Thursday, March 5, 2020

परवाच एक लेख वाचला, आपणच आपल्या भावविश्वाचे द्वारपाल असतो. आपल्या भावविश्वात कोणत्या विचारांचे स्वागत करायचे आणि कोणत्या विचारांना दूर ठेवायचे यावरच आपला आनंद अवलंबून असतो. हे जरी खरं असलं तरी असा विचार करून त्याप्रमाणे वागणं सोपं नक्कीच नाही. 

आजवरच्या आयुष्यात अनेक नाती, अनेक संबंध निर्माण झालेले असतांत. काही नात्यांमधली भावनिक गुंतवणूक तसूभर जास्तच असते आणि मग साहजिकच अपेक्षाही वाढतात. शुल्लक अहंकारापायी विस्कटलेली नाती आणि ताणलेले संबंध यामध्ये जीव घाबरुन जातो. लहान सहान कारणावरून रुसलेले जीव हक्कानं रागावून झालं कि त्याच हक्कानं झालं गेलं विसरून परत एकत्र न येता दुरावत जातात आणि यांतच नातं फोल ठरतं. मग ते कोणतंही असो, घरातलं, मैत्रीचं किंवा ऑफिस मधलं. म्हणूनच गोष्टींना पकडून न ठेवता सोडून देता येणं महत्वाचं. बोलून अनेक प्रश्न सुटतात म्हणून व्यक्त होता आलं पाहिजे. 'जरा चुकलंच माझं', हे मोकळॆ पणाने स्वतःला सांगता आलं पाहिजे. 

आजच्या आभासी जगात वावरतांना आठवण आली म्हणून आवर्जून येणारा एखादा फोन खूप आनंद देऊन जातो. आपली आवड लक्षांत ठेवून कोणी डब्यातून पाठवलेला खाऊ डोळ्यांच्या कडा भिजवतो. कित्येक दिवसांत भेट नाही म्हणून समोर येताच मारलेली मिठी तो स्पर्श न बोलता सुद्धा खूप काही देऊन जातो. एकमेकींची केलेली विचारपूस, कॉफीच्या निमित्ताने स्वतःसाठी काढलेला वेळ व त्या मनसोक्त गप्पांमध्ये विरून गेलेला ताण, छोट्या छोट्या गोष्टीत एकमेकींच केलेलं कौतुक, गरजेला केलेली मदत, यांत मिळणारा आनंद खूप वेगळा असतो मग तो आपण नको का अनुभवायला. मैत्रिणीचा आलेला एक फोन दिवसभराचा सगळा शीण थकवा घालवतो. एक स्त्री म्हणून आपण आपल्याच वर्तुळातील स्त्रियांना समजून घेतलं तर कित्येकजणींच मानसिक आरोग्य आपसूकच थोडं का होईना जपलं जाईल आणि आपल्यालाही एक सकारात्मक ऊर्जा मिळेल नाही का ?

'असे रंग रंगात मिसळून जावे ,
नाते उरावे मी पण सरावे' ...

चला तर या शब्दांमधला आनंद सगळ्या जणी मिळून शोधू यांत !!!!