Wednesday, August 29, 2018

"मेरी जाँ .. मुझे जाँ न कहो मेरी जाँ , मेरी जाँ "...

अनुभव चित्रपटातील गुलजार साहेबांचे हे शब्द, गीता दत्त यांचा आवाज आणि कनू रॉय यांच संगीत . हे गाणं ऐकलं कि पुढचे कित्येक दिवस फक्त हेच गाणं गुणगुणावंस , ऐकावंस आणि पाहावसं वाटतं, इतकी जादू आहे या गाण्यांत. काल हे गाणं ऐकतांना मला जावेदजींच्या काही ओळी आठवल्या. एका कार्यक्रमांत जावेद अख्तर म्हणाले होते कि कोणत्याही गाण्यांत त्या गाण्याची धून म्हणजे त्या गाण्याचं शरीर , त्या गाण्यातील आवाज म्हणजे त्या शरीराचा आत्मा आणि त्यातील शब्द म्हणजे त्याच चरित्र असतं  !!!

गीतकाराने शब्दांत बांधलेल्या भावना गायकाला आपल्या आवाजातून आपल्यापर्यंत पोहोचवाव्या लागतात.   "घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा ", या विराणीतील शब्दांत वर्णन केलेला 'बासरी सारखा वाजणारा वारा' लतादींच्या आवाजात खरंच ऐकू येतो. तो आभास ज्ञानेश्वरांचे शब्द निर्माण करतातच आणि त्या चित्रापर्यंत दीदी आपल्याला घेऊन जातात. "रुणु झुणु रुणु झुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा, सुमनसुगंधू रे भ्रमरा परिमळु विद्रदु रे भ्रमरा", या ओळींमधला चंचल मनाला केलेला उपदेश व लपलेला खोल अर्थ लताबाईंच्या आवाजातून अलवार उलगडतो.ज्ञानेश्वरांनी जितके गोड शब्द वापरलेत तितक्याच गोड आवाजात ते गाणं ऐकू येतं आणि खूप जवळचं वाटतं. "मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं , जाईच्या पाकळ्यांस दव अजून सलते गं ".. या कवितेत भट साहेबांनी सासरी गेलेल्या मुलीच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या आईच्या मनाची व्यथा जितक्या हळुवार पणे मांडली आहे  ती तितक्याच ताकतीने लताजींनी आपल्या पर्यंत पोहोचवली आहे आणि म्हणूनच हे गाणं ऐकतांना प्रत्येक आई आणि मुलीचे डोळे भरून येतातं.

या शब्द आणि आवाजाच्या जादूवर आपण सगळेच प्रेम करतो. पण या शब्द आणि आवाजाच्या जादूला जेव्हा पडद्यावर त्याच ताकतीचा चेहेरा मिळतो तेव्हा त्याला आपण Visual Treat म्हणतो.

"मेरी जाँ , मुझे जाँ न कहो मेरी जाँ , मेरी जाँ ".. हे गाणं खऱ्या अर्थाने आपल्यासाठी Treat आहे. गुलजारजींच्या शब्दांना गीता दत्त यांच्या आवाजात ऐकायचं आणि संजीवकुमार व तनुजा यांना ते साकारतांना पाहायचं , क्या बात हें !!!

रात्रीची वेळ.. फक्त दोघांची. बाहेर कोसळणारा पाऊस. खिडकीबाहेर पाहणारा तो.. आपल्याच विचारात हरवलेला. त्याच वेळी ती येते. त्याला पाहते आणि अलगत त्याच्या जवळ जाऊन गुणगुणते "मेरी जाँ .. मुझे जाँ न कहो मेरी जाँ "... हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव व क्षणांत पसरलेले ते निखळ हसू .. या फ्रेम मधेच आपण त्याच्या प्रेमात पडतो, ते गाणं आपलं होतं.

बाहेरचा रिमझिम पाऊस, खिडकीतून दिसणारा पाऊस.. अंगणातील फुलांना भिजवणारा पाऊस, त्या दोघांचा पाऊस आणि न भिजताही आपल्याला भिजवणारा पाऊस...

तनुजा यांच्या वर चित्रित झालेलं माझं सर्वांत आवडतं गाणं..संजीवकुमार तर आपल्याला त्यांच्या प्रेमातच पाडतात या गाण्यांत. रोमँटिक गाण्यांच्या यादीत या गाण्याला विशेष जागा मिळावी इतकं खास आहे हे गाणं. जबरदस्त फ्रेम्स, कॅमेऱ्यात पकडलेले उत्कृष्ट close ups, बॅक लाईटची जादू त्या क्लासिक माहोल मध्ये आपल्यालाही घेवून जाते.... आणि मग ओठांवर तेच शब्द येतात," मेरी जाँ, मुझे जाँ ना कहो मेरी जाँ.."

