Tuesday, November 3, 2020

 रिश्ते में तो हम तुम्हारे टीचर है ....


‘मी इतका मोठा नक्कीच नाही जेवढं तुम्ही कौतुक करत आहात. मी खरंच यासाठी पात्र नाही, मी एक सर्व साधारण माणूस आहे. आज मी जे काही आहे ते माझ्या आई वडिलांची पुण्याई लोकांचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे.५० वर्षांचा इंडस्ट्रीमधला माझा हा प्रवास खरं तर म्हणूनच इतका रोचक आहे', इतकं साधं सरळ, मनाला भावणारं त्यांचं बोलणं... 'मला अजूनही विद्यार्थी व्हायला आवडेल. खूप काही शिकायचं आहे मला, जे राहिलंय'.. हा त्यांच्यात दडलेला विद्यार्थी पाहून खरंच कौतुक वाटतं.आपल्या आवडत्या कलाकाराला जेव्हा जवळून ऐकायची,बघायची संधी मिळते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने उमगतं हि व्यक्ती इतकी मोठी का आहे ते .. अमिताभ बच्चन ! बस नाम हि काफी है !! 

 

खरं तर या नावात, या व्यक्तिमत्वातच एक किमया आहे , जादू आहे. त्यांच नाव ऐकलं कि कित्येक चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा, त्यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांच्या ओळी आपसूकच ओठांवर येतात आणि त्यांचे गाजलेले संवाद सुद्धा ! घरातील तीन तीन पिढ्यांनी मिळून ज्याच्यावर भरभरून प्रेम केलं तेच हे नाव ! आजही त्यांच्या आवाजात 'मधुशालाऐकतांना किंवा 'ये कहाँ गये हम' या गाण्यातील संवाद त्यांच्या खास अंदाजात ऐकतांना जे वाटतं ते फक्त अनुभवता येतं, व्यक्त करता येत नाही ... 

 

सिंबायोसिस मध्ये वर्षातून एकदा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून येणाऱ्या आमच्या या सिनियर प्रोफेसरच्या तासाला दर वर्षी झाडून सगळे उपस्थित असतात कारण प्रत्येक वेळी त्यांना प्रत्यक्ष ऐकणं हा एक विलक्षण सोहळा असतो आमच्यासाठी

 

'बदलत्या काळानुसार आपण बदलत राहावं', हे सांगताना ते म्हणाले, 'एक काळ असा होता कि माँ बाबूजी सांगायचे, 'जब बडे घर में हो तो छोटोंको चूप  रेहना चाहिये, बीच में बोलना नहीं चाहिये'. जे आजवर ऐकलं. आई वडिलांची शिकवण होती मोठ्यांच ऐकलं पाहिजे, जी जपली. आजकालची  पिढी म्हणते 'आमची सुद्धा काही मतं आहेत आणि ती आम्हाला मांडायची आहेत'आणि त्यांचं म्हणणं बरोबर सुद्धा आहे, आता काळ बदलला आहे'..

 

बाबूजींची आठवण निघताच त्यांना ते शाळेत असताना घडलेला एक प्रसंग आठवला. शाळेत एका वर्षी त्यांना 'बेस्ट ऍक्टर' हे बक्षीस मिळालं होतं. पुढच्या वर्षी सुद्धा त्यांनी खूप उत्साहाने नाटकांत भाग घेतला. जोश तर होताच आणि परत बक्षिस मिळवायची इच्छा सुद्धा.परंतु नेमक्या स्पर्धेच्या आदल्या दिवशी त्यांना कांजिण्या आल्या. त्यामुळे ऐनवेळी नाटकात काम करण्याची परवानगी मिळाली नाही. तेव्हा ते हॉस्टेल मध्ये राहायचे. माँ आणि बाबूजी या नाटकासाठी आवर्जून आले होते. 'स्पर्धेच्या दिवशी ते माझ्या खोलीत माझ्यासोबत बसून होते. माझं हॉस्टेल एका लहानशा टेकडीवर होतं आणि स्पर्धेची जागा समोरील मैदानांत. माझ्या खोलीत नाटकाचा सर्व आवाज स्पष्ट ऐकू येत होता. त्या वेळी नाटकांत काम करता आलं नाही याचा मला त्रास होऊ नये या उद्देशाने बाबूजींनी मला गप्पांमध्ये रमवलं. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली कि "मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा क्यो कि फिर वो ईश्वर कि इच्छा है और ईश्वर हमेशा आपका भला हि चाहेगा ".. या शिकवणीतून समजलं आपल्या इच्छेप्रमाणे झालं तरी ठीक,नाही झालं तरीही ठीक. आयुष्यात आलेल्या अनेक उतार चढावांच्या वेळी याच शब्दांनी धीर मिळाला'. 

