Tuesday, March 22, 2022

 सोनेरी क्षण 


कधी कधी काही प्रसंग तुम्हाला आरपार हलवून टाकतात,निःशब्द करून जातात तसंच काहीसं झालंय. अशा वेळी मनात दाटणाऱ्या भावनांना शब्दांत बांधणं खरंच अवघड होतं कारण तो अनुभव कळत नकळत तुम्हाला बरंच काही देऊन जातो. 

निमित्त होतं, सिंबायोसिस स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवाचं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर उपस्थित असतांना वयाच्या ८६ व्या वर्षी 'सामान्य विद्यार्थ्याला वैद्यकीय शिक्षण आर्थिक दृष्ट्या परवडेल यासाठी तुम्ही काही करावं', हे साकडं घालणारे आमचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार सरांना  ऐकतांना त्यांचे न थकलेले, न थांबणारे, नेमके प्रभावी शब्द त्या पलीकडे सुद्धा खूप काही सांगत होते. 'कित्येक दशकांच्या अनुभवाची शिदोरी सोबत आहे म्हणून मी हे धाडस करतोय', असं सांगत आपलं सारं आयुष्य विद्यार्थ्यांसाठी खर्ची घालणारी ती मूर्ती हात पाय व पूर्ण शरीर थरथरत असूनही मनाने मात्र किती ठाम उभी आहे याची प्रचिती त्या दिवशी सर्वांनाच आली. भाषण करत असताना अचानक सरांचे हातांना होणारे कंपन वाढले. त्यांच संपूर्ण शरीर थरथरत असतांना पाहून त्यांच्या काळजीने समोर बसलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला, सरांना काहीतरी होतंय हे समजलं आणि प्रत्येकाच्या डोळ्यांतून अक्षरशः पाणी वाहू लागलं. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या डॉक्टर विद्या मॅडम क्षणाचाही विलंब न करता उठून आपल्या वडिलांच्या पाठीशी आधार देऊन उभ्या राहिल्या. त्याच जागी खुर्चीवर बसण्याचा आग्रह करून त्यांनी सरांना खुर्चीत तर बसवलं अन पुढच्याच क्षणी सरांनी मात्र भाषणाची पुढची ओळ परत पकडत आपलं उरलेले भाषण पूर्ण केलं. या सोनेरी क्षणाचे साक्षीदार असणारे उपस्थित साडेपाच हजार प्रेक्षक त्यांचं भाषण पूर्ण होताच उत्फुर्तपणे उभे राहिले व टाळ्यांच्या कडकडाटात पुढील पाच मिनिटं उभं राहून त्यांनी सरांना, त्यांच्या जिद्दीला, शिक्षणावरच्या, विद्यार्थ्यांवरच्या त्यांच्या प्रेमाला तळमळीला मनापासून सलाम केला. ८६ वर्षांची मनानं चिरतरुण असणारी ती मूर्ती पाहून सारेच भारावून गेले. भाषण संपवून परत आपल्या जागी बसायला येणाऱ्या मुजुमदार सरांना पाहून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्या खुर्चीतून उठले, चार पावलं पुढे चालत गेले व आपल्या दोन्ही हातांमध्ये त्यांनी सरांचे दोन्ही हात पकडून आपल्या भावना व्यक्त केल्या. नजरेत साठवून ठेवावं असं ते दृष्य पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले. हा अनुभव एवढा गहिरा होता कि उपस्थित असणाऱ्या सर्व वयोगटांतील, सर्व स्तरातील प्रत्येकाची अवस्था एक सारखीच होती. ज्यांचा आदर्श आपण समोर ठेवतो आणि ज्यांच्या मूल्यांवर, शिकवणीवर जीवापाड प्रेम करतो अशा दोन दिग्गज, थोर, ऋषितुल्य व्यक्तीमत्वांमधला तो संवाद पाहून खरंच, आपण किती नशीबवान आहोत याची देही याची डोळा प्रचिती आली. त्याच बरोबर 'मोठं असणं' म्हणजे नक्की काय ते नकळत उमजलं. एक भारतीय असल्याचा अभिमान अंगावर मूठभर मास वाढवून गेला तर आपण किती सुरक्षित हातांत आहोत याची जाणीव मनाला अंतर्बाह्य दिलासा देऊन गेली.

©कविता सहस्रबुद्धे