Wednesday, November 23, 2016

रोजची संध्याकाळ तितकीच ओढ लावणारी... आकाशातील रंगांची उधळण अन अस्ताला जाणारा तो सूर्य,  पश्चिमेला क्षितिजावर रंगणारा हा रंगांचा सोहळा... रोज त्याच उत्साहाने पाहत होते. सूर्यास्त पाहण्याच जणू वेड लागलं होत, हेच खरं...


सूर्यास्ताच्या त्या केशरी सोनेरी रंगात खूप काही दिसायचं....कधी तारुण्याचे ते दिवस, स्वप्नवत.... मन  फुलपाखरू  होतं जणू... . ना कोणती काळजी , ना कोणता व्याप ;  आपल्याच रंगांत रंगलेल, आयुष्याची स्वप्न रंगवण्यात हरवलेल..  मग हळूहळू दिवस सरले व उडणार मन जमिनीवर आलं. आयुष्याने अनेक रंग हलकेच उलगडून दाखवले... आणि आता या वळणावर ; त्या सूर्याला अस्ताला जाताना पाहून , हातून काहीतरी निसटतंय याची चूटपूट लागली.


निम्मं गेलं आणि निम्मं उरलं, या जाणीवेने मन थोड हळवं झाल. वाटल ... निसटत चाललेल्या या क्षणांत अजून खूप काही मिळवावं ... पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात पोटभर फिरावं, हिरवे डोंगर चढावे, वाफाळलेल्या कॉफी सोबत रात्रभर गप्पांची मैफल सजवावी, लॉन्ग ड्राईव्हला जावं , गाण म्हणाव, स्वच्छ निरभ्र आकाशा सारख खळखळून हसावं, समुद्रकिनारी वाळूत दूरवर अनवाणी चालत राहावं , डोळे मिटून आपलं आवडत गाणं ऐकत सार सार विसरून जावं, मनसोक्त रडावं , एकटेपण सुद्धा अगदी भरभरून जगावं, स्वतः वरती प्रेम करावं, अगदी स्वछंद जगावं .....


उरलेल्या आयुष्याबद्दलच चित्र अजूनच साफ होत गेलं. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते.  रोजच्या काल पेक्षा आज किती सुंदर आणि वेगळा साजरा होईल, हे पाहणच महत्वाचं....


शेवटी काय....  तर आपल्या आयुष्याच्या कॅनवास वरती कोणते आणि किती रंग भरायचे, हे आपणच ठरवायला हवं .....







Saturday, November 19, 2016

आयुष्य


मी नव्याने आज मजला,
थांबून थोडे पाहिले
काय हरवले, काय गवसले
हे हिशोब काही मांडले


कधी मनातले ना सांगू शकले,
परी नजरेतून ते जाणले
काही अशा सोबतीत अवघे,
आयुष्य सोपे जाहले


कधी अडखळले , कधी धडपडले
कधी वाटले, सारे संपले
त्या वळणावर, त्या टोकावर
मग अवचित कोणी भेटले ...


अनूभवाने ठोकून ठोकून,
सुंदर पैलू पाडले
मुखवटा चढवून, जगणाऱ्यांना
जवळून काल मी पाहिले


उरल्या सुंदर नात्यांचे मग
अलवार बहरले ताटवे
गंधाळूनि मग अवघे गेले
आयुष्य माझे आज हे .....

Friday, November 18, 2016

एकटा ..


शब्द सारे संपले ते , फक्त उरल्या जाणीवा
    सांजवेळी या किनारी , उरलो आतां एकटा .... 

Thursday, November 17, 2016


व्हेंटिलेटर


सिनेमाच्या निमित्ताने परत एकदा या शब्दाची भेट झाली. दोन वर्षांपूर्वी आयुष्यात पहिल्यांदा भेटलेला हाच तो व्हेंटिलेटर. लाईफ सपोर्ट सिस्टिम एवढाच काय तो त्यावेळी समजलेला अर्थ .. पण नंतर वाटलं , आजच मरण उद्यावर ढकलणार एक साधनच ते. अगदी जवळच्या माणसाला व्हेंटिलेटर वर पाहणं , यासारखं दुर्दैव नाही.


काय गंमत आहे पहा, एकीकडे या हॉस्पिटलमध्ये आपली व्हेंटिलेटर शी नव्याने ओळख होते आणि दुसरीकडे आपल्याच जुन्या माणसांची परत नव्याने भेट घडते.. होत राहते ... रोजच.


आपलं कर्तव्य ओळखून दिवस रात्र पेशंटची सेवा करणारे डॉक्टर, नर्स हे लोक एकीकडे आणि फक्त रीत म्हणून भेटायला येणारे दुसरीकडे. बरं , ते आधार द्यायला येतात कि आधार जाणार याची जाणीव करून द्यायला , हेच समजत नाही. खरं तर तेव्हा प्रेमाचा एक हात हवा असतो , जे आपल्या हातात नाही ; तरीही त्यासाठी त्या वरच्याशी भांडायला आधार हवा असतो , डोक्यावर हात ठेवून बोलणारा प्रेमाचा एक शब्द हवा असतो ....


सर्व छान असतांना कधीही भेटायला न येणारे , हक्कानी चौकशीचा कधी एक फोन न करणारे चेहरे मग अचानक आजूबाजूला दिसू लागतात अन् तेंव्हा जीव गुदमरू लागतो. अशा वेळी न सांगता आपलं मन ओळखणारे , पाठीवर प्रेमाने हात ठेवणारे, काहीही न बोलता आपला हात घट्ट धरणारे काही हात आपल्यासाठी व्हेंटिलेटर होतात.


