Sunday, November 28, 2021

मोहम्मद रफी

मी हे नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी खूप लहान होते. माझ्या आत्याच्या घरी एका भिंतीवर त्यांचा एक खूप छान फोटो होता. तो फोटो पाहून ते कुणीतरी खूप मोठे आहेत एवढच काय ते समजल होत त्या वेळी. पण ते नक्की किती मोठे आहेत हे कळायला पुढे खूप वेळ जावा लागला. मुळात आधी गाण समजणं, त्यातला दर्द काळजाला भिडणं आणि आवाजातील आर्तता हृदयापर्यंत पोहोचण्याची समज पुढे एका वयानंतर आली.

तेव्हा देवानंद आवडायचा त्यामुळे गाईड, हम दोनो या सिनेमांची पारायण केली होती आणि या सिनेमातील गाण्यांनी तर वेड लावलं होत. वहिदाजी आणि देव साहेबांवरच 'तेरे मेरे सपने अब एक रंग हें, जहाँ भी ले जाए राहें हम संग हें'.. हे गाणं ऐकुन वाटायचं प्रेमात पडल्यावर भावना बहुदा इतक्याच बोलक्या होतात. 'लाख मनाले दुनिया साथ न अब छुटेगा आके मेरे हातों में , अब साथ ना ये छुटेगा'..  हे ऐकून तर त्या आवाजाच्या प्रेमात पडावं इतका आश्वासक आणि रोमँटिक भाव त्या सीन मधेच नाही तर त्या आवाजातही जाणवायचा. 

"दिन ढल जाए हाए रात ना जाए, तू तो न आए तेरी याद सताये " या गाण्यात शैलेंद्रचे शब्द जणू जीव ओतून गायलेत रफी साहेब. कित्येक वेळा हे गाणं ऐकलंय आणि प्रत्येक वेळी डोळ्यांचे काठ मनसोक्त वाहिलेत...

'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' हे गाणं लक्षात राहीलं ते त्यातील लायटरची धून व रफी साहेबांकरताच.
'अभी ना जावो छोडकर के दिलsss  अभी भरा नहीं ' हे अजून एक अप्रतिम गाणं. यातील हवा जरा मेहेक तो ले किंवा नशे के घूट पी तो लू म्हणतांना रफी साहेबांची अदा एकदम क्लासिक !

"चौदहवी का चाँद हो या आफताब हो , जो भी हो तुम खुदा कि कसम लाजवाब हो ", असो किंवा ' मैने पुछा चाँद से के देखा हें कही, मेरे यार सा हसीन ?चाँद ने कहां , चांदनी कि कसम, नही..नही.. नही '... तसंच, 'तेरी बिंदिया
रे, आए हाए' किंवा 'झिलमिल सितारों का आंगन होगा ', " सौ साल पेहेले मुझे तुमसे प्यार था " .. या इतक्या गोड गाण्यांना आवाजाच्या जादूने सजवलयं  ते फक्त रफी साहेबांनी.

"ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हें "या प्यासा मधील साहिरच्या शब्दांना रफीजींनी आपल्या अफाट जादूई आवाजाने चार चाँद लावलेत. तो हि एक काळ होता जेव्हा हिरोईन साठी लता मंगेशकर आणि हिरो साठी रफी साहेबांचा आवाज हे एक समीकरण झालं होतं. 

'मांग के साथ तुम्हारा मैने मांग लिया संसार ' म्हणताना दिलीपकुमार काय आवडलाय. 'अगर तुम भूला न दोगे सपने ये सच हि होंगे, हम तुम ...' हे गाणं असो किंवा 'तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल हें ', असो, एकदा ऐकून समाधान होतच नाही या गाण्यांचं. परत परत ऐकत राहावं ...

मध्यंतरी माझ्या वाचनात आल कि एकदा ओ. पी . नय्यर म्हणाले होते ,' मोहम्मद रफी ना होता तो ओ. पी. नय्यर ना होता.. काय भारी ना !! दोघांच्या दोस्तीला सलाम !!!

आयुष्यातील कित्येक क्षणांत, कितीतरी प्रसंगात या आवाजाची सोबत होती.. कित्येकदा डोळे मिटून बसले असतांना मागे त्याचा आवाज रेडिओवर होता....

हि गाणी सोबत असतांना प्रेमात पडलेल्या त्या जुन्या पिढीबरोबर आपल्याला सुद्धा हि गाणी ऐकायला मिळाली , enjoy करता आली म्हणून खरं तर आपणही नशिबवान आहोत.

