#लतामंगेशकर#
अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे...
गेले चार पाच दिवस असं वाटत होतं, काहीही न बोलता फक्त गाणी ऐकावीत. पण डोळे बंद करून ती गाणी ऐकतांना डोळ्यांत नकळत दाटणारं पाणी तो आवाज हृदयाच्या किती जवळचा आहे, जणू हेच सांगत होतं. कोणताही पेपर उघडला अगदी फेसबुक पाहिलं तरी मोठमोठ्या दिग्गज मंडळींच्या आठवणींमधून 'तीच' डोकावत होती; तिच्या माहित असलेल्या, नव्याने समजलेल्या अनेक गोष्टींमधून. निःशब्द शांततेमधला, आसमंत व्यापून राहिलेला तिचा सूर, पुन्हा पुन्हा कानांत उमटत होता, 'नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज़ ही पेहेचान है.. गर याद रहे'... गुलजार साहेबांनी खरंच काय अद्भुत लिहिलंय आणि जिच्यासाठी लिहिलंय, कमाल !!
खरं तर समजायला लागलं तेव्हापासून कानावर अनेकदा तिचेच सूर पडले, जणू त्या सुरांचेच संस्कार झाले. एखाद्या गाभाऱ्यात उमटणारा पवित्र ओंकार, पसायदानातील शब्दांमधील खोली आणि विश्वाचं आर्त सामावणारा तो आवाज कळत नकळत खूप काही देत राहिला. शाळेमध्ये तिरंग्याला वंदन करतांना 'ए मेरे वतन के लोगो' या तिच्या सुरांनी भिजवलं, देश प्रेमाने अंगावर उठणारे रोमांच म्हणजे काय याची अनुभूती दिली व देशप्रेमाचा पहिला धडा मिळाला. सकाळी उठल्यावर कानांवर पडणाऱ्या 'मोगरा फुलला, रुणूझुणू रुणूझुणू रे भ्रमरा, अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळू , घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा' सारख्या गीतांमधून याच आवाजाने आपल्याला माऊलींच्या जवळ नेलं. आजूबाजूच्या लहान सहान गोष्टींचा दाखला देत माउली जेव्हा आपल्याला त्या अनोळखी क्षणांच्या गाभाऱ्यात घेऊन जातात तेव्हा तो अलौकिक शांततेपर्यंतचा प्रवास घडला, याच आवाजातून. 'घनु वाजे घुणघुणा' या विराणीतील वर्णनाप्रमाणे 'बासरी सारखा वाजणारा वारा' खरंच ऐकू आला, तिच्याच आवाजांत !
वात्सल्य, प्रेम, शृंगार, विरह, ओढ, भीती, करूणा, वैराग्य या भावनांचे पदर याच आवाजाने उलगडून दाखवले. 'मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं, जाईच्या पाकळ्यांत दव अजून सलते गं', या कवितेत भट साहेबांनी सासरी गेलेल्या मुलीच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या आईच्या मनाची व्यथा जितक्या हळुवारपणे मांडली तीच भावना त्याच ताकदीने याच आवाजातून अगदी आतवर पोचली. 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या'.. सुरेश भटांचे शब्द, पंडितजींचे संगीत आणि त्याला स्वरसाज लताबाईंचा. स्वतःच्याच मैफिलीत कित्येकदा गुणगुणलेल्या या ओळी. या गाण्यातील 'अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे' हि उपमा वापरून पंडितजींनी एकदा दीदींना संबोधलं होतं. पारिजातकाचं फुल हे स्वर्गीय फुल, स्वर्गलोकातून नारद मुनींनी ते आणलं आणि कृष्णाला भेट दिलं अशी आख्यायिका आहे, तसाच हा स्वर्गीय आवाज. 'भय इथले संपत नाही', ऐकतांना ती खोली ग्रेसांच्या शब्दांची कि बाईंच्या सुरांची हेच विसरायला होईल इतकं सारं एकरूप होऊन जातं आणि या सुरांच्या चांदण्याची जादू मनावर पसरते, ती कायमची ..
१९४९ मध्ये आलेल्या महल चित्रपटांतील "आयेगाss , आयेगाss , आयेगा आनेवाला" या गाण्यातून सौंदर्य व आवाजाचा एक चिरतरुण अध्याय एकत्र सुरू झाला. मोठ्या पडद्यावर पुढे अनेक चेहऱ्यांना, भावनांना हा आवाज मिळाला. शब्दांवर प्रेम करता करता या आवाजाच्या प्रेमात आपण कधी पडलो ते समजलच नाही. शब्दांची खोली याच आवाजातून उमजली. त्यांची प्रत्येक हरकत, लकब कानांत इतकी फिट्ट बसली की त्यांनी म्हटलेलं गाणं इतर कोणाच्या आवाजात ऐकतांना संगीतातील फारसं ज्ञान नसणाऱ्या सामान्य माणसाला सुद्धा तो फरक लक्षांत येऊ लागला. गाण्यातील विशेष शब्द स्वतःच्या खास अंदाजात बखूबी पेश करणं हे त्यांचं वैशिष्ट्य. उदाहरण द्यायचं झालं तर 'मुलायम' या शब्दांतला अर्थ जर अनुभवायचा असेल तर 'ये कहाँ आ गए हम, यूँही साथ साथ चलते', या गाण्यातील 'हुई और भी मुलायमss , मेरी शाम ढलते ढलते', ही ओळ डोळे मिटून नक्की ऐकली पाहिजे. आपल्या गाण्यात, आवाजातून त्यांनी व्यक्त केलेला अभिनय इतका देखणा असायचा की अभिनेत्रीला गाणं ऐकून पडद्यावर काय साकारायचं आहे ते समजून जायचं. 'बडा नटखट है ये, कृष्ण कन्हैय्या, का करे यशोदा मैंया' हे अमर प्रेम चित्रपटातील गाणं ऐका आणि जरूर पाहा. शर्मिलाजींनी एका मुलाखतीत हे आवर्जून सांगितलं होतं.
