Tuesday, June 30, 2020

The Man Who Spoke in Pictures .. Bimal Roy

या पुस्तकामधील गुलजार साहेबांनी सांगितलेली बिमल रॉय यांची आठवण अनुवादित करण्याचा एक प्रयत्न ..


बिमलदा

लोक या पवित्र स्नानाच्या दिवसाला 'जोग स्नान का दिन' असं म्हणतं. अलाहाबाद येथील गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर या दिवशी जो स्नान करतो त्याचे सारे आजार दूर होतात, सारी पापं धुतली जातात आणि तो माणूस शंभर वर्षांपर्यंत जगतो अशी आख्यायिका आहे.

मी बिमलदांना विचारलं " तुमचा विश्वास आहे या सर्वांवर ?" बिमलदा चेहऱ्यावर एक हसू आणतं उत्तरले " शास्त्रांमध्ये लिहिलंय असं, शेवटी हा विश्वासाचा भाग आहे".

खगोलशास्त्राप्रमाणे हा दिवस बारा वर्षांमध्ये एकदा येतो. सूर्यमालेतील सर्व नऊ ग्रह जेव्हा एका विशिष्ट स्थितीमध्ये येतांत आणि जेव्हा सूर्याची पहिली किरणं या संगमावर पडतात तेव्हा कुंभमेळा साजरा केला जातो. कुंभमेळ्याची तयारी पुष्कळ महिने आधीपासून सुरु होते. लाखो करोडो भाविक या प्रसंगी इथे जमतात. अलाहाबाद पासून प्रयाग पर्यंत सर्वत्र खूप गर्दी असते. जवळपासच्या गावांमध्ये भाविकांना राहायला जागा सुद्धा मिळत नाही. हा सोहळा 'पूर्ण कुंभ मेळा' म्हणून सुद्धा ओळखला जातो. अनेक दिवस चालणाऱ्या या सोहळ्यातील शेवटचे नऊ दिवस खूप महत्वाचे असतात आणि हा नववा दिवस म्हणजे 'जोग स्नानाचा दिवस'.

सन १९५२ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यांतील अपघातांत जवळपास एक लाख लोक चेंगराचेंगरीत ठार झाले. या अपघाताचं नेमकं कारण शेवटपर्यंत समजलं नाही. वेगवेगळ्या समित्या स्थापन करून सखोल चौकशी झाली पण हाती काही लागलं नाही, मिळाले ते वेगवेगळे तर्क. काही लोकांचं म्हणणं पडलं कि नागा साधूंचे हत्ती माणसाची गर्दी पाहून भेदरून गेले व त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. सैन्यदलाने तात्पुरते उभारलेले लाकडी पूल कोसळले, लोक सैरावैरा पळू लागले, खाली पडले, तुडवले गेले तर अनेकजण वाहून गेले. कुंभमेळ्याच्या इतिहासातील हि सर्वात वाईट घटना ठरली.

समरेश बासू यांनी या घटनेवर 'अमृत कुंभ कि खोज में ', हि कादंबरी लिहिली आणि बिमल रॉय ज्यांना सगळे 'बिमलदा 'म्हणत त्यांनी या कादंबरीवरून चित्रपट बनवायचं काम सुरु केलं.

मी बिमलदांचा असिस्टंट होतो. कधी कधी मी त्यांच्या चित्रपटांत गाणीही लिहीत असे. यावेळी या चित्रपटाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत सिनेमाचं स्क्रिप्ट लिहीत होतो. कदाचित बिमलदांना अशा एका लेखकाची गरज होती जो त्यांच्या सवडीनुसार त्यांच्यासोबत बसून काम करू शकेल, चर्चा करून चित्रपटातील दृश्य लिहून काढू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे मला बंगाली आणि हिंदी या दोन्ही भाषा येत होत्या. मूळ कादंबरी बंगाली भाषेत होती आणि स्क्रिप्ट लेखन मात्र हिंदीमध्ये होतं. सवड मिळेल तेव्हा बिमलदा या कादंबरीवर काम करत होते. कादंबरीच्या समासात त्यांनी असंख्य नोट्स लिहिल्या होत्या, दोन ओळींमधल्या जागेत जणू अजून एक कादंबरी लिहिली जात होती. एक तर ती कादंबरी इतकी मोठी, त्यात छोट्या छोट्या कागदांवर लिहिलेली असंख्य टिपणं पुस्तकामध्ये जागोजागी टाचणीने लावून ठेवल्याने त्या पुस्तकाचे पोट चांगलेच फुगले होते, जणू त्या पुस्तकाला दिवस गेलेत असं वाटत होतं. पुस्तकाची शिवण उसवू लागली होती. बिमलदांनी या कादंबरीतील प्रत्येक व्यक्तिरेखा इतक्या जवळून पाहिली होती, अभ्यासली होती जणू हि कादंबरी त्यांच्या आयुष्याचा आता एक भागच बनली होती.