रफी साहेबांची हि आवाजाची जादू अशीच सोबत राहो ....

आजही प्रेमात पाडणारा चित्रपट म्हणजे गाईड. व्यावसायिक असूनही कलात्मक असणारा, जितक्या वेळा पाहावा तितका नव्याने उलगडत जाणारा. त्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्तम संवाद, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार असे तब्बल सात फिल्मफेअर पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संगीतकार एस.डी. बर्मन यांना या चित्रपटाच्या संगीतासाठी साधं नामांकन सुद्धा मिळालं नव्हतं.याचं दुःख दिग्दर्शक विजय आनंद यांना कायमच राहिलं. खरं तर कोणत्याही पुरस्काराच्या पलीकडचं संगीत होतं ते ..त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा काही चित्रपटांपैकी एक ! 

2012 मध्ये, टाइम मासिकाने 'सर्वोत्कृष्ट बॉलिवूड क्लासिक्स' च्या यादीत नंबर चार वर या चित्रपटाला स्थान दिलं होते. त्या काळी मेहबूब खान, बिमल रॉय, राजकपूर सारख्या काही दिग्दर्शकांनी गाण्यांना ग्लॅमर दिलं परंतु गाण्याच्या चित्रीकरणाला एका वेगळ्या उंचीवर खऱ्या अर्थानं नेलं ते 'गोल्डी' म्हणजेच दिग्दर्शक 'विजय आनंद' यांनी. त्यांच्या ज्वेलथीफ, तेरे घर के सामने, तिसरी मंझिल आणि गाईड चित्रपटांतील प्रत्येक गाणं म्हणजे absolutely एक व्हिजुअल ट्रीट आहे ! 

गाईड चित्रपटाचं संगीताचं काम सुरु होण्यापूर्वीच सचिनदांची प्रकृती बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला व पुढचे काही दिवस ते हॉस्पिटल मधेच होते. तेव्हा देवसाहेब आणि गोल्डी यांनी 'कितीही थांबावं लागलं तरी आम्ही थांबू पण गाईड चे संगीतकार तुम्हीच असाल', असं सचिनदांना सांगितलं. गाईड च्या यशामध्ये त्यांच्या संगीताचा आणि शैलेंद्र यांच्या गीतलेखनाचा खूप मोठा वाटा आहे. 

चित्रपटांतील प्रत्येक प्रसंगात एक भाव असतो. कथा, त्यातील प्रसंग, कलाकारांचे संवाद तसंच त्यांच्या अभिनयातून पुढे साकारणाऱ्या गोष्टीमधून हा भाव अजूनच गहिरा होत जातो. जेव्हा हाच भाव संवाद पेलू शकत नाहीत तेव्हा तो भाव गाण्यांतून साकारतो. गाण्यांतून​ ​गोष्ट पुढे नेण्याचं कसब गोल्डी कडे होतं. त्यांनी साकारलेली बरीच गाणी 'Director's Song' म्हणून ओळखली जातात. नायक नायिकेचा संवाद सुरु असतांनाच शॉट कट न होता त्या शॉटचं एक्सटेंशन वाटावं असं गाणं सुरु होण्याचं एक झळाळतं उदाहरण म्हणजे ,' ​​तेरे मेरे सपने अब एक रंग है .... '

उदयपूर जवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका सरोवराजवळ हे गाणं चित्रित केलं गेलं. सूर्यास्ताच्या वेळी असलेला प्रकाश केवळ दहा ते पंधरा मिनिटं टिकत असल्याने तेवढ्याच वेळेत  हे गाणं हवं तसं चित्रित करणं हि एक परीक्षा होती. शेवटी गोल्डी व या चित्रपटाचे कला दिग्दर्शक राम येडेकर यांनी हवा तो परिणाम साधता यावा म्हणून एका झाडाच्या आडून ते चित्रीत केलं, फक्त चार शॉट्स मध्ये !  या गाण्याचं लोकेशन, ती सूर्यास्ताची वेळ, मागील तळ्यातील संध्याकाळचा हलका प्रकाश, आकाशातील ते रंग, कातरवेळचा मंद अंधार, लयदार फिरणारा कॅमेरा, शैलेंद्र यांचे शब्द, सचिनदांचं संगीत आणि पडद्यावर रोझी आणि राजू गाईड .. सारंच जादुई .. एक असीम काव्यमय चित्र​​च जणू​, ​'तेरे मेरे सपने अब एक रंग है​'​ ​.....​