 

ऑल इंडिया रेडिओने तुमचा आवाज नाकारला, आवाज जो तुमचा strong point आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ? या प्रश्नावर ते म्हणाले, 'मी आवाजावरती कधीच काम केलं नाही, त्यावर मेहनत घेतली नाही. ती मला मिळालेली देणगी आहे, माँ बाबुजींकडून... ऑल इंडिया रेडिओ वरती मी नोकरीसाठी अर्ज केला होता, न्युजरीडर म्हणून. तो एक प्रयत्न होता Science graduation नंतर नोकरी मिळवण्याचा. साधारण १९६२ सालची गोष्ट आहे. तेव्हा खूप कमी options असायचे, आजच्या सारखं नव्हतं. माहित नसायचं कुठे नोकरीकरिता अर्ज करायचा ते. कोणीतरी सांगितलं मला ऑल इंडिया रेडिओला अर्ज कर, मी केला. इंग्लिश करता rejection झालं मग कोणी म्हटल हिंदी करता प्रयत्न कर म्हणून हिंदीकरता प्रयत्न केला पण reject झालो. अर्थात इतक्या मोठया महत्वाच्या संस्थेमध्ये काम करण्यासाठी त्यांचे पण काही निकष होते आणि असायला सुद्धा पाहिजे.त्या वेळी खूप iconic आवाज होते. असाच आवाज होता मेलविल डिमेलो यांचा. त्यांच्यासारखा आवाज असतांना तुम्ही कशी कल्पना करू शकता कि तुमची निवड होईल म्हणून.तुम्ही कशी तुलना करणार त्या आवाजाशी आणि स्पर्धा हि .. काय बेहतरीन आवाज होते तेव्हा रेडिओ वरती, एक से एक. मी मात्र त्या निकषांमध्ये बसलो नाही'. 

 

'मी सायन्स पदवीधर आहे पण आज सायन्स मधलं काहीही आठवत नाहीये पण त्या काळी पदवीधर  होणं खुप महत्वाचं होतं. ते झालो, मग नोकरी मिळत नव्हती. आम्ही मित्र रोज भेटायचो. गप्पा मारायचो. एकदा एक मित्र म्हणाला, 'मुझे प्रॉब्लेम क्या है ये समझ में आया है, हमारे माता पिता ने हमे पैदा ही क्यो किया ? यहि है प्रॉब्लेम ,पैदा नही किया होता तो ये मुश्किल ना आती'.  मला त्याचं म्हणणं एकदम पटलं. मी घरी आलो आणि तडक बाबूजींच्या स्टडी मध्ये गेलो. 'बाबूजी आपने हमे पैदा क्यो किया' ? ते पहिल्यांदा आणि शेवटचं होतं, तशा पद्धतीने त्यांच्या स्टडी मध्ये माझं जाणं. त्यानंतर तिथे एक शांतता पसरली. बाबूजी रोज सकाळी चालायला जायचे, पहाटे चार वाजता. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो तर माझ्या उशाशी एक कागद होता, लिहिलेला. त्यावर बाबूजींनी एक कविता लिहिली होती

 

"जिंदगी और जमाने कि कश्मकश से घबराकर मेरे बेटे मुझसे पुछ ते है, के हमे पैदा क्यो किया था ? और मेरे पास इसके सीवा कोई जवाब नहि कि मेरे बाप ने भी बिना पुछे मुझे क्यो पैदा किया था ?और उनके बाप ने बिना पूछे उन्हे और उनके दादा ने बिना पूछे उन्हे.. जिंदगी और जमाने कि कश्मकश  पेहेले भी थी, आज भी है और कल भी होगी.. तुम हि नयी लीख रखना, अपने बेटोसे पुछ के उन्हे पैदा करना" ... काय सुरेख दिवस होते ते' !