- कविता

Saturday, August 18, 2018

श्रावण ...

तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे सूर ....दिव्याची आवस म्हणून जाड कणिक व केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्तहस्ते घातलेलं रवाळ तूप... म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल !!
डबा भर चिरलेला पिवळा धम्मक गूळ, हरभरा डाळ, भाजलेले दाणे, फुटाणे, दाण्याचं खमंग कूट, नुकतीच करून ठेवलेली वेलचीची पुड, उपासाची भाजणी राजगिरा लाडू व खजूर यांनी भरलेले डबे, म्हणजेच श्रावणाच्या स्वागत...ासाठी सजलेलं घरातलं स्वयंपाकघर !!
जिवतीचा फोटो, कहाण्यांच पुस्तक, स्वच्छ घासून चमकणारं पळीपंचपात्र , दिव्यांनी सजलेलं देवघर, फुलपुडीतून डोकावणाऱ्या दुर्वा आघाडा फुलं आणि सगळी मरगळ झटकून सजलेेलं घर म्हणजेच श्रावणाचं आगमन !!
श्रावण म्हणजे आवर्जून करायचं पुरण, भाजणीचे वडे, नारळी भात, नारळाच्या वडया, वालाचं बिरडं, गव्हाची खीर, हारोळ्याचे लाडू, भोपळयाचे घारगे, गाकर, पुरणाची पोळी, पुरणाचे दिंड आणि दूध फुटाण्याचा नैवेद्य.. श्रावण म्हणजे वेगवेेगळ्या चवींतून घरांत दरवळणारा गंध !!
श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी, मुलांना भरभरून मिळावं म्हणून आईने केलेली जिवतीची पूजा, शुक्रवारी मुलांच केलेलं पुरणाचं औक्षण, आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा, माहेरची येणारी आठवण म्हणून आई वहीनी बहिणीकडे झालेलं सौवाष्ण जेवण आणि मैत्रिणींबरोबर सजलेली मंगळागौर... प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण, अनेक रंगांची उधळण करत येणारा श्रावण !!
श्रावण म्हणजे गाभाऱ्यात उमटणारे ओंकार.. श्रावण म्हणजे समईतल्या शुभ्र प्रकाशात दिसणारं पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग, कापसाच्या वस्त्रानं, हळदी कुंकवाच्या करंड्यानं धुप अगरबत्ती दिवा आणि चंदनाने सजलेलं पूजेचं ताट, गोकर्ण जाई जुई तगर जास्वंद बेल दुर्वा पत्री तुळस यांनी सजलेली पूजेची परडी. श्रावण म्हणजे प्राजक्ताच्या सडयाने नटलेलं आणि श्रावण सरींनी सजलेलं माझं आंगण !!
श्रावण म्हणजे हिरवा ऋतु .. या सजलेल्या निसर्गाच्या बरोबरीने सजायचे दिवस.. कांकणांची किणकीण, काचेचा चुडा, हातावरची मेंदी, जरी काठाच्या साड्या, केसांत जुईचा गजरा, पायी जोडव्यांचा आवाज, गळ्यांत मंगळसूत्राबरोबर चमकणारा सर, कानांत कुड्या आणि पायांत पैंजण.. म्हणजेच घरातही भेटणारा, सजवणारा श्रावण !!
श्रावण म्हणजे आठवणींची सर.. श्रावण म्हणजे डोळे मिटतां केवड्याच्या पानाचा पसरलेला गंध तर कधी तिच्या चाहुलीने दरवळणारा सभोवताल... श्रावण म्हणजे नेमाने देवळांत जाणाऱ्या तिची आठवण करून देणारा सण तर कधी मंगळागौर उजवताना तिला दिलेल्या वाणाची एक गोड आठवण.. श्रावण म्हणजे शुक्रवारी न चुकता तिनं केलेलं औक्षण, माहेरवाशीण म्हणून भरलेली ओटी आणि आग्रहानं खावू घातलेली पुरणाची मऊसूत पोळी.. श्रावण म्हणजे देव्हाऱ्यासमोर समईच्या मंद प्रकाशात दिसणारं तिचं प्रसन्न रूप.. श्रावण म्हणजे आई तुझ्या आठवणींचा पाऊस !!!

