कोरोना, मी आणि बाप्पा
ज्यानं हतबल केलंय त्याने खूप काही शिकवलंय, अहो रोजच रुटीन सुद्धा आपल्याकडून हिरावलंय
ऑफिसची घाई, डबे, नाश्ता धावपळ सगळी हरवली ; काट्यांवरती पळणारी माणसं देखील थांबली
ती दारावरची बेल सुद्धा जणू आपल्यावरच रुसलीये, सेफ्टी डोअरच्या आत मात्र घरं सारी एकवटलीयेत !
काहीही म्हणा,
काहीही म्हणा या घरट्यामध्ये पिलांसोबत मजा आहे, गोष्टी सिनेमा कॅरम पत्ते .. अहो भलतं सूख आहे
सकाळी उठवायला खिडकीमध्ये पक्षांचा तो किलबिलाट आहे, रात्रीच्या शांततेत आर डी आणि गुलजार आहे !
इतकं सगळं असूनही मनामध्ये बोचरी सल आहे , निवांत आपण घरी म्हणून एक वेगळाच 'गिल्ट' आहे
पाच वाजता टाळ्या वाजवताना कसं काय समजलं नाही पण डोळे भरून यायला एक क्षणही लागला नाही !
शब्दांमध्ये नाही ना नेहमी सगळं सांगता येत.. अहो त्या भगवंताकडे सुद्धा नाही नेमकं मागता येत
'Why We' याचं उत्तर बहुतेक कधीच मिळणार नाही पण म्हणून काही आपण लढणं सोडणार नाही !
मान्य आहे मनामध्ये खूप भीती दडली आहे , बाहेरची नीरव शांतता अगदी खायला उठली आहे
म्हणूनच म्हणते सगळेमिळून बाप्पाला एक सांगू , मोदक देतो तुला बाप्पा पण अशी सुट्टी नको रे देऊ ..
तारेवरची कसरत रोजची त्यातच खरी मजा आहे, घर ऑफिस मित्र मैत्रिणी हेच तर इवलं जग आहे
शाळा कॉलेज क्लासला पळणारी पिल्लं भारी गोड दिसतात, ' अभ्यास कर रे', म्हणून बोलणी खाणारी मुलं घरांघरात शोभतात
म्हणून म्हणते देवा आतां यातून लवकर सुटका कर,
विस्कटलेली हि घडी सारी पुन्हा एकदा ठीक कर, विस्कटलेली घडी सारी पून्हा एकदा ठीक कर....
No comments:
Post a Comment