Saturday, February 20, 2021

मागच्या पंधरा दिवसांपासून ऑफिस मध्ये ऍडमिशनचा सोहळा सुरु आहे. नवं वर्ष सुरु झालं कि दरवर्षी वेध लागतात याचे. मग काय जोरदार तयारी सुरु होतेअर्थात या वर्षी हितयारी करतांना भरपूर दमछाक झाली. सर्वच नवीन. मग काय झूम शब्दापासून सुरु होणारी गाणी म्हणत, आठवत, गुणगुणत सर्वांनी कामाला सुरवात केलीकोविडच्या कृपेने या वर्षी मुलांना zoom वर गोळा करून ऍडमिशनचा श्रीगणेशा झाला.पहिला दिवस तर छोट्या छोट्या गोंधळातून सावरत निभावला पण दुसऱ्या दिवसापासून मात्र 'झूम बाबा झूम' म्हणत सर्वांनी कंबर कसली

 

तसा रोजच संध्याकाळी घरी जायला उशीर होतो सध्या तरी दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहाने, जोमाने मांडवात परतायची ओढ मात्र कायम असते ! सोबत इथल्या वातावरणातील महाबळेश्वरचा फील हि रंगत अजूनच वाढवतो. मग काय चहा कॉफी सोडण्याची स्वप्नं हळुवारपणे हवे मध्येच हरवून जातात. संध्याकाळी वाफाळलेल्या चहाच्या जोडीला गरमा गरम वडापाव, समोसा मनाची पोटाची शांती अबाधित ठेवून सारं वातावरण प्रसन्न ठेवण्याची जबाबदारी बखुबी निभावतात. काम संपवून उशिरा घरी जातांना प्रत्येकाच्या  चेहरयावर पसरलेलं समाधान अनुभवण्यातलं सुख मात्र,कमाल असतं !

 

बरं, या सर्व प्रोसेस मध्ये काहीतरी काड्या सतत करत राहण्याचा विडा उचललेली काही अफलातून व्यक्तिमत्व एकीकडे आमचं काम वाढवतात तर दुसरीकडे वातावरणातला  ताण कमी करत सर्वांना हसायला भाग पाडतात. मग काय बोलावं असा प्रश्न सुद्धा पडतो. या सावळ्या गोंधळात जेवणासाठी मिळणारा वेळ सुद्धा दिक्षितांनी सांगितल्या प्रमाणे ५५ मिनिटे नाही तर फक्त १५ मिनिटांचाच असतो

 

दिवसभर अवतीभवती असणारा कोलाहल कधी कधी शांततेमधल्या सुखाची जाणीव करून देतो. त्यामुळे आज उगाचच वाटलं, कोणाशीही बोलू नयेजरा शांतपणे आपल्याच जागेवर बसून जेवावं. जेवता जेवता गाणं ऐकावं म्हणून एवढ्यातच डाउनलोड केलेल्या SPOTIFY ऍप वर मी गाणी लावली. खरं तर मला माझ्याच selected playlist मधली गाणी ऐकायला आवडतात. पण म्हटलं चला आज काहीतरी वेगळं ऐकू .. 80's ROMANTIC SONGS .. 'जाने क्या बात है , जाने क्या बात है '... आहा .. माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक ! खरं तर प्रत्येक मुलीने अनुभवलेली PHASE या गाण्यांत आनंद बक्षी साहेबांनी इतकी सुरेख चितारली आहे कि हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी त्याची जादू, नजाकत आजही तितकीच तरुण आहे. अनदेखा अनजाना चेहरा DDLJ च्या आधी याच गाण्यांतून दिसला होता खरं तर ... हे गाणं ऐकत ऐकत मी माझ्याच तंद्रीत होते. गाणं संपलं.. आता पुढचं गाणं कोणतं असेल असा मी विचार करत होते ...  कसं असतं ना, आपल्या प्ले लिस्ट मधली सगळी गाणी ,त्याचा SEQUENCE पाठ असतो पण अशी ऍप वर गाणी ऐकताना कोणतं गाणं असेल पुढे हि उत्सुकता वेगळी असते... आणि ती धून कानांवर पडली ... ओहो .. आर डी साहेब ,आशाजी आणि जावेदजी यांनी अजरामर केलेलं गीत .. करेक्ट तेच गाणं ... 'जाने दो ना SSS' ...  हे अनपेक्षित गाणं लागलं (म्हणजे हे गाणं लागेल हे मला अपेक्षित नव्हतं असं म्हणायचं आहे) आणि त्याच वेळी माझ्या केबिनच दार धाडकन उघडून माझ्या बॉसची आणि त्याच्या सोबत आमच्या टेक्निकल टिमची धमाकेदार एन्ट्री झाली.. हे पण अनपेक्षित.. सारंच अनपेक्षित !! 

 

आता एकीकडे या आशाजींना थांबवू कि आधी बॉसला 'येस सर' म्हणू काही समजेना.. बरं गाणं सुरु होतं तरी मोबाईलची स्क्रीन झोपली होती त्यामुळे PAUSE चं बटन पण हाताशी नव्हतं .. गाण्याचा आवाज इतकाही कमी नव्हता कि बॉसला ऐकू जाणार नाही किंवा गाण्याचे बोल त्याला समजणार नाहीत. अरे राम असं म्हणत मी मोबाईलशी खाडखूड करत आशा ताईंना कसं थांबवलं ते माझं मला माहित. 'वेळ काय, चाललंय काय आणि या मॅडम ऐकतायेत काय' असा बॉसचा चेहरा होण्याआधीच मी स्वतःला वाचवलं होतं. एकूण काय, तर सध्या तरी जीवाला काही शांतता मिळणार नाही हे पटलं होतंमग कायमनातल्या मनांत हुश्श करतसमोर उभ्या ठाकलेल्या पुढच्या प्रॉब्लेमला सोडवण्याकरता मी तयार होते...