"हि कादंबरी तुम्ही कधी वाचलीत ?" मी एकदा बिमलदांना विचारलं.

" १९५५ मध्ये जेव्हा हि कादंबरी क्रमश : प्रकाशित झाली त्यावेळी. तेव्हा कलकत्याला आनंद बाजार पेपर प्रकाशित व्हायचा. समरेश तेव्हा त्याच संस्थेत काम करत होता".

"तुम्ही समरेश ला ओळखायचा ?"

"हं ... " बिमलदा खूप सावकाश बोलत. त्यांच्या 'हं.. '  मध्ये खूप काही दडलेलं असायचं, मोठा कमाल शब्द होता तो. हजार अर्थ सामावून घेणारा. या वेळी वाटलं त्यांना याबद्दल फारसं बोलायचं नाहीये, तसंही ते खूप कमी बोलत. मग सिगरेटचे दोन झुरके मारल्यावर ते पुढची गोष्ट सांगू लागले.

"मूळ कादंबरी समरेश नी आपल्या नावाने छापली नव्हती 'कालकूट' या नावाने ती प्रसिद्ध होतं असे".

"हम्म" ... मी ते पुढे काय सांगतात याची वाट पाहू लागलो..

 ते पुढे म्हणाले, " साधारण पंधरा भागांनंतर पुढच्या प्रकाशित होणाऱ्या भागांमध्ये थोडं अंतर होतं.  मी अस्वस्थ झालो. मी आनंद बाजार ला पत्र पाठवलं. समरेश नी माझ्या पत्राला उत्तर पाठवलं आणि मला समजलं कि...." आणि त्यांना खोकल्याची चांगलीच उबळ आली. खुर्चीतून उठून ते गच्चीत गेले.

कादंबरीत म्हटलं तर तसा काही प्लॉट नव्हता पण प्रत्येक पात्र सजीव असल्याचा भास मात्र नक्कीच होता. ज्या भूमिकेतून हि गोष्ट लिहिली होती ती गोष्ट बिमलदा त्यांच्या डायरीमधून मला परत परत वाचायला लावत, लेखकाच्या नजरेतून ती गोष्ट अलवार उलगडत होती.

कादंबरीच्या सुरवातीला खचाखच भरलेली एक ट्रेन प्रयाग रेल्वे स्थानकावरून अलाहाबादकडे रवाना होते. काहीच वेळाचा प्रवास बाकी असतो. अशा वातावरणात उत्साहाच्या भरात लोकं भजनं गाऊ लागतात. ट्रेन च्या वरती बसलेली मंडळी ट्रेन च्या छपरावर ठेका धरतात, जोरजोरात उद्घोष करू लागतात. ट्रेन हळूहळू अलाहाबाद स्टेशन वर पोहचते. एखाद्या ब्लॅकहोल मधून बाहेर पडावं तशी त्या ट्रेन मधून माणसांची झुंबड बाहेर पडू लागते. क्षयरोगातुन बरं होऊन दीर्घ आयुष्य मिळावं या उद्देशाने कुंभमेळ्यात स्नानाकरिता आलेला बलराम  याच गर्दीतून वाट काढत असतो. तिथे झालेल्या माणसांच्या चेंगराचेंगरीत तो लोकांच्या पायाखाली तुडवला जातो आणि मरतो.

बिमलदांना इथे नेमक्या याच गोष्टीचा आक्षेप होता, " समरेशनी या माणसाला खूप लवकर मारलं "..

