व्यक्ती कि वल्ली
मराठी माणसाला पुलं आणि वपु यांनी व्यक्तीनिरीक्षण शिकवलं. त्यांच्या लेखणीतून आपणापर्यंत पोहोचलेल्या त्या व्यकितेखा आजही आपल्या मनांत घर करून आहेत आणि हेच त्यांच्या लेखनाचं मोठं वैशिष्ट्य. आपल्या रोजच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्तीरेखा आजूबाजूला आढळते आहे का हे जरा डोळे उघडे ठेवून शोधण्याचं माझं वेड आणि सवय मला त्यातूनच लागली. राधिका हे असंच मला गवसलेले एक पात्र, माझ्या या लेखाचं स्फुर्तिस्थान.
राधिका गोखले, मी राहते त्याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहते. नोकरीच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी पुण्यात आली, इथे एकटीच राहते. नागपूरला तिचे आई वडील असतात. अधून मधून जात असते आई वडिलांना भेटायला कारण वयानुसार आता तिच्या आई बाबांना प्रवास झेपत नाही. मूळची नागपूरची असल्याने नागपूर हा विषय कायम तिच्या बोलण्यात असतो. माझं सासर नागपूरचं असल्याने माझ्याबद्दल तिला तसूभर जास्त प्रेम आहे. पुण्याविषयी काही विशेष टिपण्णी ती माझ्यासमोर करत नाही कारण मी पक्की पुणेकर आहे व पुण्याबद्दलचा माझा 'जाज्वल्य' अभिमान ती जाणून आहे. बाकी नागपूरकर आणि पुणेकर या तिच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर ती पोटभर कायमच बोलत असते, तेव्हा 'ज्यांच्या पुढे कर जोडावेत अशा तिसऱ्या स्थळाचे मुंबईकर' आजूबाजूला नाही याची रुखरुख वाटते. एकूण काय तर नागपूरकर म्हणून एक वेगळाच डौल ती मिरवते. पुलं नी सांगितल्याप्रमाणे 'नागपूरकर म्हणजे ज्या कुठल्या गावी राहत असाल त्याच्या तुलनेनी नागपूर प्रशस्ती चालू ठेवायची', तसाच कारभार आहे हा. एकूण काय तर अशी हि गप्पिष्ट, बडबडी, धांदरट, सतत घोळ घालणारी, मिश्किल अशी आमची राधिका. तिची खास गोष्ट म्हणजे अतिशय शांतपणे पुष्कळ मोठे घोळ घालते आणि ते आपणहून कौतुकाने सर्वांना सांगते सुद्धा.
इजाजत मध्ये एक संवाद होता रेखाला , "इस पगली पे प्यार भी आता है और तरस भी". मी मात्र याच संवादात "और गुस्सा भी " हे जोडलंय आणि कायम तिच्यासाठी हा संवाद मी म्हणत असते जे तिलाही माहित आहे. मी गुलजारजींची फॅन म्हणून इजाजत मधला संवाद मला पटकन सुचला होता तिच्यासाठी. राधिका अमिताभ बच्चन यांची एक निस्सीम फॅन आहे.अकरा ऑक्टोबर तिच्यासाठी एकदम खास दिवस आहे. अमिताभजींचा वाढदिवस मनापासून साजरा करते ती आणि आम्हाला चक्क पार्टी सुद्धा देते. येता जाता सिनेमातील त्यांचे संवाद म्हणत असतेच, कधी कधी साभिनय करून सुद्धा दाखवते. त्यांचा विषय निघायचा अवकाश कि भरभरून बोलते त्यांच्याविषयी. इतकी वेडी फॅन आहे त्यांची.
कधी ऑफिस मधून उशिरा येतांना दिसली, पार्किंग मध्ये भेटली आणि आपण विचारलं, "का ग , आज इतका उशीर " तर म्हणते " कोण आहे घरी वाट पाहणारं , लवकर काय आणि उशिरा काय".. तेव्हा मात्र चर्र होतं. केर फरशी आणि स्वयंपाकासाठी दोन वेगवेगळ्या बायका काम करतात तिच्याकडे आणि यामागे तिचं लॉजिक असं कि तेवढीच घरांत चेहेलपेहेल वाटते, नाहीतर रोज कोण येतंय बोलायला माझ्याशी. एकदम बरोबर वाटतं तिचं हे लॉजिक. एकटेपण अनुभवणं , त्याची सवय करून घेणं सोपं नक्कीच नाही. पण म्हणून काही ती गंभीर, दुःखी अशी कधी दिसतं नाही. शब्दांमधून कधीतरी तिची दुखरी सल जाणवते तरीही चेहेरा मात्र कायम आनंदी असतो तिचा. नागपूरला खरेदी केलेले ड्रेस आणि साड्या याबद्दल भरभरून बोलते. इतवारी,बर्डी हे शब्द एव्हाना इथल्या सर्व मैत्रिणींना पण ओळखीचे झाले आहेत.नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाईन डे ला 'मी काय करू ग संध्याकाळी', असा प्रश्न तिने हसत हसत विचारला यावर मी तिला तू 'दिल तो पागल है' हा सिनेमा पाहिला आहेस का ? हा प्रति प्रश्न केला. त्यावर तिचं हो उत्तर आलं. मग मी सुचवलं "अग त्यात नाही का माधुरी जाते बाहेर आणि स्वतःसाठी मस्त शॉपिंग करते तसं कर शॉपिंग स्वतःसाठी". माझा हा सल्ला तिने फारच मनावर घेतला आणि चक्क दुसऱ्या दिवशी बोलावलं मला शॉपिंग पाहायला.