 

बाबूजींची अजून एक आठवण सांगताना ते म्हणाले,'बाबूजी उनके आखिरी दिनो में हरदिन शाम को drawing रूम मे एक फिल्म देखते. मुझे आश्चर्य होता कि हर दिन ये फ़िल्म क्यो देखते है ? इसलीये एक दिन मैने उन्हे पूछा, 'आप हरदिन फिल्म क्यो देखते है' ? तब बाबूजीने कहा, "ये तीन घंटो में एक poetic justice मिलता है जो हमे हमारी पुरी जिंदगी में भी नही मिल सकता, perhaps in several life times but in Hindi movies you will get poetic justice"..  

 

बाबुजी आणि त्यांच्या कविता यांबद्दल विचारता ते म्हणाले, 'कोणत्याही कवितेत जेव्हा आपण स्वतःला बघू शकतो तेव्हाच ती कविता महान होते'. 'है अंधेरी रात पर दिवा जलाना कब मना है' या स्वर्गीय हरिवंशराय बच्चन यांच्या काव्यपंक्ती मागील भावना उलगडतांना ते म्हणाले, 'जो उजडा हुआ है, बिखरा हुआ है उसको फिर से वापस लाना कब मना है' ..आजूबाजूला अंधकार असतांना आपण आपला रस्ता शोधायला हवा. हि कविता लिहितांना त्यांच्या मनात नक्की काय होतं हे माहित नाही पण त्यांच आत्मचरित्र वाचल्यावर या कवितेच्या ओळी लिहितांना त्यांच्या मनांत काय असेल हा अंदाज मी बांधला. माझ्या वडिलांच्या पहिल्या बायकोचे लग्नानंतर एका वर्षातच अतिशय वेदनादायी आजारानंतर निधन झाले. त्यांना टीबी झाला होता. वडील तेव्हा शिकवणी घ्यायचे. / मैल चालत जाऊन त्या शिकवणीतून महिना कधी २५ तर कधी जास्तीत जास्त १०० रुपये त्यांना मिळायचे. या दुःखद घटनेनंतर त्यांनी खूप दुःखी कविता लिहिल्या. पुढील तीन चार वर्ष त्यांनी प्रचंड औदासिन्य वातावरणांत घालवली. पुढे एका जवळच्या मित्राच्या घरी ते आईला पहिल्यांदा भेटले, तिच्याशी त्यांची तिथे ओळख झाली, जिथे त्यांनी तिला पहिल्यांदाच पाहिलं होतं. मला वाटतं त्या वेळी त्यांच्या त्या मानसिक स्थितीमध्ये आईचं असं भेटणं त्यांच्यासाठी एक हळुवार घटना होती, जणू आजूबाजूला पसरलेल्या अंधःकारात त्यांच्यासाठी तोच एक दिवा होता, प्रेरणा होती...   

 

आजच्या जमान्यातील social media बद्दल ते म्हणाले, 'आपल्या समाजात मीडिया हा चौथा आणि Social Media हा पाचवा pillar आहे असं मला वाटत. It's wonderful to be there..  In life you have to be prepared for abuse because otherwise how will you know that you are wrong, how you will understand what is right ? how you will improve yourself otherwise'. असं म्हणून एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी सर्वांसमोर उलगडून दाखवला

 

१९७५ मधला अँग्री यंग मॅन ते ब्लॅक, पा, पिंक, चिनी कम, पिकू पर्यंत झालेलं ते सहज परिवर्तन आणि या यशामागील गुपित जाणून घेतांना ते म्हणाले, 'माध्यमं सतत बदलत राहिली अखंडपणे.. तो माझ्यातील बदल नव्हता. अँग्री यंग मॅन मी नव्हतो तर ती एक व्यक्तिरेखा होती, दिग्दर्शकाने साकारलेली. लेखकाने गोष्ट लिहिली, संवाद लिहिले, त्याने त्याच्या गोष्टीतील जागा सुचवली, त्याच्या गोष्टीतील माणसं कशी आहेत हे सांगितलं. आम्ही दिग्दर्शकाचं फक्त ऐकलं, चेहऱ्यावर कोणते भाव हवेत हे पण त्यानेच सांगितलं त्यामुळे हे सर्व श्रेय त्यांच आहे. वयाप्रमाणे येणाऱ्या भूमिका बदलत गेल्या  इतकंच. आजही KBC चा भाग बघतांना मी टिपत असतो, माझं काय चुकलंय, काय सुधारणा करायला हवी. तरंच आपलं सर्वोत्कृष्ट आपण देऊ शकतो, जो प्रयत्न मी करतो'...