यावर मी माझं प्रामाणिक मतं त्यांचा आदर ठेवून व्यक्त केलं, " दादा, हा मृत्यू कादंबरीच्या संपूर्ण कथानकाकडे एक संकेत करतोय आणि कथेमधला तोल सुद्धा सांभाळतोय ".

"हम्म  .. परंतु चित्रपटाच्या दृष्टीने हा खूपच लवकर आहे. असो, बघू यांत. तू वाच पुढे ".

हि गोष्ट आहे १९६२ ची. दरम्यानच्या काळांत बिमलदांनी दोन चित्रपट बनवले होते, बंदिनी आणि काबुलीवाला. दुसरीकडे 'अमृत कुंभ' या चित्रपटावरच काम सुरूच होतं. काही छोटे छोटे सीन चित्रित देखील झाले होते. विशेषतः कुंभमेळ्यातील काही दृश्य जी कृत्रिम पद्धतीने नंतर चित्रित होणं अवघड होतं. आम्ही काही दुसऱ्या मेळ्यांमध्ये जाऊन सुद्धा चित्रीकरण केलं. अलाहाबादच्या संगमावर दरवर्षी अजून एक मेळा भरतो, माघ मेळा. १९६३ सालच्या हिवाळ्यात आम्ही पुढील चित्रीकरणाची  तयारी सुरु केली कारण दोन वर्षांनंतर 'पूर्ण कुंभमेळा' साजरा होणार होता.

माघ मेळ्याची तयारी सुरु असतांनाच बिमलदा आजारी पडले. पुढील काही दिवस अंगात ताप असतांनासुद्धा ते ऑफिस मध्ये येत होते. कामापासून दूर असले कि ते खूप अस्वस्थ व्हायचे. असं म्हटलं जायचं कि जणू चित्रपटासोबतच त्यांचं लग्न झालं होतं आणि उशाशी चित्रपटाची रीळ असली कि मगच त्यांना छान झोप लागायची.

पुढे काही दिवस ते ऑफिसला आले नाहीत तेव्हा मी थोडा काळजीत पडलो.मग एक दिवस त्यांना भेटायला मी त्यांच्या घरी गेलो. सोबत सिनियर कॅमेरामन कमल बोस होते. बिमलदा समोरील व्हरांड्यात बसले होते. समोरच्या टेबलवर चहाच्या कपासोबत असलेलं चेस्टरफील्ड सिगारेटचं पाकीट आणि नेहमीप्रमाणे दोन बोटांमध्ये जळतं असलेली एक सिगरेट.

आम्ही त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, ते म्हणाले " मी काही अलाहाबादला येऊ शकणार नाही तेव्हा तुम्ही दोघेजण जा आणि मेळ्यातील काही छान शॉट्स घेऊन या." पुढे कितीतरी वेळ ते आम्हाला शॉट्स बद्दल सांगत राहिले. 'अमृत कुंभचं' जवळपास संपूर्ण स्क्रिप्ट त्यांच तोंडपाठ झालं होतं. एकीकडे ते आम्हाला शॉर्ट्स बद्दल सांगत होते तर दुसरीकडे चहाचा एकेक घोट घेत सिगरेट ओढत होते. मधूनच त्यांना खोकला येत होता.

शेवटी कमलदा बंगाली मधून त्यांना म्हणाले सुद्धा,"एकतर आपण काम थांबवू किंवा तुम्ही सिगारेट ओढणं थांबवा",  परंतु "हम्म  ..." एवढीच प्रतिक्रिया देऊन ते स्क्रिप्ट बद्दलच बोलत राहिले.

अलाहाबादला जायला निघण्यापूर्वी बिमलदांना कॅन्सर आहे हे घटक बाबूंकडून समजलं.

"बिमलदांना माहिती आहे ?"

"नाही"..

घटक बाबूंनी घशातील कोणत्या तरी नळीचा उल्लेख केला तेव्हा कमलदा म्हणाले "म्हणजे त्यांच्यासाठी सिगरेट अत्यंत हानीकारक आहे "..

"हो आहे , पण बिमल माझं ऐकत नाही. त्याला कसं समजवायचं हेच कळत नाहीये. कसं सांगू त्याला कि तुला कॅन्सर आहे आणि लवकरच तू मरणार आहेस ते ? तो खूप पटकन घाबरतो".. सुधीर घटक आमचे मॅनेजर होते आणि न्यू थिएटरच्या जमान्यापासून ते बिमलदांचे जवळचे मित्र होते.

