Thursday, December 15, 2016

एक प्रवास, आठवणीतला ....


आज बऱ्याच दिवसांनी रविवारची सकाळ निवांत होती.आम्हा दोघांना ऑफिसला आणि कांतेयला शाळेला सुट्टी, त्यामुळे बाबा कालच इकडे आले होते. या छान थंडीत, टेरेस मध्ये येणार कोवळ ऊन अंगावर घेत ; आमच्या चौघांच्या रंगलेल्या गप्पा आणि सोबत कांदे पोहे व मस्त वाफाळलेला आल्याचा चहा...सुट्टीच्या दिवसाची  एकदम परफेक्ट सुरवात.


बोलता बोलता सहज विषय निघाला आणि बाबांच्या जुन्या आठवणींमध्ये आम्ही सारेच रमलो. वयाच्या १९ व्या वर्षी बाबा भारतीय नौसेनेत कसे गेले इथपासून, तेव्हाची प्रवेश परीक्षा, सुरवातीचे प्रशिक्षण, वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग झाल्यावरती घरापासून दूर राहतानाचे अनुभव,पुण्यात NDA मध्ये असतानाच्या आठवणी, ६२ आणि ६५ च्या युद्धातील अविस्मरणीय क्षण,सिंगापूरला जाऊन त्यांनी घेतलेले सबमरीनचे प्रशिक्षण तसेच INS राजपूत , INS ब्रह्मपुत्रा , INS जमुना आणि INS विक्रांत या वेगवेगळ्या जहाजांवरचा अनोखा अनुभव आणि INS विक्रांत वर असलेल त्यांच विशेष प्रेम ... सार काही थक्क करणार.


१९६१ साली माल्टाला ( फ्रान्स / ब्रिटन ) भारतीय नौदलाची विशेष तुकडी पाठवण्यात आली होती. विक्रांत जहाजाची भारतीय नौदलाशी झालेली ती पहिली ओळख. तेथे ते जहाज कमीशन झाले म्हणजॆ आपल्या ताब्यात आले. नौदलाच्या त्याच तुकडीत बाबा होते. INS विक्रांत वरून माल्टा ते मुंबई हा त्यांनी केलेला विक्रांतवरचा पहिला अविस्मरणीय प्रवास......म्हणूनच आजही INS विक्रांतचे नाव काढताच भरून आलेल्या त्यांच्या डोळ्यांनी खूप काही सांगितल.आयुष्यात इतक्या सुंदर आठवणी बाबांना भारतीय नौसेनेने दिल्या.

तेव्हा काळाची गरज म्हणून कमावणं गरजेचं होत, कुळकायद्यात शेत जमीन गेलेली, नोकरी नाही, भावंडांत मोठं असल्याने कुटुंबाची जबाबदारी होती. अशा परिस्थितीत समोर दिसला एकच मार्ग.. अर्ज केला. परीक्षा दिली आणि निवड सुद्धा झाली. एका लहान गावातून अनवाणी निघालेला 'तो' नौदलात दाखलहि झाला. पहिल्याच दिवशी मिळाले तीन प्रकारचे युनिफॉर्म आणि प्रत्येक युनिफॉर्म बरोबर घालायचे वेगवेगळे बुटांचे तीन जोड .... ते पाहून 'त्याच्या' डोळ्यांत टचकन पाणी आलं. अनवाणी पायानी इथवर येऊन , जणू सर्व प्रश्नाची उत्तर 'त्याला' इथेच मिळाली. आता सोबत होती ती निळ्या आकाशाची , अथांग सागराची आणि त्या बोटींची. क्षितिजावर खूप सारी स्वप्न होती आणि मनात ती पूर्ण करण्याची धडपड. एक एक पाऊल पुढे टाकत खुप लांबचा पल्ला गाठला पण कधीही  सुरवात कोठून केली, हे 'तो' नाही विसरला.


योगायोगाने भारतीय नौसेना सप्ताह सुरु होता. NDA मध्ये बाबा १९५८ साली होते म्हणजेच आज ५८ वर्ष झाली होती NDA सोडून. काय हा योगायोग ...  हाच धागा पकडून आम्ही बाबांना त्याच जागी घेऊन जायचे ठरवले जिथे त्यांच्या आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी होत्या. घरापासून अर्ध्या तासाचे अंतर होते आणि त्या अर्ध्या तासांत बाबा मात्र अठ्ठावन्न वर्ष मागे पोहचले होते.


तेव्हाच चित्र आणि आजच चित्र यांत खूप बदल झाले होते आणि बाबा तेच बदल डोळ्यांत साठवत होते. त्यांच्या सारख्या इतक्या जुन्या ऑफिसर ला भेटायला साहजिकच तेथील काही ऑफिसर आले आणि पाहता पाहता काही क्षणात तेथील वातावरण एकदमच बदलून गेले.


शरीराने थकलेला जीव पण अजूनही तीच ऊर्जा , तोच अभिमान आणि तोच गर्व. एक एक्स ऑफिसर बोलत होता आणि बाकी ऑन ड्युटी ऑफिसर त्यांचं बोलणं ऐकत होते , प्रश्न विचारात होते. आज खऱ्या अर्थाने बाबा त्यांच्या 'फील्ड' वरती होते. त्या सर्वांचे हावभाव, बोलण्यातील जोश , चेहऱ्यावरचा आनंद मी डोळ्यांत साठवत होते. त्या सर्वांच्या गप्पा अशाच रंगत गेल्या. त्या काही वेळात बाबा जणू 'ते' आयुष्य परत जगले. अखेर निघायची वेळ झाली. सर्वांशी हस्तांदोलन करून बाबा निघाले. बाबांचा हात मी धरला होता , एवढ्यात एक क्षण थांबून बाबा मागे वळले आणि म्हणाले,'कभी जरुरत पडे तो बुला लेना,आ जायेंगे लढने ' तेव्हा मात्र तो ऑफिसर एक कडक सॅल्यूट मारून पुढे आला आणि त्यांना बिलगला. नि:शब्द होवून आम्ही फक्त पाहत होतो .
खूप विलक्षण, खूप वेगळा अनुभव होता.

आजच्या दिवसाने , बाबांसारख मला पण खूप काही दिल. नक्की काय, हे शब्दांत मांडता येण्याच्या खरंच पलीकडचं होत माझ्या करता आणि बाबांकरता सुद्धा !!