जिंदगी गुलजा़र है !
छोटा सा प्लॅनेट समझा था ,पैदा हुआ है
मेरे सोलर सिस्टम में !
मेरा नवासा - मेरा समय !
दो ही साल का है
और यूंँ महसूस होता है
सूरज वो है और हम सब -
उसके गिर्द घुमा करते है
मोह में कैसी ग्रॅविटी जैसी
ताक़त होती है !
गुलजार साहेबांनी आपला नातू 'समय' वरती लिहिलेल्या या ओळी वाचल्यावर वाटतं काय कमाल लिहिलं आहे ! एकीकडे 'मेघना' या कवितेत आपली मुलगी प्रसववेदना सहन करत असतांना एक पिता म्हणून व्यक्त केलेली हळवी मनःस्थिती तर दुसरीकडे आपल्या छोट्या नातवावर इतकी गोड कविता लिहिणारे इतके प्रेमळ 'नानू' ! Green Poems या त्यांच्या पुस्तकांतील कवितांमधून निसर्गातील सुंदरता, निसर्गाचे माणसाशी असलेले उत्कट नाते वाचायला मिळते. तर 'धूप आने दो', पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या मीनाकुमारी, साहिर आणि जादू, मेरे अपने सिप्पी साहेब, सगे सारे, मी आणि अब्बू या लेखांतून गुलज़ार साहेबांचं एक वेगळं रूप नजाकतीने उलगडत जातं.
कोवळ्या वयांत अनुभवलेली फाळणी कित्येक वर्षे त्यांनी आपल्या स्वप्नांमध्ये अनुभवली आहे. अनेक माणसांचे चेहेरे स्वप्नांत दिसायचे त्यांना, एकमेकात मिसळलेले , धूसर असे चेहेरे. कधी हात पाय कापलेले, स्वतःचे ते लुळेपांगळे रूप, चादर लपेटून डोक्यावर पगडी बांधलेला, समोरची नाली ओलांडून येणारा धीर देणारा 'तो' माणूस, ज्याला पाहून त्यांना वडीलांचे आश्वासक स्पर्श आठवायचे. ती घुसमट, ती भीती स्वप्नात पुन्हा पुन्हा ते अनुभवायचे. त्या असहायतेतून बाहेर पडण्यासाठी मग ते लिहू लागले. मनाला झालेल्या त्या जखमा, ते दुःख पुढे कितीतरी कवितांमधून, गाण्यांमधून डोकावत राहिलं. पण स्वप्नांवर असलेला त्यांचा विश्वास कमी न होता अजूनच दृढ होत गेला. स्वप्नं दिलासा देतात, हृदयावरचं ओझं हलकं करतात व स्वप्नांना अर्थ असतो हा त्यांचा विश्वास त्यांनी लिहिलेल्या अनेक गीतांमधून आपण अनुभवला आहे. स्वप्न एकाच वेळी वास्तव असतं आणि त्याच वेळी त्याच्यात फॅंटसीची कल्पना, रम्यता देखील असते. 'एक ही ख्वाब कई बार देखा है मैने' .. 'एक बात कहूँ, गर मानो तुम सपनो में न आना, जानो तुम' .. 'फिर वही रात है , रात है ख्वाब की' ...
स्वप्न हे कवितेसारखं नाजूक असतं, जसं हे स्वप्न..
'देखो आहिस्ता चलो
और भी आहिस्ता जरा,
सोच समझकर जरा पांँव रखना,
मैने तनहाई में कुछ ख्वाब सजा रखें है'…..
त्यांच्या गीतांमधून रात्र, चंद्र या प्रतिमा कायम डोकावत राहतात. 'जाने क्या सोचकर नहीं गुजरा, एक पल रात भर नहीं गुजरा'.. 'रात चुपचाप दबे पाँव चली जाती है, रात खामोश है, रोती नहीं, हँसती भी नहीं'.. योगायोगाने त्यांच्या गीत लेखनाची सुरवात पण एका अशाच गाण्याने झाली ज्यात गाण्याची situation रात्रच होती.. बंदिनी चित्रपटातील 'मेरा गोरा रंग लई ले, मोहे शाम रंग दै दे'.. रात्रीशी त्यांचं असलेलं नातं इतकं गहिरं आहे की ते म्हणतात, 'अनेक रात्रीतून उलगडत जाणारी एक रात्र माझ्या मनांत घर करून आहे'...
