Monday, September 29, 2014

' घर '

सकाळची कोवळी किरण, खिडकीतून हळूच आत येतातं 
अन् लगबगीनं दिवसाची, नवी सुरवात करून देतात

प्रत्येक कोपरा अगदी ताजा, सजून एकदम तयार असतो
घरामध्ये शांततेचाच, फक्त एक आवाज असतो

लगबगीनं तयार होताच, ऑफीस मग खूणावत असतं 
जाता जाता वळून पाहिलं, तर घर मागे एकट असतं 

घरासोबत ठेवते तरी, मी जग माझं सोबतीला 
पण गंमत नाही आपल्याशिवाय, आपल्याच या घरट्याला 

जाई, जुई, मोगऱ्याने, संध्याकाळ मग दरवळून जाते 
दिवसभराची थकावट सारी, चहामध्ये विरघळून जाते 

डोळे मिटून क्षणभर थोडं, कधी मी स्वतःशीच बोलते 
याच चार भिंतींमध्ये, अगदी मनापासून रमते 

या घरालाही असतात ना, लहान सहान भावना 
त्यानेही पाहिलेलं असतं आपल्याला, यशापयशात भिजतांना 

प्रेमाचा संवाद आपला, घरच फक्त ऐकत असतं 
लुटूपुटूच्या भांडणातही, आपल्या सोबत तेच असतं 

पिलालाही आपल्या, घराची या ओढ असते 
याच उबेत जग त्याचे, इथे तिथे घुटमळत असते 

आकाशातील चंद्र तारे, इथे सुधा चमकत असतात 
आजी आजोबांचे सुरकुतले हात, मायेची सावली देत असतातं  

रफी, किशोर ऐकता ऐकता, मग आरामखुर्ची डोलत रहाते, 
तसाच डोळा लागतो अन् रात्र अलगत सरत जाते ……  





Friday, September 19, 2014



परत प्रेमात पडायचय

मनातल बोलता आलं नाही ,
म्हणून लिहिली कविता
कधी डोळ्यातील वाचल नाहीस,
म्हणून लिहिली कविता ...

माझ्या या कवितेत ,
तू कधी होतोस वारा
तर कधी पौर्णिमेचा चांदवा
मोरपंखी स्वप्नातला तू
कधी त्या बेधुंद पावसासारखा ...
मनाच्या गाभाऱ्यातला
एक अलवार तरंग,
तर कधी उमलत्या बहरामधलं
पहाटेच गुलाबी स्वप्नं ..

पण canvas ब्रश कॅमेऱ्यात
शब्दांची हि भाषा
तुला कधी कळलीच नाही,
आणि तुझ्या रंगांची जादू
मला तशी समजलीच नाही ...
घालमेल, हुरहूर, तगमग, ओढ
या शब्दांचे अर्थ जसे उमलत गेले
तसे अलवार मोरपंखी नाते
अजूनच खुलत गेले ....

आभाळभर पसरलेला काळोख
अन तो निळा समुद्र किनारा
मूठभर चांदणं घेऊन ,
त्या चित्रात रंग भरणारा तू ...
कदाचित तू ही, तेच सांगत होतास
शब्दांनी नाही तर रंगानी ...

उन्हं कलती झाल्यावर ,
त्या पिवळ्या जर्द रानफुलांत
थव्याथव्याने परतणाऱ्या
पाखरांच्या किलबिलाटात ,
त्या हिरव्याकंच रानांत
जणू तू मलाच शोधत होतास ...
कारण रंगांची भाषा ,
आता मलाही येऊ लागलीए...

असं वाटतंय ,
नव्यानं काही लिहावं ,
अन् त्या नव्या कवितेसाठी
परत प्रेमात पडाव .... तुझ्याच !!!
 
  

Wednesday, September 17, 2014

' मनात राहता राहता
   जणू शब्दच विसरलेत भाषा
     तरी अश्रूंनी नाही मोडली
       ती पापण्यांची अलगत मर्यादा …'

Sunday, September 14, 2014

               ' तू …एक सोबत '

कधी नि:शब्द , कधी हळवी
डोळ्यातून बोलणारी , सहवासात खुलणारी
मनाला सांधणारी ,
बरोबर चालणारी.. दूर क्षितिजापर्यंत
तू …एक सोबत


कधी चांदण्यात हरवणारी,
तर कधी पावसात बरसणारी,
कधी सावलीसारखी भासणारी,
अन् कधी नात्यांच्या पलीकडची
तू …एक सोबत


आयुष्याच्या अनेक रंगात रंगणारी,
कधी समजावणारी,
अन् कधी सावरणारी,
'नि:स्वार्थ' शब्दात सामावणारी
तू …एक सोबत


तिन्ही सांजा ओढ लावणारी,
रितेपण संपवणारी,
अगदी हवीहवीशी वाटणारी,
आयुष्यभराची तू … एक सोबत
अथ पासून इति पर्यंतची …तू एक सोबत !!!