Friday, August 28, 2015

' जोशी काकु '

आज काही केल्या घड्याळाचे काटे पुढे सरकतच नव्हते. 'आपल्याला हवं तेव्हा वेळ थांबत नाही' आणि 'वेळ थांबू नये असं वाटत तेव्हा ती जात नाही', या समीकरणाचा प्रत्यय येत होता आज, या डायलिसिस सेंटर च्या Waiting Area मध्ये बसून. आईला नुकतंच आत नेल होत आणि आतां पाच ते सहा तास असच बसायच होत.. हो डॉक्टर आताच सांगून गेले होते तसं. 'डायलिसिस म्हणजे नक्की काय करणार', हा केविलवाणा प्रश्न मनातच रेंगाळला कारण आता कशाचीच माहिती करून घेण्याची मनाची तयारीच नव्हती. मागच्या महिन्याभरांत बऱ्याच गोष्टींची झालेली अर्धवट,पूर्ण माहितीच पुरेशी होती. आता अजून नवीन काही नको होते.

खिडकीतुन बाहेर पाहिलं तर गणपतीच देऊळ दिसत होत, हॉस्पिटलच्याच आवारातल. मी रोज येतां जातां बाहेरूनच ते देऊळ पाहत होते आणि आश्चर्य म्हणजे तरीही देव मला रोज भेटत होता…वेगवेगळ्या डॉक्टरांच्या रुपात. प्रत्येकावर तेवढाच विश्वास होता आणि अपेक्षाही. फरक इतकाच होता कि मंदिरात मिळते तशी शांतता, नव्हती इथे मनाला…  होती फक्त भीती !!!

इतक्यात अचानक एक बाई समोर आल्या. अगदी सोज्वळ आणि सात्विक रूप. पिवळ्या रंगाची लाल काठाची साडी, डोक्यात घातलेले पिवळ चाफ्याच फुल, हातभर भरलेल्या हिरव्या बांगड्या, त्यात चमकणाऱ्या पाटल्या, मणी मंगळसूत्र आणि कपाळावर लावलेल कोरड ठसठशीत कुंकू… एकदम लाघवी सौंदर्य. मी काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, ' हि तीळ गुळाची वडी घे, चिक्कीच्या गुळाची आहे. घरी बनवलेली. तिळगुळ घे आणि गोड बोल'. काही बोलण्याच्या आधीच हातावर वडी ठेवून त्या गेल्यासुधा. खूप वेळ मी त्या वडीकडे एकटक पाहत राहिले.या वर्षी संक्रांत अशी भेटली मला, इथे .

काउंटर वरच्या काकांच्या आवाजामुळे मी दचकले आणि पाहिले तर त्याच काकू त्यांना तिळगुळ देत होत्या, 'तुमच्यासाठी मुद्दाम मऊ वडी आणली आहे.'  काका म्हणाले ' का ? माझे दात तर अजून शाबूत आहेत, ती चिक्कीची वडी द्या मला '. ' घ्या हो', अस म्हणून त्यांनी दोन्ही वड्य़ा काकांना दिल्या. त्या नंतर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला, डॉक्टर्स ना , सिस्टर्स ना, तिथे बसलेल्या पेशंटच्या सर्व नातेवाईकांना त्यांनी तिळगुळ वाटला. शेवटी 'झाल माझ हळदी कुंकू ' असं म्हणत समाधानाने अगदी समोरच बसल्या.  इतका वेळ चालू असणारा त्यांचा तोंडाचा पट्टा आता तरी थांबेल, अस वाटत असतानाच बाजूला बसलेल्या इतर चार चौघींबरोबर गुळाची पोळी व वड्यांची रेसिपी, साड्यांचा सेल पासून सुरु झालेली त्यांची चर्चा आता इतर पेशंटच्या चौकशी पर्यंत येउन पोचली होती.

मला खरं तर खूप त्रास होत होता या सर्वाचा. आपण कोठे आहोत आणि हे काय चालू आहे ? वाटत होत, त्यांना सांगाव कि, 'प्लीज थोड गप्प बसा हो, खूप त्रास होतोय', पण काहीच बोलू शकले नाही. मुक्याने सर्व पाहत राहिले …  जणू काही दिवसांपासून मुक्यानेच जगायला शिकले होते.