अलाहाबादमध्ये चित्रीकरण करतांना कामात लक्ष लागत नव्हतं, मनांत एक बैचेनी होती. काम चांगलं सुरु होतं पण समाधान मिळतं नव्हतं. आमचा नेहमीचा उत्साह कुठेतरी हरवला होता. कमलदा गप्प होते आणि मी सुद्धा. खरं तर खूप काही गोष्टी बोलायच्या होत्या पण आम्ही एकमेकांशी बोलू शकत नव्हतो.  बिमलदांच्या कॅन्सरची भीती आमच्या मनावर इतकी दाट पसरली होती कि आम्ही जे काही करत होतो ते व्यर्थ आहे आणि हा चित्रपट सुद्धा बनू शकणार नाही असं वाटू लागलं.बिमलदा आता जास्त दिवस जगणार नाहीत हे स्वीकारणं खूप अवघड होतं.

एक दिवस शूटिंग वरून परत आल्यावर कमलदांनी मला विचारलं , " बिमलदा हा चित्रपट का बनवत आहेत ?"

"मी एकदा विचारलं होतं. त्यांना ," मी उत्तरलो.

" काय म्हणाले मग ते ?"

मी त्यांना आमच्या मध्ये झालेल्या चर्चेबद्दल सांगितलं. बिमलदा म्हणाले होते, " शंभर वर्ष जगण्याची संजीवनी देणारं अमृत शोधणारा तो लेखक मीच आहे...."  सिगरेटच्या सर्वत्र पसरलेल्या धुरामुळे त्यांना खोकला आला, चेहरा लालबुंद झाला व धाप लागली. थोडं शांत झाल्यावर ते म्हणाले, " मी सुद्धा त्याच अमृताच्या शोधात आहे ..."

काहीसं गोंधळून मी त्यांना विचारलं, "खरंच..  तुम्हाला शंभर वर्ष जगायचं आहे ? "

"हं ..."

त्या दिवशी ती गोष्ट तिथेच थांबली. परत एकदा कधीतरी बोलतांना ते मला म्हणाले, " शंभर वर्ष म्हणजे मोजून शंभर वर्ष नव्हेत रे , याचा अर्थ मनुष्य अमर होतो, हे अमृत पिऊन "..

" ते कोणतं अमृत आहे ?"

बिमलदा खूप वेळ दूरवर कोठेतरी पाहात राहिले ..

आता मागे वळून पाहिलं कि वाटतं, बहुदा त्यांना तेव्हा समजलं होतं कि त्यांना कॅन्सर आहे ते ...

मग ते म्हणाले, " संस्कृती, मला आपल्या मातीच्या संस्कृतीचा भाग बनून मागे राहायचं आहे ज्यामुळे  ... "  कदाचित त्यांना म्हणायचं होतं 'मी जिवंत राहीन, मला अमरत्व मिळेल' पण ते बोलले नाहीत..

आम्ही मुंबईला परतलो तेव्हा बिमलदांचा आजार जास्त बळावला होता. पण कधीही न थकणाऱ्या या दिग्दर्शकाने अजून एक चित्रपट सुरु करण्याचा निश्चय केला व त्या चित्रपटाचं नाव तेव्हा 'सहारा' असं ठरवण्यात आलं.

"आणि अमृतकुंभ"? मी त्यांना विचारलं.

" ठरल्याप्रमाणे तो तर होईलच. १९६५-६६ साली बारा वर्ष पूर्ण होतील आणि पूर्ण कुंभ मेळा परत एकदा भरेल. आपण त्यानंतर तो चित्रपट पूर्ण करू".

तेव्हा १९६४ साल चालू होतं. मनांत कुठेतरी असं वाटत होतं कि बिमलदांकडे आता जास्त वेळ नाहीये. सहारा  चित्रपटाचं काम सुरु झालं, तीन चार दिवसांचं शूटिंग सुद्धा झालं. एक दिवस बिमलदा सेटवरून गेले ते परत आलेच नाहीत. कॅन्सरमुळे होणारा त्रास अचानक वाढला. त्यांना सिगारेट सोडावी लागली. आपल्या आजाराची त्यांना पूर्ण कल्पना आली. काही टेस्ट्स झाल्या आणि पुढील उपचाराकरता ते लंडनला गेले पण काहीं दिवसांतच निराश होऊन परतले.

