' गाणारा पाऊस '
"रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन "......
आज कोसळणारा हा पाऊस 'पाहून' आणि 'ऐकून' या गाण्याची आठवण झाली. खरं तर तो 'बरसत' होता पण आठवण 'रिमझिम' ची झाली. किशोरजींच्या आवाजातील आर्तता आणि बाहेर पडणारा तो पाऊस. खरंच वेड लावतो हा आवाज अन् हा माहोल. दूसरीकडे हेच गाणं लताजींच्या आवाजात खट्याळ वाटतं , ऐकताना आणि पाहताना .... वाटतं, या पावसांत हातात हात घेऊन असच बेधुंद थोडं आपणही फिरावं.
कधी हलक्या पायांनी येणारा , तर कधी बेधुंद बरसणारा, अविरत कोसळणारा तर कधी खट्याळपणे उन्हाबरोबर लपंडाव खेळणारा हा पाऊस, प्रत्येकाच्या जवळचा असतो आणि प्रत्येकाला वेगळा भासतो. पावसाची रिपरिप कधी हळुवार रिमझिम वाटते, तर कधी कोसळणाऱ्या त्याला पाहून मन अगदी बैचेन होते.
" पहेले भी यूं तो बरसे थे बादल, पहेले भी यूं तो भिगा था आँचल ," हें ऐकतांना हाच पाऊस या आधी इतका रोमँटिक कधी वाटलाच नाही. पण 'तो' आला आणि हा पाऊस जणू अगदी नव्याने भेटला... आजचा पाऊस बघतांना ते सार काही आठवलं.
" रिम झिम रिम झिम, रून झुंन रून झुंन ... भिगी भिगी रूत में, तुम हम हम तुम .. चलते हें "...
या गाण्यांत 'बजता हें जलतरंग , पेड की छत, बुंदो के मोती, बादल की चादर ओढे सोई दिशाए , झिलोंके आईने , बादल खोले आई घटाए', असं ऐकल्यावर मनांत येतं , सारं काही सोडून या पावसांत दूरवर जावं आणि मस्त भिजावं .
त्याच्या विरहात, 'एक अकेली छत्री में जब आधे आधे भिग गए थे ', या ओळी गुणगुणतांना हा पाऊस अजूनच त्याची आठवण करून जातो. ' गिला मन शायद बिस्तर के पास पडा हो', म्हणतांना हे मनही अगदी चिंब भिजत
या पावसांत त्या टपोऱ्या थेंबांकडे पाहून, ' बुंदो के मोतियों में घुले के एहसास आया , वक्त से निकल के लम्हा दिल के पास आया, ' हे आठवलं नाही असं होतच नाही. ' ये साजिश हें बुंदो की , कोई ख्वाईश हें चूप चूप सी ', हे म्हणतं, पावसांत भिजण्याची 'ख्वाईश' पूर्ण करायलाच हवी.
पाऊस कसा अन् कधी पडतो यावर बरेचदा येणाऱ्या आठवणी अवलंबून असतात. काही मनाजवळच्या तर काही मनात रुतलेल्या. पावसात 'या आठवणींची जितकी आठवण यावी' तितकी इतर ऋतूंत येणं तसं विरळच.
'ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होतां '.... ग्रेस, हृदयनाथ आणि पाऊस !! या पावसांत हे गाणं अजूनच व्याकुळ करून टाकतं. 'ती' आयुष्यात असली तरीही आणि नसली तर .. बाहेरच्या पावसाबरोबर डोळ्यांतूनही मग हा पाऊस बरसू लागतो.
मुसळधार पावसांत लॉन्ग ड्राईव्हला जाऊन ' ऋतू हिरवा ', ' श्रावणात घन निळा', ऐकत भिजण्यातील मजा काही औरच. अशा या पावसांत आठवणी आणि गाण्यांसोबत मस्त भिजूयात ......