इतक्यांत समोरून येणाऱ्या डॉक्टरांना पाहून थोडा धीर आला. त्या वातावरणाची सवय त्यांना होती पण माझ काय ? माझा चेहरा पाहून त्यांना अंदाज आला असावा. ' अग बसं , बसं ' अस म्हणंत बाजूलाच बसले ते. त्यांना पाहून त्या काकू परत आल्या आणि डॉक्टरांना तिळगुळ देवून त्यांचीच चौकशी करून गेल्या.

आता मात्र मी खूपच अस्वस्थ झाले. माझी ती अवस्था पाहून डॉक्टर म्हणाले, 'या जोशी काकू. मागच्या जवळपास दोन अडीच वर्षांपासून दर दोन दिवसाआड इथे येतात, काकांना घेऊन. पाच ते सहा तास मग इथेच असतात. बाकी सर्वांची पण परिस्थिती काही वेगळी नाही, कोणी मागचे सहा महिने कोणी वर्षभर कोणी दोन वर्षांपासून येताएत इथे आपापल्या पेशंटना घेऊन … गणपती , दसरा , दिवाळी , राखी सगळे सण इथेच होतात त्यांचे. किती दिवस भांडतील त्या वरच्याशी. शेवटी आपापला आनंद शोधलाय त्यांनी , परिस्थितीशी जुळवून घेतलंय. आम्हीच राखीला भाऊ होतो त्यांचे, तर दिवाळीतील पहिला फराळ सुधा इथेच करतात हे, आम्हा सर्वांबरोबर. इथे येणारा प्रत्येक जण ओळखतो या जोशी काकुंना, सध्याच्या सिनियर पेशंट रिलेटीव आहेत त्या.' हे ऐकून मी थक्कच झाले. त्या इतक्या सहजपणे वावरणाऱ्या चेहऱ्यामागे इतक काही दाटलं होत आणि मला मात्र स्वत:च दुःख कुरवाळताना समोरच जग दिसतच नव्हत. परिस्थिती माणसाला बदलवते आणि इथे तर या सर्वांनी त्यांच्या प्रयत्नांनी परिस्थितीच बदलवली होती पण हार नव्हती मानली. कोणाचे किती क्षण उरलेत याचा हिशोब न मांडता हे सगळे लोक आल्या क्षणाला आनंदाने सामोरे जात होते. 

इतक्यात डॉक्टर माझा निरोप घेऊन गेले हि आणि मी मात्र  …. 

Wednesday, August 26, 2015

' सांजवेळ '

संध्याकाळचे सहा, मोबाईल वर वेळ पाहिली. नुकतीच पडून गेलेली पावसाची एक सर, समोर दिसणारा एकाकी ओला रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला हलणारी हिरवीगार झाड, हवेतील बोचरा गारवा .. एकूणच काय एकदम रोमॅंटिक वातावरण आणि कानावर पड़णाऱ्या गाण्याच्या ओळी, 'इशारो इशारो में दिल लेने वाले, बता ये हुनर तूने सीखा हा से '..

आणि अशा या मस्त माहोल मधे मी मात्र गाडीत बसून वाट पहात होते त्याची. खिड़कीची काच खाली करुन त्यावर रेलून ठेवलेला हात आणि त्यावर विसावलेली माझी मान ..बहुदा थोड्या मोठ्या आवाजातच चालू होत ते गाण आणि समोर दिसत होता मला 'कश्मीर की कली' चा गाण्यातला तो सीन..

इतक्यात बाजूने एक आजी आजोबा थोड़े सावकाश चालत गेले. थोड़ पुढे गेल्यावर जरा थांबले व परत मागे जावून जरासे घुटमळले. मी साइड मिरर मधे पाहिलं तर एकमेकांशी काही बोलत होते. काही अंदाज आला नाही व राहवल पण नाही, म्हणून मी विचारल, 'आजोबा काय झालं '?आजोबांना बहुदा माझा प्रश्न थोडा अनपेक्षित होता. ते म्हणाले 'काही नाही,काही नाही '.त्या दोघांची उडालेली ती गड़बड़ आणि तो संकोच मला खूप काहीतरी सांगत होता पण नक्की काय ते समजत नव्हतं. मी परत विचारल, 'काही हरवलय का ' ? माझ्या या प्रश्नाने ते दोघं जरा अजूनच गड़बडले.

मग माझा प्रश्नाचा मोर्चा मी आजींकड़े वळवला. काठापदराची नीटनेटकी साडी, गळ्यांत मंगळसुत्राबरोबर घातलेली मोत्यांची माळ, कानातील मोत्यांच्या कुड्या आणि डोक्यात माळलेला जुईचा गजरा, हे सर्व क्षणार्धात टीपून मी विचारल ' काय झाल आजी ?' आता मात्र आजी एकदम हसल्या आणि मी मात्र गड़बडले..