सुरवातीला मुंबईत एका रंगाच्या दुकानांत ते सेल्समनची नोकरी करत पण त्यात ना समाधान मिळत होतं ना पुस्तक वाचायला, कवितेत रमून जायला वेळ. मग काय ती नोकरी सोडून ते विचारे गॅरेज मध्ये नोकरीस लागले. पगार कमी होता पण त्यात आनंद होता, लिहायला वाचायला भरपूर वेळ मिळायचा. शिवाय सिनेक्षेत्रातील अनेक मंडळी त्या गॅरेज मध्ये यायची ज्यामुळे बासू दा, देबूसेन, शैलेंद्र, बिमल रॉय यांच्याशी ओळख झाली. आयुष्याला नवी दिशा मिळाली ती तिथेच !
पुढे पंचम सोबत जुळलेली त्यांची केमीस्ट्री इतकी जबरदस्त होती की या जोडीने अनेक कमाल गाणी अजरामर केली. गुलज़ारजींच्या मनांत आजही पंचमच्या आठवणी तितक्याच ठळकपणे सोबत आहेत.म्हणून तर ते म्हणतात, 'शिशिर ऋतूतली संध्याकाळ एक गूढ, पवित्र असा सुगंध घेऊन येते. त्या सुगंधासारख्या पंचमच्या आठवणी माझ्या सभोवताली कायम रेंगाळत राहतात'.. गुलज़ार साहेब सांगतात, 'एक संगीतकार जेव्हा म्हणतो की त्याच्या चालीला न्याय देण्यासाठी गायकाचा चेहेरा आठवण्याऐवजी त्याला गीतकाराचाच चेहेरा आठवतो तर त्यापेक्षा त्या गीतकाराला आणखी मोठा सन्मान कोणता मिळणार'? म्हणून तर पंचम कडून मिळालेला हा सन्मान त्यांना जीवनातला एक सर्वोच्य सन्मान आहे, असं वाटतं!
लहानपणी आई गेली, तिचा चेहराही आठवत नाही, जवळ तिचा साधा फोटोसुद्धा नाही. तरीही 'दो नैना और एक कहानी , थोडा सा बादल थोडा सा पानी' आणि 'सुरमई अखियों में नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे' सारखं गीत ते लिहितात. या भावना मांडताना इतक्या बखुबी भाषा वळवण्याचं त्यांचं कसब थक्क करणारं आहे.
संवेदनशीलता आणि तरल भाव हे गुलजार साहेबांच्या गाण्याचं खास वैशिष्ट्य ! आपल्या भावभावनांना वेगवेगळ्या रुपकांच्या कोंदणात सजवून त्यातील अर्थ अधिक गहिरा करण्याची त्यांची खुबी ! आपल्या कल्पनांना शब्दरूप देऊन त्यांनी अजूनच मोहक बनवलं. 'इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है' यातला हळुवारपणा मनाला स्पर्शून जातो. माचिस मधलं ‘पानी पानी रे’ किंवा ‘राझी’मधलं ‘मुडके ना देखो दिलबरो’ ऐकताना डोळ्यात पाणी येतं. 'रुके रुके से कदम, रुक के बार-बार चले, क़रार लेके तेरे दर से बेक़रार चले', सारखी गाणी मन कासावीस करतात. 'मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने', सारखा आशावाद , 'थोडा है थोडे कि जरुरत है', मधलं समाधान, 'वो शाम कुछ अजीब थी', मधलं गहिरेपण, 'भुले हुए नामोंसे कोई तो बुलाए' मधील आर्तता, 'आँखो में हमने आपके सपने सजाये है' मधलं प्रेम,'हजार राहे मुडके देखी', मधली बेवफाई, 'जाने क्या सोचकर नही गुजरा, एक पल रात भर नही गुजरा', मधलं एकटेपण, 'जीना तो सिखा है मरके, मरना सिखा दो तुम', यातील मनाची अवस्था टिपायला फक्त आणि फक्त गुलजारचं हवेत.
आयुष्यातील वेगवेगळ्या वळणांवर त्यांनी लिहिलेली गाणी नेहमीच आपल्याला जवळची वाटली, वाटतात. आपण आपल्या अनेक भावनांचं प्रतिबिंब त्यांच्या गाण्यांमध्ये पाहतो. कधी त्यांच्या गाण्यांनी आपल्याला प्रेमात पाडलं तर कधी एकटं असतांना सोबत केली. 'कभी जिंदगी का एक पल नहीं गुजरता, कभी जिंदगी एक पल में गुजर जाती है', हे त्यांनीच त्यांच्या शब्दांमधून सांगितलं. त्यांच्या गाण्यांतून आपण मुसाफिर म्हणून जगलो, प्रेम करायला शिकलो,जगणं शिकलो.. म्हणून तर 'जिंदगी गुलजा़र है' म्हणता म्हणता 'गुलजा़रही जिंदगी है' कधी झालं ते समजलंच नाही!
Happy Birthday Gulzar ji !
© कविता सहस्रबुद्धे
18/08/22