पेशंटचा व्हेंटिलेटर काढायचा कि नाही हा प्रश्न शेवटी डॉक्टर विचारतात आणि तो कर्ता करविता सारेच प्रश्न संपवतो. एक दोन दिवस होत नाहीत तर 'पुढची कार्य ' हा चर्चेचा विषय कानावर आदळतो आणि परत त्याचा श्वास अडकतो. अरे जो गेलाय ते दुःख आधी स्वीकारू तर द्या , मोडलेल्या माणसांना सावरणं महत्वाचं कि हे बोलणं. ज्याच्यावर वेळ येते तोच फक्त कोसळलेला बाकीचे फक्त व्यवहाराने चालणारे. बरं , थोड्या रूढी परंपरा सोडू म्हटलं तर त्यावरून वादंग; अरे ज्या कुटुंबाला फरक पडलाय त्याला ठरवू द्या ना , तुम्ही का विडा उचलता .. तुम्हाला फरक पडलाय का ? नाही ना , नाहीतर 'ती' बातमी मिळाल्यावर आधी जेवून मग नसता आलात हॉस्पिटलात आणि हो काल कुठल्याशा प्रदर्शनात जावून जी खरेदी केली तुम्ही , ते चाललं का तुम्हाला या सुतकात ... अरे किती खोटं जगाल.


कर्तव्य विसरायचं आणि वेळ आली कि हक्काची मागणी करायची , बहुतांश घरात दिसणार एक विदारक सत्य. आयुष्य किती अमूल्य आहे , अस्थिर आहे ते जवळच्या माणसाला जाताना पाहून समजत, पण म्हणून काय तो अनुभव येईपर्यंत वाट पहायची ? तो खोटा अहम आधीच नाही का सोडू शकत आपण. किती आणि कसं जगलोय असा विचार करतांना किती उरलय हे पण तर पाहायला नको का ? मोकळ्या मनानं नात्यांच्या या दुनियेत एक पाऊल पुढे टाकलं , तर आपण काही लहान नाही होणार हे कधी समजणार आपल्याला ?


पण एक बरं झाल, या चित्रपटाच्या निमिताने का होईना आपल्या नात्यांचा विचार तर काहीजण करू लागले. आणि हो अजून इतका वेळ आहे आपल्याकडे ; जे या आधी करायचं राहिलं ते आतां करायला .. एक प्रेमाची मिठी मारायला , हक्कानं काही द्यायला काही घ्यायला , मनापासून माफी मागायला , झालं गेलं विसरून जायला , परत एकदा एकत्र यायला ... कधीही न उलगडलेले नात्यांचे धागे या निमित्ताने उलगडण्याचा प्रयत्न करायला.


कदाचित यामुळे जर कधी आपण व्हेंटिलेटर वर गेलो तर त्यावेळी आपल्या नात्यांना कुठल्याच व्हेंटीलेटरची गरज भासणार नाही , हे नक्कि .......

Saturday, November 5, 2016

मैफिल


सारं जग उजळून गेल आणि मनातले काही अंधारे कोपरे,  आज जरा जास्तच सलू लागले. आयुष्यातली ती रिकामी जागा अन् मनांत न मावणाऱ्या असंख्य आठवणी. एखादी मैफिल संपूच नये असं वाटत असताना संपते अन मनाला चूटपूट लावून जाते. पण काही स्वर आणि शब्द मात्र मनातच रेंगाळतात तसच काहीस...


तिन्हीसांजा झगमगणारे आकाश दिवे, दिपमाळा, रांगोळ्या, मातीचे किल्ले, त्यावरची चित्रे, फटाक्यांची आतिशबाजी.... एकीकडे रंगांच्या आणि दिव्यांच्या प्रकाशात सारा आसमंत न्हाऊन गेला होता तर दुसरीकडे सारा काळोख, इथे दाटला होता, माझ्या मनांत.


सकाळची तिची चाललेली लगबग, ती खमंग फराळाची तयारी, दारासमोर तिने लावलेली दिवाळीची पहिली पणती, उटणं-तेल वाटीत काढून , पाट रांगोळी सजवून , गरम पाण्याची तयारी होताच आपल्याला गाढ झोपेतून उठवणारी आपली 'आई'. घराघरांतून दिसणार हे दिवाळीच चित्रं. पण माझ्या या चित्रातून मात्र, ती केव्हाच  हरवली होती, आकाशातील त्या लक्ष लक्ष चांदण्यात.


'बोले अखेरचे तो, आलो इथे रिकामा ; सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे '... आरती प्रभूंच्या या ओळींप्रमाणेच या बहरलेल्या बागेतून ती मात्र गेली होती ... कायमचीच .


आता मागे उरल्या होत्या फक्त तिच्या आठवणी. या शब्द नि:शब्द किनाऱ्यावरती आता कोणाचीही सोबत नको होती. दिवाळीच्या पणत्यांच्या त्या मंद प्रकाशात, त्या पोरकेपणाच्या जाणीवेने डोळे मिटताच या मैफिलीत मला एकच गाणं ऐकू येतं होत  .... ग्रेस याचे शब्द आणि हृदयनाथजींचा आवाज...
'ती गेली तेंव्हा रिमझिम , पाऊस निनादत होता ....... '