तेवढ्यात आजी म्हणाल्या 'अग दिसायला माझ्या नाती एवढी नाहीस, थोड़ी मोठी आहेस पण नातीसारखीच आहेस, सांगते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता जणू त्याला वाहण्याकरतां एक रस्ता हवा होता...

आजोबा म्हणाले 'काही नाही, काही नाही, वेळ जात नाही हिचा बाकी काय ',  त्यांच वाक्य तोडत आजी म्हणाल्या 'तुम्ही थांबा हो, मला बोलू दे. सांगू दे ना , काय हरकत आहे.' त्यांचा हा गोड संवाद ऐकून माझी उत्सुकता अजुनच वाढली.  'अग तू जे गाण ऐकत आहेस नाते आम्ही कॉलेज मधे असतांना एकत्र म्हटल होत ट्रिपला गेलो होतो ना तेव्हा ..' आजींनी असं म्हणताच त्या सुरकुतल्या चेहऱ्यावरही मला लाजून चढलेला गुलाबी रंग स्पष्ट दिसू लागला आणि आजोबांचा चेहरा जरा अजूनच गोंधळला.

सहज चौकशी करता करता आजी आजोबांच्या अचानक समोर आलेल्या त्या रोमॅंटिक आठवणीने मला एक सुखद धक्काच मिळाला.

आजी एकदमच आठवणीत रमल्या, 'अग तेव्हा आजच्यासारख नव्हतं, त्यामुळे अशाच आठवणी असतं ग मनाजवळच्या .. काय म्हणतात ना अगदी SPECIAL तशामी एकदम बोलूंन गेले 'HOW SWEET'
मग मात्र आजोबा एकदम सहजपणे बोलून गेले 'तुझ्या या गाण्याने क्षणांत मागे जाऊन पोचलो आम्ही. अग काय हरवलंय विचारत होतीस ना, बहुतेक या आठवणीच हरवल्या होत्या '.  मी म्हणाले 'आजोबा आता या आठवणीत तुमची संध्याकाळ छान जाईल'. आजोबा एकदम हळवे झाले,  'हो , खरं आहे. चल आता येतो आम्ही, उशीर झालाय, अंधार पड़ायच्या आधी घरी जायला हव.' आणि माझा निरोप घेऊन ते दोघे जाऊ लागले.


गाडीतील ते गाण केव्हाच् संपल होत आणि त्या गाण्यातील शम्मीकपूर आणि शर्मीला समोर जात होते ....

Monday, August 24, 2015

तुझ्या आठवांनी, नवे होत जावे 
जपले क्षण ते, फिरुनी हसावे 

ऋतूंचा बहर तो, अलवार यावा 

तुला भेटण्याचा, बहाणा मिळावा 

मनातले ओठांवर, अलगत सरावे 

कळी उमलण्याचे उगा भास व्हावे  !!

Wednesday, August 19, 2015

तू नसतां आज कळला, 
             अर्थ नवा 'असण्याचा '
नियती कुणा टळेना इथे, 
             निर्माल्य हसे फुलाला … 

Thursday, August 6, 2015

तुझ्या आठवांचा, सोहळा सजावा 
पाऊस वेडा, झोकात यावा 

अशांत, अधीर 
कधी
      उनाड व्हावा, 
मृद्गंधात न्हाऊन, 
      अल्लड हसावा 
पाऊस वेडा, झोकात यावा 

रोमांचित, रिमझिम 

       कधी बेधुंद व्हावा 
नि:शब्द राहून, 
        बरसून जावा 
पाऊस वेडा, झोकात यावा 

रंग नभी उमलतांच, तुझा भास व्हावा  

पाऊस वेडा, झोकात यावा …… 
ओंजळीत दिले सारे, क्षण ते वेचून 
 मनामध्ये मागे उरे,रिते रिते पान 

शब्द सारे झाले तूझे,

            मुके माझे गीत 
डोळ्यांतूनी बोलतांना, 
            चिंब होई मन 

नभांगणी पसरले,

              मोरपिसी रंग 
तिन्हीसांजा आज होई, 
            मन हे व्याकूळ 

ओंजळीत दिले सारे, 
क्षण ते वेचून
 मनामध्ये मागे उरे,रिते रिते पान ....