Friday, September 4, 2020

आज ५ सप्टेंबर, शिक्षकदिन ! सौ. देव बाईंना सकाळीच फोन केला."देव बाई, कविता बोलते आहे",एवढंच माझं  वाक्य पुरेसं होतं त्यांना कोण कविता हे लक्षांत यायला. खरं तर हुशार विद्यार्थ्यांच्या लिस्ट मध्ये मी अजिबातच पुढे नव्हते तरीही शाळेतून बाहेर पडून तीस वर्षांनंतरही फक्त नाव सांगताच मला ओळखणाऱ्या बाईंचा आवाज ऐकून नकळत माझे डोळे पाणावले.. "बोल कशी आहेस ? " असं म्हणूतं मी त्यांची विचारपूस करायच्या आधी त्यांनीच माझी विचारपूस केली.फक्त माझीच नाही तर माझ्या पूर्ण बॅचची चौकशी केली सर्वजण कसे आहांत, इतकंच नाही तर तुझा भाऊ कसा आहे, मोठा डॉक्टर झालाय ना तो, सांग त्याला बाई आठवण काढत होत्या .. बापरे, म्हणजे बाई काहीच नाही विसरल्या ...

त्या वेळी स्कॉलर बॅच हा पहिला मान आमच्या बॅचला मिळाला होता.सर्व आघाड्यांवर आम्ही पुढे होतोच मग दंगा मस्ती मध्ये सुद्धा मागे कसे राहणार. १० E हा आमचा वर्ग एकदम happening जागा होती. इतिहासात घडते तशी रोज काहीतरी घटना आमच्या वर्गात सुद्धा घडायची. मनसोक्त दंगा मस्ती करणाऱ्या आमच्या संपूर्ण वर्गाला  हक्काने रागावणाऱ्या, वेळप्रसंगी आम्हाला शिक्षा करणाऱ्या, आमच्या काळजीपोटी '१० वी चे वर्ष आहे अभ्यास करा रे जरा' असं डोळ्यांत पाणी आणून आम्हाला समजावणाऱ्या बाई समोर दिसू लागल्या आणि वाटलं तेव्हा खरंच समज नव्हतीच आपण किती नशीबवान आहोत याची पण शाळेतून बाहेर पडल्यावर समजलं आणि जाणीव पण झाली.. साऱ्याचीच !

बाईंना फोन केला आणि कानडे बाईंचा विषय नाही निघाला असं होतं नाही. माझ्यासाठी शिक्षक म्हणताच कायम समोर येतात त्या देव बाई आणि कानडे बाई.आयुष्यभर आठवणींत राहतील व ज्यांची शिकवण कायम सोबत राहील असा हा ठेवा आमच्या शाळेनेच दिलेला... देव बाई म्हणाल्या तुझ्यासारखीच मला पण आज कानडे बाईंची खूप आठवण आली. त्या मला गुरूंच्या जागी. वयानं,अनुभवानं, ज्ञानानं त्या मोठया होत्याच शिवाय माणूस म्हणून सुद्धा..  मी खूप काही शिकले त्यांच्याकडून !  हे ऐकल्यावर वाटलं एक गुरु शिष्याचं नातं जपणाऱ्या या दोघी आपल्याला शिक्षक म्हणून लाभणं म्हणजे आपण भाग्यच !

माझ्या लिखाणाबद्दल उत्सुकतेने चौकशी तर केलीच शिवाय कोणतीही गोष्ट वाचतांना किंवा अनुवादित करतांना त्यात असलेला BETWEEN THE LINES हा घटक किती महत्वाचा असतो हे त्यांनी उलगडून दाखवलं. लिखाण, वाचन आणि सतत नवीन काहीतरी करत राहणं कधीही सोडू नको हे सांगताना 'What's App वरचं मला नीट वाचता येत नाही त्यामुळे तू अनुवादित केलेला त्या पुस्तकातील लेख मला वाचायला आणून दे, मला आवडेल वाचायला आणि त्या निमित्ताने घरी येशील असं त्यांनी आवर्जून सांगताच मला खूप छान वाटलं...

मध्यंतरी त्यांच ऑपरेशन झालं तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांनी केलेली मदत, हॉस्पिटल मध्ये रात्री थांबून घेतलेली काळजी, प्रत्यक्ष भेटून आणि नंतर lockdown मुळे आलेले चौकशीचे फोन पाहून त्यांच्या घरची मंडळी थक्क झाली हे सांगताना त्या म्हणाल्या शाळेत असतांना प्रत्येक वर्षी वाढत गेलेली माझी हि संपत्ती खूप अमुल्य आहे .. शिक्षकासारखा श्रीमंत दुसरा कोणी नाही ! 

हे ऐकून वाटलं परत शाळेत जावं, काकांनी वाजवलेली शाळेची ती घंटा परत ऐकावी, १० E च्या त्याच वर्गांत जाऊन त्याच शेवटच्या बेंचवर बसून देवबाईंचा तो तास परत एकदा तसाच रंगावा ....