Thursday, May 21, 2020

नथीचा नखरा आणि दाल बाटी


सध्या नथीचा नखरा हे challenge फार भाव खाऊन आहे. तसंही दागिने म्हणजे आपला weak point. मग काय सर्व जणींचे status सध्या नथ घालून सजलेल्या पारंपरिक लुक मध्ये अगदी बहरून गेलेत. खरंच, प्रत्येक दागिन्याची हौस वेगळी आणि आठवण सुद्धा !!

स्वयंपाकघरातील पदार्थांचं सुद्धा तसंच आहे नाही, काही रोजच्या चवीचे तर काही सणासुदीला भाव खाऊन जाणारे पारंपारिक .. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाणारे, जरा हटके. 

'दाल बाटी' म्हटलं कि मला हा पदार्थ थोडा पारंपरिक, खानदानी, सुरकुतलेल्या हातांनी मायेने करून खाऊ घालायचा पदार्थ वाटतो. पुण्यांत राहून वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत मला ओळख सुद्धा नव्हती खरं तर या पदार्थाची. लग्नानंतर केयूरच्या गप्पांमध्ये येणाऱ्या 'हमारा भोपाल' च्या आठवणी आणि त्या सोबत न चुकता येणारी हि 'दालबाटी' ऐकून हळूहळू ती ओळखीची झाली व आई दादांच्या हातची दाल बाटी खाऊन मग ती चव जिभेवरच रुळली. दिवाळीच्या सुट्टीत गेलं कि थंडीच्या दिवसांतलं आमच्या घरचं हमखास दिसणारं चित्र म्हणजे अंगणातील शेकोटी आणि कंड्यांवरती तयार होणाऱ्या बाट्या. त्या छान खरपूस भाजून तयार झाल्या ती त्यावर सढळ हाताने पडणारी साजूक तुपाची धार. साजूक तुपात माखून चमकणाऱ्या त्या गरमागरम बाट्या आणि ती रुचकर चविष्ट दाल.. आहाहा !!

इथे पुण्यात हे दालबाटीचं शिवधनुष्य पेलायच म्हणजे ओव्हन किंवा OTG चा आधार घ्यावा लागतो. सध्या फोनवर गप्पांमध्ये किंवा कायप्पा वर रंगणाऱ्या 'आम्ही सारे खवैय्ये', या डेली सोप मध्ये मग शेफ भारती सारखी मैत्रीण सांगते, 'अग अप्पेपात्रात सुद्धा छान बाट्या होतात', तेव्हा ते करून बघायला मन आतूर होतं. तुमचं पण झालं ना मग सांगते कसं केलं ते.


'बाटी' तयार करण्याकरता एका पसरट भांड्यात एक वाटी गव्हाचं पीठ व पाव वाटी बारीक रवा घ्यावा. त्यात चवीपुरतं मीठ, एक चमचा ओवा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालावी. पाव वाटी साजूक तूप ( तेल सुद्धा चालेल) गरम करून ते घालून कोमट पाण्यात पीठ छान मळून घ्यावं. आपण फुलके करायला जसं भिजवतो तसं भिजवून अर्धा तास झाकून ठेवावं.

तोवर 'दाल' करण्याकरता अर्धी वाटी तूरडाळ आणि अर्धी वाटी मुगाची पिवळी डाळ एकत्र करून कुकरमध्ये लावून चार शिट्ट्या करून घ्याव्यात.

बाटी साठी भिजवलेलं पीठ अर्धा तास झाला कि तेलाचा हात लावून छान मळून घ्यावं. भिजवलेल्या पिठाचे गुलाबजामसाठी करतो त्या आकाराचे एक सारखे गोळे करून घेतले कि अप्पे पात्राला तेल लावून घ्यावं. कणकेचा प्रत्येक गोळा हातावर गोल फिरवून घ्यावा आणि थोडा दाबून अप्पे पात्रात ठेवावा. दिलेल्या प्रमाणांत साधारण १२ बाटी होतात. प्रत्येक बाटीच्या बाजूने साजूक तूप सोडून बारीक गॅसवर ठेवून वरून झाकण ठेवावं. साधारण ७ ते ८ मिनिटांत मस्त खरपूस वास दरवळू लागतो. मग झाकण काढून अंदाज घ्यावा, बाटीची खालची बाजू छान खरपूस भाजली गेली असेल तर चमच्याने प्रत्येक बाटी उलटावी व बाजूने थोडं तूप सोडावं. आता झाकण नाही ठेवायचं.

