जाउन ये आतां. मला माहिती आहे तुझा विश्वास नाही म्हणून जायच्या आधी नाही बोलले तुला,  पण आता ऐक माझं .नक्की जा. " तो काहीच बोलला नाही. "एक सांग मला ,तुझा देवावर विश्वास नाही ? पण  मग कधी वाटल का तुला समिट वर असताना कि  काहीतरी नक्कीच आहे जिथे आपल्याला नमाव लागत ?" या प्रश्नावर फक्त हसला.…  खरच त्याच उत्तर यावेळी बदलल होत.

तो  म्हणाला, " आपली श्रद्धा, कष्ट, जिद्द कितीही खरी असली तरी  'तो' आहे हे पटल मला. माझ्यासारखा नास्तिक आस्तिक झाला. सर्व काही बाजूला ठेऊन त्या दिवशी त्या रोपला नमस्कार केला मी. बेस कॅम्प पासून वाटेत भेटलेल्या प्रत्येकाने काहीतरी दिलं , धागा, फोटो, छोटा विक्टरी FLAG आणि आशीर्वाद … सर्व काही बरोबर नेल मी . माहित नाही पण विश्वास ठेवावासा वाटला 'त्या प्रत्येकावर' … अग परत येतांना नेपाळ मध्ये दोन वेळा त्या पशुपतीनाथ मंदिरातहि गेलो , काय सांगू "… खूप छान वाटल ऐकून.

तो बोलत राहिला आणि मी विचारत … "एक सांग मला, कधी भीती नाही वाटली तुला No one has travelled the bridge of success without ever crossing the streets of failure" यावर त्यानी दिलेलं उत्तर खरच खास होतं . तो म्हणाला , " वाटली ना , सर्वात पहिल्यांदा १८ एप्रिलला बेस कॅम्पवर झालेल्या अपघातानंतर नेपाळ बरोबर चायना रूट सुधा बंद होईल का ? अशी शंका मनात आली . इथवर येवून रिकामं परतावं लागणार का ? याची भीती वाटली. पण नशिबाने साथ दिली आणि थोड्या उशिरा का होईना आमची चढाई सुरु झाली "  बापरे , 'भीती' या शब्दाची त्याची आणि माझी व्याख्या खूपच वेगळी होती. 

एक क्षण दोघंही गप्प होतो …

मग तोच म्हणाला, "अगं फक्त दीडशे मीटर अंतर उरलेलं असतांना एक जण परत फिरला. शेर्पाशी काही बोलला , मला समजल नाही तो काय म्हणतोय ते पण बहुदा म्हणाला असावा,' बास, आता नाही जाऊ शकत मी पुढे '. आणि माझ्या समोरून परतला . त्याच स्वप्न इतक्या जवळ होत आणि तो मात्र … मी विचार करून काही बोलणार तोवर तो मागे फिरला सुधा.  त्याचा विचार करत मी पुढे जात होतो पण माझ मन मात्र मागेच राहिलं होतं . 'त्यानी असं अर्धवट सोडून जायला नको, मी का नाही थांबवायचा प्रयत्न केला त्याला ?' माझी पावलं मंदावली . त्याच्यासाठी मीच देवाला विनवू लागलो … माहित नाही काय झालं पण थोड्याच वेळांत आश्चर्य म्हणजे  तो परत फिरून तिथवर आला होता अन् पाहता पाहता मला ओलांडून पुढे गेलाही. किती खुश झालो मी. खूप आनंद झाला त्याला पुढे जातांना पाहून, खूप वेगळ वाटल.….  हे ऐकून नकळत डोळ्यांत पाणी आलं.

या संपूर्ण प्रवासात किती वेगवेगळे अनुभव त्याने घेतले होते. अनेक वर्षांची अपार मेहनत, त्याची जिद्द आणि  मनाची तयारी आम्ही जवळून पाहिली होती. आतून बाहेरून हालवून टाकणाऱ्या अनेक गोष्टी त्याने पाहिल्या होत्या अनुभवल्या होत्या पण जिद्द सोडली नव्हती कारण अनेक वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्नं त्याला पूर्ण करायचं होतं. त्याच्यामुळे नकळत आम्ही सुधा जोडले जात होतो … त्या एवरेस्टशी  !!

"मला सांग , एवरेस्ट सर करण्याची अपेक्षित वेळ होती सकाळी सहा ते आठच्या मधे पण तूला जवळ पास दोन ते तीन तास उशीर झाला , तो का ? आम्ही बेस कॅम्पच्या सतत संपर्कात होतो.  तुझ्या बरोबर असणाऱ्या दोघांनी सकाळी सातच्या सुमारास चढाई पूर्ण केली पण तू खूप वाट पहायला लावलीस. शेवटी तर आमचाही धीर सुटत चालला होता " मी अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते.  किशोर म्हणाला , " या वेळी फक्त दोन दिवस वातावरण अनुकूल होतं. त्यातील एक दिवस चायना नी  आपल्या लोकांकरता राखीव ठेवला आणि दुसरा बाहेरील सर्वांकरता . जवळ पास तीनशे जण होतो आम्ही समिट करतां " माझ्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला " बापरे "… किशोर इतके 'वेडे 'इतके जण आहेत हे ऐकून मी नि:शब्द झाले. 
'चायना रूट हा climbers route म्हणून प्रसिद्ध आहे , खरा गिर्यारोहक याच मार्गाने जातो आणि त्याच्या रक्तात असते ते फक्त स्वप्न , एवरेस्ट सर करण्याचे' , हे वाक्य कानांत तसंच रेंगाळल होत. 
अजून विचारावं असं माझ्याकडे आणि सांगाव असं किशोरकडे खूप काही होतं पण प्रत्यक्ष भेटून ऐकायला काही गोष्टी तशाच ठेवल्या… 




 
मन बावरे होई कातर
काहूर सावळे दाटले
विरले ओठांत गीत
उरले गंध विराणे ….