- कविता
बॉर्डर ...मागच्या रविवारी बऱ्याच दिवसांनी हा सिनेमा पाहिला आणि जाणवलं कोणताही सिनेमा आपण जेव्हा परत पाहतो तेव्हा त्यातील काही गोष्टी नव्याने उलगडतात, नव्याने समजतात... काल जेव्हा या सिनेमातील जावेद अख्तर यांनी लिहिलेलं "संदेशे आते हे, हमें तडपाते हें, कि चिठ्ठी आती हें, वो पुछे जाती हें, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना हें ".. हे गाणं ऐकलं, पाहिलं तेव्हा अंगावर काटा आला.  खरं तर खूप वेळा हे गाणं ऐकलंय, पाहिलंय पण काल नव्याने अनुभवलं... अलीकडे सैनिकांवरची काही पुस्तकं तसेच काही अभ्यासपूर्ण लेख प्रामुख्याने वाचल्यामुळे मी relate करू शकले आणि मग या गाण्यांत लपलेला  खोल अर्थ कुठेतरी स्पर्शून गेला, असं वाटलं ....

आपलं मन कसं स्वार्थी असतं ना .. हे गाणं ऐकलं तेव्हा असाच एक स्वार्थी विचार मनांत आला. एक मन म्हणालं खरंच मी नशीबवान, असं पत्र मला नाही लिहावं लागलं कधी आणि अशा पत्रांतून राखी सुद्धा पाठवावी लागली नाही .. पण दुसऱ्याच क्षणी विचार आला,  ज्यांना असं पत्र लिहावं लागत त्यांच काय ?

पत्र ...खरंच, किती महत्व आहे याच काही जणांच्या आयुष्यात आणि काही जणांच्या आयुष्यातून तर पत्रच हरवून गेलंय. जिथून परत यायची शाश्वती नाही अशा लढाईवर निघतांना त्या सीमेवरती, आपल्या आई वडिलांसाठी, भावासाठी, बायकोसाठी पत्र लिहिणारा सैनिक आपल्या सगळ्या भावना जातांना त्या कागदावर उतरवून जातो आणि नंतर त्या शब्दांमधून पुन्हा पुन्हा भेटत राहतो. कारगिल युद्धांवर जातांना कॅप्टन विक्रम बात्रा ने आपल्या जुळ्या  भावाला लिहिलेल पत्र वाचून खरोखर निःशब्द व्हायला होतं ...

पत्र हि किती खास गोष्ट आहे नाही .. ज्यानी लिहिलंय आणि ज्याच्यासाठी लिहिलंय त्या प्रत्येकासाठी. पत्रात  लिहिलेल्या अक्षरांत जेवढ्या भावना मावतात ना तेवढ्या ओठांवर येऊच शकत नाहीत असं वाटतं कधी कधी...

"चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई है .. चिट्ठी आई हें वतन से चिट्ठी आई हें
बडे दिनों के बाद हम बे -वतनों को याद.. वतन कि मिट्टी आई हें "
आपण प्रत्येकाने ऐकलेलं हे गाणं... या गाण्यांत आनंद बक्षींनी किती सुंदर शब्द वापरलेत..वतन से चिट्ठी आई  म्हणून खुश होणारा तो आणि 'आजा , उम्र बहोत हें छोटी' या ओळींतून त्याला परत बोलवणारं कोणी ..

प्रत्येक पत्राची गोष्ट वेगळी, भाव वेगळा..लिहिणारा वेगळा , वाचणारा वेगळा.. पत्र , भावनांच प्रतिबिंब भासाव असा उत्कट संवाद साधणारं माध्यम . बहुदा म्हणूनच अनेक गीतकारांना याच पत्रांतून व्यक्त व्हावसं वाटलं..

नीरज यांच्या शब्दांत हेच पत्र किती सुरेख आभास निर्माण करतं ...
'लिखे जो खत तुझे, वो तेरी याद में , हजारो रंग के नजारे बन गये
सवेरा जब हुआ तो फुल बन गये , जो रात आई तो सितारे बन गये '...

हसरत जयपुरी अशाच एका पत्रातून पत्राच्या सुरवातीलाच होणारा गोंधळ उलगडून दाखवतात.
'मेहेरबां लिखूं हसीना लिखूं या दिलरुबा लिखूं
हैरान हूँ कि आपको इस खत में क्या लिखूं ?'
कशी सुरवात करू तुला पत्र लिहितांना ...