" मला माझ्याच घरी मरायचं आहे", असं ते एकदा कोणालातरी बोलले होते. अशा कठीण अवस्थेत साधारण एक वर्ष गेलं असेल. तेव्हा ऑफिस बंदच असायचं. युनिटने तेव्हा 'दो दुनी चार' नावाचा एक चित्रपट सुरु करण्याचा प्रयत्न केला व त्यावर तुरळक काम सुरु केलं.. पण कशातच मन लागत नव्हतं. सभोवताल एक विचित्र वातावरण झालं होतं. कोणत्याही क्षणी बिमलदांची बातमी येईल हि भीती सर्वांच्याच मनांत होती आणि सोबत हतबल करणारी असहायत्ता..

एक दिवस बिमलदांनी मला बोलावलं आणि विचारलं, " तू 'अमृत कुंभ' च्या स्क्रिप्ट वरती काम करतो आहेस कि नाही "

मला समजेना मी काय बोलू. त्यांच्याकडे पाहून रडायला येत होतं. त्यांची तब्येत फारच ढासळली होती, वजन खूप कमी झालं होतं. सोफ्यावरती कोपऱ्यात ठेवलेल्या उशी सारखे दिसत होते ते, जणू एका हाताने उचलता येईल इतके हलके.

ते नाराज झाले. मला म्हणाले, " तुला सांगितलं होतं कि या गोष्टीतील बलरामाचा मृत्यू खूप लवकर होतोय. हा सीन त्याच्या मूळ जागेवरून उचल आणि योग्य जागी घे. नऊ दिवसाच्या पूजेच्या सुरवातीला पहिल्याच दिवशी त्याचा मृत्यू होतो असं लिही".

मी गप्प होतो. ते मला म्हणाले, " उद्यापासून रोज संध्याकाळी आपण या स्क्रिप्टवरती काम करू.  या वर्षीच पूर्ण कुंभमेळा आहे, डिसेंबर मध्ये सुरु होईल. "

" हो, ३१ डिसेंबर पासून नऊ दिवसांची पूजा सुरु होईल व जोग स्नान १९६६ मध्ये येईल," मी उत्तरलो.

त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने "हम्म ..." असं म्हणून ते शांत बसले.

त्यांनी सांगितलेले बदल स्क्रिप्ट मध्ये करून मी दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो. बिमलदांना स्क्रिप्ट तोंडपाठ होतं. त्यांनी मला त्यांच्याकडची पुस्तकाची प्रत द्यायला सांगितली सांगितली.  त्या पुस्तकाची संपूर्ण शिवण उसवली होती आणि जवळपास सगळी पानं मोकळी झाली होती. काही दृश्यांबद्दल चर्चा झाली आणि ती परत बलराम वरती येऊन थांबली.

"बलरामचा मृत्यु अजून पुढे घेऊन ये, हा अजूनही खूप लवकर वाटतोय ... "

मी माझी थोडीशी नाराजी दाखवली पण त्यांच मन नाही मोडलं.

"खरं तर तो लेखक आणि श्यामा एकमेकांपासून वेगळे झाले कि हा मृत्यू दाखव, पूजेच्या पाचव्या दिवशी आणि हो मेळ्यात शूटिंग कराल तेव्हा हे लक्षांत ठेवालं कि ...... "


स्क्रिप्ट लिहिता लिहिता बिमलदा शूटिंग ची सुद्धा तयारी करत. घटकबाबूंना ते खूप सूचना देत व आज्ञाधारकपणे  घटकबाबू त्या सर्व सूचना टिपून ठेवत.

दोन तीन दिवसांनी बलरामचा मृत्यु त्यांनी परत एकदा बदलला... स्क्रिप्टच्या सुरवातीला असलेला बलरामचा मृत्यू आता स्क्रिप्टच्या शेवटाला पोहोचला. तरीही बिमलदांच समाधान मात्र होतं नव्हतं. दोन तीन महिन्यांच्या चर्चेमध्ये बलराम कधी दोन दिवस आधी मरायचा तर कधी त्याला चार पाच दिवस जीवदान मिळायचं. हळूहळू का होईना पण हा मृत्यु पुढे जात होता.