 

आपल्या भूमिकांपैकी त्यांनी दोन व्यक्तीरेखांचा आवर्जून उल्लेख केला. Black चित्रपटातील शिक्षक. एका दिव्यांग म्हणजेच देवता मुलीची गोष्ट पडद्यावर साकारताना तिचा शिक्षक तिला प्रेरित करतो. त्या शिक्षकानं तिच्यात जागा केलेला आत्मविश्वास तिचं आयुष्य संपूर्णतः बदलून टाकतो. या चित्रपटाची गोष्ट सांगताना ते म्हणाले शिक्षकाचं ते रूप साकारणं हा एक हृदयस्पर्शी अनुभव होता

पिंक चित्रपटातील वकील साकारताना JUST ONE WORD, TWO ALPHABATES.. ‘No’.. BUT SO POWERFUL हे अनुभवणं आणि पोहचवणं अजिबात सोपं नव्हतं. मी खूपदा मोडून पडलो, व्यथित झालो.. शेवटच्या सीन मध्ये एक लेडी पोलीस ऑफिसर माझ्याशी हस्तांदोलन करते हा माझ्यासाठी सर्वात भावुक क्षण होता. असे अनेक अनुभव मला समृद्ध बनवत गेले

 

लहान पडद्याबाबत बोलतांना ते म्हणाले, 'KBC करतांना आजही काही विलक्षण अनुभव येतात. मुलीला आजही शिक्षणाकरता करावी  लागणारी धडपड पाहून मन व्यथित होतं. एका भागामध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या एका मुलीची त्यांना आठवण झाली. लग्न झाल्यावर शिक्षणाचा उपयोग नाही त्यापेक्षा घरकाम शिकलं पाहिजे या विचाराने एका मुलीला तिचे वडील वी वी नंतर शिक्षण सोडायला सांगतात. पण ती मुलगी हट्टाने शिक्षण पूर्ण करण्याकरता  तिच्या आजीकडे जाते. तिथेही तिला वाईट वागणूक मिळते तरीही ती आपलं शिक्षण नेटाने पूर्ण करते. पुढे तीच मुलगी KBC च्या हॉटसिट वर बसून २५ लाख जिंकते. या प्रसंगी तिला चेक देतांना मी विचारलं होतं , 'आता या चेकचं काय करणार' तेव्हा 'वापस जाकर, एक बेटी भी ये काम कर सकती है, ये में अपने पिताजी को बतायूंगी', असं ती म्हणाली होती जे मला निःशब्द करून गेलं.. आजही येणारे हे वेगळे अनुभव मला खूप काही देतं राहतात'..  

 

आपल्या चाहत्यांकरता त्यांच्या हृदयात एक खास जागा आहे. My extended family असं त्यांना संबोधताना कुली चित्रपटाच्या अपघातानंतर मिळालेलं चाहत्यांच प्रेम हे त्यांच्याकरता अमूल्य आहे. दर रविवारी त्यांची एक झलक पाहायला त्यांच्या घरासमोर एकत्र जमणारा हा चाहतावर्ग हेच त्यांचं वैभव आहे. जपान,रशिया, ब्राझील, फ्रान्स,अमेरिका, ऑस्ट्रेलिया,साऊथ आफ्रिका अशा जगाच्या कानाकोपऱ्यातून मिळणारं हे EXTENDED फॅमिलीचं प्रेम त्यांना समृद्ध करतं.पॅरिसला एका कार्यक्रमाकरता ओव्हरटाईम करून पैसे जमवून विमानाचे तिकीट काढून येणारी जवळपासच्या शहरातील एक नाही तर तब्बल तीस फॅन मंडळी आजही त्यांच्या गोष्टीतून डोकावत असतात.

 

आपण कोणत्याही संस्कृतीचं अंधानुकरण करण्याऐवजी आपली संस्कृती आपली भाषा जपण्याचा प्रयत्न आपणच केला पाहिजे हे सांगताना तुमच्या आयुष्यातील कोणता क्षण तुम्हाला परत जगावासा वाटेल हे विचारता 'हेच आयुष्य परत जगायला आवडेल' असं त्यांनी सांगितलं. देवानं तुमची कोणती इच्छा पूर्ण करावी असं विचारता 'गरिबी नाहीशी व्हावी कोणीही उपाशी राहू नाही', हेच मागणं मी  देवाकडे मागीन असं ते म्हणाले.