नक्कल करणे हा तिचा अजून एक छंद. आमच्या सोसायटीत राहणाऱ्या सर्वांची डिट्टो नक्कल करते राधिका, अगदी आवाजासकट. हसणं, चालणं, बोलणं अगदी हुबेहूब टिपते आणि करते. काही खास मंडळींची नक्कल आम्ही परत परत करायला लावतो तिला आणि ती ते अगदी मनापासून करते. परवा तिच्याकडे काम करणाऱ्या बाईंना घरात लॉक करून ऑफिसला गेली होती. बाई घरांत काम करतायेत हेच विसरली जातांना. मग काय बाईंनी घातला गोंधळ. बाजूच्या मुग्धा कडे किल्ली होती म्हणून बरं. संध्याकाळी परत आली ऑफिस मधून तेव्हा सगळा प्रकार सांगितला तिला तर जो गोंधळ घातला तो राहिलाच बाजूला वर बाईंचीच नक्कल करून दाखवली कि त्यांनी काय केलं असेल जेव्हा त्यांना समजलं कि त्या घरांत असतांना मी लॉक करून गेले. काय बोलणार यावर.
मागच्याच महिन्यात दुबईला जाते म्हणून अगदी सागर संगीत सगळं आवरून तयारीनिशी निघाली. तिकडे मुंबई विमानतळावर पोचल्यावर तिला साक्षात्कार झाला कि पासपोर्ट घरीच राहिला. मग काय, ऑफिस मध्ये फोन, इकडे आम्हाला फोन, कोणीतरी आलं ऑफिस मधून धापा टाकत आणि आम्ही तिचं घर उघडून पासपोर्ट दिला काढून. नशीब ती खूप आधी मुंबईला पोहोचली होती त्यामुळे ऑफिस मधून तिचा सहकारी पोचू शकला वेळेत तिला पासपोर्ट द्यायला नाहीतर तिथूनच परत यावं लागलं असतं. हे कमी होतं कि काय परत येतांना मुंबई विमानतळावरून आपली समजून दुसरीच सुटकेस घेऊन निघाली आणि त्यामुळे झालेला गोंधळ सुद्धा निस्तरला. या सगळ्या प्रकारामुळे इथे सोसायटीत आणि तिकडे ऑफिस मध्ये परत एकदा तिची खिल्ली उडवायला सर्वांना आयतं कारण मिळालं ते वेगळंच.
परवाच सांगत होती, तिच्या ऑफिस मधला कॅन्टीन मध्ये घडलेला किस्सा. चहा प्यायला ती कॅन्टीन मध्ये गेली होती. चहा पिऊन झाला म्हणून निघाली तर गरमागरम बटाटेवड्याचा वास आला. काउंटर वर एक बटाटा वडा प्लेट ठेवली होती.त्यातील ते दोन वडे जणू तिला खुणावतच होते. मग काय एक वडा उचलला तिने आणि चालू लागली खात खात, बिनधास्त. कोणीच बहुदा तिला पाहिलं नसावं कारण ज्याची ऑर्डर होती तो बाजूलाच पाठमोरा फोन वर बोलत होता. फोन वरील संभाषण संपवून तो आला प्लेट घ्यायला तर एकच वडा प्लेट मध्ये म्हणून त्याची व काउंटर वरच्या मुलाची चांगलीच जुंपली. कॅन्टीनचा मुलगा 'मी दोन वडे दिले होते' यावर ठाम होता. एक वडा गेला कुठे हा उलगडा काही झाला नाही पण बातमी मात्र सर्वत्र पसरली. ऑफिस मध्ये जेव्हा हि चर्चा रंगली तेव्हा या मॅडम म्हणाल्या 'अरे हो का ,असं झालं ,पण तो वडा तर मी घेतला होता', त्याक्षणी त्याची दूसरी बातमी झाली. घरी आल्यावर आमच्या सोसायटीच्या कट्ट्यावर हा किस्सा तिनेच आम्हाला सांगितला म्हणजे आपणच करामत करायची आणि आपणच बातमी द्यायची असं आहे तिचं.
फोटो काढून घेण्याचा नवीन छंद आजकाल राधिकाला लागला होता. सेल्फी काढून समाधान झालं कि 'एक फोटो काढ ना प्लीज, ताईला पाठवायचाय', असं सांगून आवर्जून फोटो काढून घ्यायची माझ्याकडून. बरं फोटो माझ्याकडूनच का ? याला पण एक कारण होतं माझा नवरा उत्तम फोटोग्राफर आहे म्हणून मी पण छान फोटो काढते हा तिचाच दावा. ताईने प्रेमाने घेतलेली साडी, ड्रेस घातल्यावर तो तिला किती छान दिसतोय हे फोटोतून ताईला सांगायचं असायचं. मग मी सुद्धा तिचा फोटो काढून पाठवताना काहीतरी शायरी लिहून पाठवते तिला त्या फोटोसोबत . एकदम खुश होते. काही बोलत नाही पण एक मस्त हसू पसरतं तिच्या चेहऱ्यावर, डोळे एकदम लखलखतात तिचे.
चांगलं किंवा वाईट माणूस म्हणून शिक्का देणं सोपं असतं. भाबडं वाटलं तरी थोडं न्याहाळलं कि खोलवर काहीतरी दिसतं हेच खरं. वेगवेगळ्या वृत्तीची आणि स्वभावाची माणसं, व्यक्ती आजूबाजूला असतातच पण काही वल्ली म्हणून भावतात हे मात्र नक्की !!
आज पुलंचे चितळे मास्तर,सखाराम गटणे,नामू परीट,पेस्तनकाका या साऱ्या व्यक्तीरेखा आठवल्या आणि वाटलं आज पुलं हवे होते...
- कविता सहस्रबुद्धे