एक दिवस मी अचानक न ठरवता त्यांच्याकडे गेलो. खूप आनंदात ते मला म्हणाले, " शेवटी मिळाली, मला योग्य जागा मिळाली त्या दृष्याकरता. जोग स्नानाच्या दिवशी पहाटे सूर्याची पहिली किरणं या संगमावर पडतात ..... " उत्साहाच्या भरांत बोलताना त्यांना खोकल्याची उबळ आली व खिळखिळं झालेलं त्यांचं पूर्ण शरीर हाललं,पण ते बोलत राहिले, " तेव्हा त्याचा मृत्यू होतो... हा पहिला मृत्यू गोष्टीच्या क्लायमॅक्स मधील चेंगराचेंगरीला बॅलन्स करेल. बलराम जोग स्नानाच्या दिवशी मरेल"...

मी माझी सहमती दाखवली तसंच घटक बाबूंनी सुद्धा स्वीकृती दर्शवली. बिमलदा खूप उत्साहात होते त्या दिवशी. ते म्हणाले, " मला एक सिगारेट दे"..

" का ? काय झालं अचानक ?"

ते बंगालीत बोलत होते. बिमलदा म्हणाले, " अरे दे ना ... "

" नाही नाही, तुला सिगारेट मिळणार नाही "..

" का ? का नाही मिळणार ?"

" मी सांगतोय ना तुला, डॉक्टरांनी मनाई केली आहे ".. घटकबाबू ठामपणे बोलले.

त्या वेळी बिमलदांचे खोल गेलेले डोळे असहाय्य अश्रूंमध्ये बुडतांना मी पाहू शकलो नाही. मला सहन झालं नाही ते आणि मी तिथून बाहेर पडलो. पुन्हा गेलो नाही. मी त्यांना त्या अवस्थेत पाहूच शकणार नव्हतो. माझ्यासारखीच अवस्था प्रत्येकाची होती. एक भीती होती मनांत, पुढे घडणाऱ्या वाईट गोष्टीची ..

१९६४ हे वर्ष झपाट्यानं संपत होतं आणि बिमलदा देखील ... त्यांच बिछान्यावरून उठणं बसणं बंद झालं. घटकबाबू शेवटपर्यंत त्यांच्या सोबत होते. रात्रभर बिमलदांच्या खोलीतील एका आराम खुर्चीत ते झोपायचे.

बिमलदा गेले त्या रात्रीची गोष्ट घटकबाबूंनी सांगितली. " मी खोकण्याचा आवाज ऐकून जागा झालो. बघितलं तर बिमल आपल्या बिछान्यात बसून सिगारेट ओढत होता. मी विचारलं, "हे काय करतो आहेस तू ?" तर शांतपणे म्हणाला, " सिगरेट ओढतोय." मी जागेवरून उठलो नाही आणि तिथूनच त्याला समजवायचा प्रयत्न केला. तेव्हा तो म्हणाला, "काय होईल ? सिगरेट सोडली पण काही मदत झाली नाही तेव्हा ओढली तरी काही होणार नाही "..
त्याला परत खोकल्याची उबळ आली, श्वास कोंडला.. तो थोडा सावरला तेव्हा मी परत म्हणालो, " बिमल बास आता, फेकून दे ती सिगारेट, नको ओढू रे "..

" का ? हा पहिला दिवस नाहीये ... मी मागचे दहा दिवस सिगरेट ओढतोय. तू मला घाबरवतो आहेस कारण तू आज उठलास  .. "

बिमलनी आरामात ती संपूर्ण सिगरेट ओढली आणि तो झोपी गेला... कायमचा , कधीही न उठण्याकरता ..

मला सकाळी बातमी समजली आणि इतके दिवस माझ्या डोक्यावर लटकणारी ती भीतीची तलवार अखेर गळून पडली..माझे श्वास भानावर येताच माझ्या डोळ्यातील अश्रूंना मोकळी वाट मिळाली... तो दिवस होता , ८ जानेवारी १९६५, 'जोग स्नानाचा' दिवस !


- गुलजार

( अनुवाद - कविता सहस्रबुद्धे )