 

चॅरिटी असं काम आहे कि त्याबद्दल बोलणं बरोबर नाही तरीही त्या बद्दल विचारता त्यांनी त्यांचे काही अनुभव सांगितले.'एकदा विशाखापट्टमला एका शूटिंग करता गेलो असतांना एक बातमी वाचली, जवळपास दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. मी खूप कासावीस झालो. चौकशी केली आणि समजलं केवळ दहा, बारा, वीस हजार रुपयांच्या कर्जासाठी त्यांनी ती आत्महत्या केली होती. मी हादरलो. मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांचे कर्ज फेडले. त्यानंतर आत्महत्या या विचारापासून परावृत्त झालेल्या जवळपास 400 शेतकऱ्यांना मदत केली, त्यांच कर्ज फेडलं. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र राज्यातील हे शेतकरी होते. दिवाळखोरी काय असते हे मी जाणतो. पैसे नाहीत म्हणून तुम्ही घेतलेले पैसे परत करू शकत नाही कारण तुमच्या बँकेतच पैसे नसतात हे पचवणं, अनुभवणं खूप खूप त्रासदायक आहे. व्यवसायामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमधून मी एकदा बाहेर पडलोय आता मला परत तो अनुभव नकोय पण या परिस्थिती मधून जाणाऱ्यांना मला बाहेर काढायचं आहे. पुलवामा मधील हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना भेटल्यावर मी आतून हाललो. एक दोन वर्षाची त्यांची लहानगी मुलं परत आपल्या वडिलांचा चेहरा कधीच पाहू शकणार नाहीत ही कल्पनाच मला हतबल करून गेली. ज्या गरोदर वीरपत्नी होत्या त्यांचे चेहेरे मी विसरू शकलो नाही. त्यामुळे शक्य ते सगळं करायचं मी ठरवलं.

Lockdown मध्ये साधारण २००९ लोकांना मुंबई वरून आपापल्या गावी जायचं होत. शेवटच्या क्षणी राज्य सरकारनी गाड्या कॅन्सल केल्या.मग मी इंडिगो विमान सेवेची सहा विमानं बुक केली. प्रत्येक विमानात प्रत्येकी १८० / २०० लोकांना बसवून त्यांना पाटणा अलाहाबाद गोरखपूर इथे पाठवण्याची व्यवस्था केली. याच काळांत महिने जवळपास ५००० लोकांना दोन्ही वेळचं जेवण मिळेल इतकं सामान दिलं. तीन चार दिवस उपाशी असलेल्या त्या लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मी सुखावलो. मी एकट्यानेच नाही तर अनेक लोकांनी अशी मदत केली. आपल्याला जे शक्य आहे तो वाटा प्रत्येकाने उचलायला हवा'.. आजवर या महानायकाची ही बाजू कधीच दिसली नव्हती. बोलण्यापेक्षा कृतीतून व्यक्त होणं महत्वाचं हेच खरं..

 

दरवेळी कॅम्पस वर हे 'सर' आले कि त्यांची एक झलक पाहण्यासाठी धडपडणारी मुलं पाहतांना वाटायचं आजही किती भरभरून प्रेम करतात सर्व जण या कलाकारावर. त्यांना ऐकण्यासाठी आतुर असतात. त्यांनी प्रश्न विचारायची मुभा देताच त्यांना 'मधुशाला' म्हणायची विनंती करतात, 'दिवार' आणि 'डॉन' मधले संवाद म्हणायला सांगतात इतकंच काय तर 'एकदा तुमचा हात हातांत घ्यायचा आहे' असंही म्हणतात. या वेळी मात्र हि भेट virtual असल्यामुळे साहजिकच परस्पर संवादाला भरपूर वाव होता ज्यामुळे एक वेगळाच माहोल तयार झाला आणि त्यामुळेच या कलाकारामागे दडलेला खरा चेहरा सर्वांनाच अगदी स्पष्ट दिसला आणि मनापासून भावला !

 

- कविता