Friday, December 8, 2017

आठवण


आठवण

खूप वर्षांनी वही चाळताना
पानं निसटावी , तशी
मनांतून एकेक आठवण
हलकेच डोळ्यांत येऊन थांबली
अन् तू हरवला त्या वाटेवरती
तीच पावलं मला परत दिसली ..

चुकण्याआधी कळलंच नाही
सारे कधी धूसर झाले
रंग मोहाचे,अधीर स्पर्शाचे
कसे सारे विरून गेले ..
तरी चांदण्यांमधले विरघळलेले
क्षण एकेक जमवत गेली,
रातराणी तुझी माझी
पुन्हा पुन्हा बहरत गेली ....

'आपली भेट हिच कोजागिरी '
असं तूच म्हणायचास
आणि म्हणूनच अमावस्येचाही चंद्र
तेंव्हा मला खूप आवडायचा
आजही चांदण्यात तुझी आठवण
कागदावरती बोलत असते
प्रत्येक कवितेत अजूनही माझ्या
गोष्ट फक्त तुझीच असते ...