आलूपराठा
'आज जेवायला आलू पराठा बनवू का ?' या प्रश्नावर "हो आई, कर आलू पराठा".. या काही क्षणानंतर आलेल्या कांतेयच्या उत्तराने डोळ्यांत पाणी आलं . आज जवळपास वर्षानंतर आलू पराठा बनवायला तो हो म्हणाला होता आणि मी मात्र त्याच्या उत्तरानी थोडी अस्वस्थ आणि थोडी खुश ही झाले.
'आजी आणि आलूपराठा' या समीकरणातून कांतेयची आजी वर्षापूर्वी हरवली होती. कळायला लागल्यापासून आजीने 'काय बनवू' अस विचारल कि 'आलू पराठा' हे उत्तर ठरलेलं. कांतेय येणार म्हटल्यावर सकाळी उठल्या उठल्या आजीने कुकरला बटाटे उकडायला लावले कि आजोबा, मामा, मामी पासून काम करणाऱ्या रेणू आणि शांताला पण समजायच कि आज कोणाची स्वारी येणार आहे ते.
कांतेयची आजी होती अगदी सुगरण. जो पदार्थ करेल तो अगदी जीव ओतून बनवायची आणि एक खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळी पदार्थाची चव पण अगदी तीच.. नारळ घालून केलेला रव्याचा लाडू असो , नारळाची बर्फी , पुरणाची पोळी, कडबू, खव्याच्या साटोऱ्या , गव्हाची खीर, वांग्याची भाजी अथवा साधा आमटी भात.. खरं तर याच चवीनं तिनं माणसं जोडली. त्या काळी जेव्हा तिने संसाराला सुरवात केली तेव्हा तिच्याकडे ना पैसा होता ना कोणाची कुठली मदत. पण जे काही होत त्यात समाधान होतं, सुख होतं ,आनंद होता आणि बहुदा तेच तिच्या हातात झिरपलं होतं आणि म्हणूनच तिच्या हाताला चव होती.
साधारण वर्षापूर्वी सार सार सुटलं. ती गेली आणि सोबत ती चवही. आई, बायको, सासू या अलवार नात्यांमध्ये तिची रिकामी झालेली जागा कालांतराने आम्ही स्वीकारली होती पण "आजी" म्हणून कांतेय साठी ती रिकामी जागा अजूनही त्याला अस्वस्थ करत होती. तिचं अस अचानक नाहीस होणं त्याला पचत नव्हतं. तो लहान निरागस जीव ' आजी इज नो मोअर' याचा अर्थ अजूनही शोधतच होता.
कालपर्यंत तिच्या मांडीवर खेळलो,तिची अंगाई ऐकून झोपलो,तिचं बोट धरून चालायला शिकलो,जिने आजवर चिऊकाऊच्या गोष्टी सांगत भरवलं ती आजी बरं नाही म्हणून हॉस्पिटल मध्ये का असेना पण होती आणि आज अचानक नाही .. या असण्यानसण्यातला फरक समजायला तो खूपच लहान होता. आजीला शोधता शोधता जणू तोच हरवला होता.
'येणारा प्रत्येक माणूस कधीतरी जातो' हा विचार त्याला अस्वस्थ करत होता. माझी आई गेली होती आणि ज्याची मी आई आहे त्याला मात्र , त्याच्या आयुष्यातून मी कधीतरी जाईन या भीतीने ग्रासले होते. माझ्यासाठी तो खूपच हळवा झाला होता , मला जपू लागला होता.
हळूहळू दिवस जात होते. आजी-आबा या जोडशब्दातून हरवलेल्या आजीमुळे आबांना टाळणारा कांतेय आता त्यांना चालताना आधारासाठी हात देत होता. माझ्या चेहऱ्यावरून माझ्या मनाचा अंदाज घेत 'तुला आजीची आठवण येत असेल तर मला सांगू शकतेस तू ' असं म्हणायचा. त्या इवल्या डोळ्यांत दिसणारी ती सोबत पाहून वाटायचं आई गेली , पण जाताना मलाच नाही तर याला पण मोठ करून गेली.
आज आलू पराठा खाताना 'आजी सारखा नाही झालाय पराठा 'असं त्याने म्हणताच त्या डोळ्यांत दिसलेल्या त्या मिश्किल हसण्यात मला मात्र सार काही मिळालं होत....