मग कधी अनपेक्षित पणे आलेलं पत्र पाहून चित्र काहीसं असंच होतं ...
"पत्र तुझे ते येता अवचित , लाली गाली खुलते नकळत
 साधे सोपे पत्र सुनेरी, नकळे क्षणभर ठेवू कुठे मी" ....

पत्रातून प्रेमाची कबुली देणं किती सोपं आहे ना .. समोर जे बोलता येत नाही ते पत्रांतून सांगायच ..
'फुल तुम्हे भेजा हें खत में , फुल नही मेरा दिल हें
प्रियतम मेरे मुझको लिखना, क्या ये तुम्हारे काबील हें
प्यार छुपा हें खत में इतना जितने सागर में मोती .. "
किती निखळ, निरागस प्रेम.. पत्रातून व्यक्त होणारं ...

इजाजत मध्ये गुलजार साहेबांनी लिहिलेल्या पत्रामधील या ओळी ऐकून तर वेड लागतं ...

मेरा कुछ सामान , तुम्हारे पास पडा हैं
सावन के कूछ भीगे भीगे दिन रखे हैं
और मेरे एक खत में लिपटी रात पडी हैं
वो रात बुझा दो मेरा वो सामान लौटा दो ...

किती रंग उलगडून दाखवलेत या पत्रात त्यांनी .. दूर जाण सुद्धा इतकं रोमँटिक असू शकत.. पत्रांतून इतक्या सहजपणे ते सार काही परत मागता येतं ?

किती वेगवेगळ्या भाव भावनांचा रंग उलगडतो या पत्रांमधून.. असाच एक रंग सापडतो इंदिरा संत यांच्या कवितेमधून..

पत्र लिही पण नको पाठवू शाईमधूनी काजळ गहिरे
लिपिरेषांच्या जाळी मधूनी नको पाठवू हसू लाजरे
चढण लाडकी भुवईमधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्ण विरामाच्या बिंदूतून
नको पाठवू अक्षरांतूनी शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण
नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगितले मी तू हट्टी पण
पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळी मध्येच मिळते
पत्रच पुढचे त्यानंतर पण वाचायचे राहून जाते ....

काय बोलावं या शब्दांवर .. हे शब्द सौंदर्य परत परत वाचून फक्त अनुभवत राहावं असं वाटतं...

कवी,गीतकारांच्या लेखणीतून लिहिली गेलेली हि पत्र ऐकतांना , वाचतांना मग एक वेगळंच पत्र हाती लागलं.

सगळे मार्ग बंद झाले म्हणून आत्महत्येचा मार्ग निवडणारा शेतकरी आपल्याला वर्तमानपत्रांत , बातम्यांमध्ये अधून मधून भेटत असतो. पण हाच शेतकरी जेव्हा एखाद्या पत्रा मधून भेटतो तेव्हा त्याची गोष्ट खूप अस्वस्थ करून जाते .. 
"पत्रास कारण कि बोलायची हिम्मत नाही, पावसाची वाट बघण्या आता काही गंमत न्हाई
माफ कर पारू मला, न्हाई केल्या पाटल्या, मोत्यावानी पिकाला ग, न्हाई कवड्या भेटल्या
चार बुकं शिक असं, कसं सांगू पोरा, गहाण ठेवत्यात बापाला का विचार कोणा सावकारा "...
अरविंद जगतापांच्या या कवितेत पत्राचा एक वेगळाच गहिरा रंग दिसतो. या पत्रातून व्यक्त होणाऱ्या वेदना कुठेतरी आतवर पोचतात ..

या पत्रांचा विषय निघाला आणि 'कुसुमानिल' पुस्तकाची आठवण आली नाही, असं कसं होईल. कवी अनिल आणि त्यांच्या पत्नी कुसुमावती यांच्यातील पत्रांचा एक मौल्यवान दस्तऐवज म्हणजे 'कुसुमानिल' ..९५ वर्षांपूर्वीचा पत्रव्यवहार. "आत्मचरित्रांमध्ये जो भेटत नाही तो पत्रांमधून भेटतो."असं गीतकार कौशल इनामदार यांनी याच पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी म्हटलं होतं कारण पत्र जास्त प्रामाणिक असतं...

लहानपणी 'माझ्या आईचं पत्र हरवलं.. ते मला सापडलं' हा खेळ आपण खेळायचो. पण सध्याच्या जगांत आपल्या सर्वांच्या आयुष्यातून मात्र हे पत्र आता हळूहळू  हरवतंय ...