दुसरीकडे हिंग, मोहरी, हळद, गोडा मसाला, तिखट, २ लाल मिरच्या, आवडत असेल तर चिंचगूळ घालून मस्त फोडणी करून दाल करायची. चवीनुसार मीठ घालून, उकळी आली कि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा. 

तयार झालेली दाल आणि गरमागरम तयार होत असलेल्या बाट्या पाहून 'आहा sssss ' म्हणतं चेहऱ्यावर एक छान हसू आणायचं.

वाटीमध्ये दाल घेऊन आवडत असेल तर त्यावर तुपातली जिरे आणि तीळ घातलेली फोडणी घालून प्लेट मध्ये ठेवून बाजूला बाटी ठेऊन प्लेट सजवायची. बाटिवर कणीदार तुपाची धार सोडत त्या बाटीचा नखरा एन्जॉय करायचा. त्याचा लगेच फोटो काढून सासूबाईंना पाठवायचा. घरात पसरलेला तो घमघमाट आधीच सर्वांना जेवायची हाक देत असतो. मग आपण दिलेल्या पहिल्याच आवाजात स्वारी जेवायला येते. इतर वेळी दहा वेळा बोलवावं लागतं हे वेगळं.. छान सागरसंगीत सगळं वाढून झालं कि नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव पाहून हरखून जायचं. पहिल्या घासानंतर येणारं " बढिया " ऐकून तृप्त न होता ( एकमेव टीप आहे हि) त्याच जेवण झाल्यावर लगेच तो आईला फोन करून आपली जेव्हा तारीफ करतो तेव्हा खरं खुश होऊन तृप्तीची ढेकर दयायची ...









Saturday, May 16, 2020


कोरोना, मी आणि बाप्पा

ज्यानं हतबल केलंय त्याने खूप काही शिकवलंय, अहो रोजच रुटीन सुद्धा आपल्याकडून हिरावलंय
ऑफिसची घाई, डबे, नाश्ता धावपळ सगळी हरवली ; काट्यांवरती पळणारी  माणसं देखील थांबली
ती दारावरची बेल सुद्धा जणू आपल्यावरच रुसलीये, सेफ्टी डोअरच्या आत मात्र घरं सारी एकवटलीयेत !

काहीही म्हणा,
काहीही म्हणा या घरट्यामध्ये पिलांसोबत मजा आहे, गोष्टी सिनेमा कॅरम पत्ते .. अहो भलतं सूख आहे
सकाळी उठवायला खिडकीमध्ये पक्षांचा तो किलबिलाट आहे, रात्रीच्या शांततेत आर डी आणि गुलजार आहे !

इतकं सगळं असूनही मनामध्ये बोचरी सल आहे , निवांत आपण घरी म्हणून एक वेगळाच 'गिल्ट' आहे
पाच वाजता टाळ्या वाजवताना कसं काय समजलं नाही पण डोळे भरून यायला एक क्षणही लागला नाही !

शब्दांमध्ये नाही ना नेहमी सगळं सांगता येत.. अहो त्या भगवंताकडे सुद्धा नाही नेमकं मागता येत
'Why We' याचं उत्तर बहुतेक कधीच मिळणार नाही पण म्हणून काही आपण लढणं सोडणार नाही !

मान्य आहे मनामध्ये खूप भीती दडली आहे , बाहेरची नीरव शांतता अगदी खायला उठली आहे
म्हणूनच म्हणते सगळेमिळून बाप्पाला एक सांगू , मोदक देतो तुला बाप्पा पण अशी सुट्टी नको रे देऊ ..

तारेवरची कसरत रोजची त्यातच खरी मजा आहे,  घर ऑफिस मित्र मैत्रिणी हेच तर इवलं जग आहे
शाळा कॉलेज क्लासला पळणारी पिल्लं भारी गोड दिसतात, ' अभ्यास कर रे', म्हणून बोलणी खाणारी मुलं घरांघरात शोभतात

म्हणून म्हणते देवा आतां यातून लवकर सुटका कर,
विस्कटलेली हि घडी सारी पुन्हा एकदा ठीक कर, विस्कटलेली घडी सारी पून्हा एकदा ठीक कर....