असं म्हणतात उस्ताद बडे गुलाम अली खांँ यांच्या collection मध्ये फक्त एकच चित्रपटगीत होतं , ते सुद्धा तिच्याच आवाजातलं, 'ओ सजना, बरखा बहार आई' … तबला आणि सतारीच्या एका सुरेख तुकड्यानंतर येणारा तिचा आवाज. या गाण्यांत 'मिठी मिठी अग्नि में जले मोरा जियरा' किंवा 'प्यासे प्यासे मेरे नयन, तेरे हि ख्वाब में खो गये' मधल्या नाजूक हरकती, ती नजाकत सांगून जाते या जादुई आवाजातील मखमली पोत काय चीज आहे ! असंच अजून एक गाणं पावसातलं, 'रिमझिम गिरे सावन'.. चिंब भिजवणारा पाऊस, प्रेमात पडल्यावर जरा वेगळा भासणारा. हेच गाणं किशोरदांच्या आवाजात ऐकतांना एक शांत, आश्वासक प्रेमाची अनुभूती मिळते तर दुसरीकडे लताबाईंच्या आवाजात हेच गाणं खट्याळ आणि खोडकर वाटतं.
लताबाईंच्या आवाजाला अनेक गीतकार आणि संगीतकारांचं कोंदण मिळालं. त्यांच्या अनेक गाण्यांवर भरभरून लिहिता येईल इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक गाण्यावर आपली छाप सोडली. 'मै न रहूँगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेंगी निशानियाँ ' हि ओळ त्यांनी इतकी हळुवार गायली आहे कि प्रेम चिरंजीव आहे हे वेगळं सांगावंच लागत नाही. राधेची वाट पहायला लावणाऱ्या कृष्णाबद्दल असलेली गोड तक्रार म्हणजे 'रैना बिती जाये, शाम ना आए' हे गाणं, एक विरहिणी आहे. यांत काळजी, व्याकुळता, ओढ, तगमग, विरह सारं काही आहे. चित्रपटांत हे गाणं जेव्हा संपतं तेव्हा एक वाक्य आहे, 'तुम्हारा नाम पुष्पा है.. मीरा होना चाहिये था'...एवढं पावित्र्य आहे या आवाजात ! असंच एक अजरामर गीत, 'बिती ना बिताई रैना'.. गुलजार साहेबांना अपेक्षित असलेला 'रैना' शब्दामधला विरह लता बाईंच्या आवाजात गहिरा होत जातो. रात्रीचा अनेक छटांना गुलजार साहेबांनी ज्या बखुबी लिहिलं आहे ते बाईंनी त्यांच्या हरकतींनी अलवारपणे अधोरेखित केलं आहे. भूतकाळातील सुखद रात्रीच्या आठवणीने आजची रात्र मात्र सरत नाहीए, हि आर्तता लताबाई आपल्यापर्यंत नेमकेपणाने पोहचवतात आणि म्हणूनच कित्येकदा हे गाणं त्याच प्रहरात आपल्याला सोबत करतं. 'तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं', 'रुके रुके से कदम थक के बार बार चले', 'दो नैनों में आँसू भरे हैं निंदिया कैसे समाये', सारख्या गाण्यातून हाच आवाज व्याकुळ करतो, अस्वस्थ करतो.
एक मात्र खरं लताबाईंच्या स्वरांनी आपलं जगणं श्रीमंत केलं. एकीकडे 'मालवून टाक दीप' सारख्या गाण्यातून नाजूक क्षण जपले तर कधी 'चिंब पावसानं रान झालं आबादानी ' म्हणतं त्या सुरांनी पावसात चिंब भिजवलं. 'नाss जिया लागे ना, तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना' सारख्या गीतांतून विरह सुद्धा ग्रेसफुली अनुभवायला शिकवला.'चांँद फिर निकला, मगर तुम ना आए', म्हणतं कधी कातर होत जाणाऱ्या सुरांनी रडवलं तर कधी 'रजनीगंधा फुल तुम्हारे', म्हणत बंधनामधलं सुख दाखवलं.'कुछ ना कहो, कुछ भी ना कहो', म्हणत तो क्षण दोघांनी जगायला शिकवलं. दुसरीकडे त्यांच्याच गाण्यांनी एकटेपणात सोबत केली, दुःख विसरायला मदत केली. कधी त्यांच्या अंगाई गीतांमधून आईचा भास झाला तर कधी हातातून नकळत निसटून गेलेल्या हातांची उणीव स्वीकारण्याची ताकत याच आवाजानं दिली. कोणाशी काहीही न बोलता परत परत काही गाणी ऐकण्यात असेलेली जादू याच आवाजाने जवळून दाखवली.'सिर्फ एहसास है ये, रुह से मेहसुस करो' म्हणजे नक्की काय याचा अनुभव दिला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटलेलं आणि आपल्या कित्येक भावनांचं साक्षीदार असलेलं व त्याला स्पर्शून गेलेलं तिचं गाणं …
कित्येक दशकं संगीताची सेवा करून त्यांनी आपल्याला त्यांच्या सोबत एका वेगळ्या उंचीवर नेलं, आपल्यातील संगीत कायम जिवंत ठेवलं. जातांना संगीताचा हा अमूल्य ठेवा त्या आपल्यासाठी मागे ठेवून गेल्या,परत परत अनुभवण्यासाठी…
©कविता सहस्रबुद्धे