Tuesday, October 27, 2015

क्षितिजावरती रंग निळे हे,
मनास स्मरले काही 
तुला न कळली कधीच का रे,
मनातली हि गाणी

तुझ्याचसाठी सजली अवघी,
बकुळ फुलांनी वाट 
परि न कळली तुला अनामिक,
गंधामधली ओढ 

शुभ्र चांदणे नभी पसरले,
आतुर होई रात 
रजनीगंधा जणू बहरली 
कशी न कळली प्रीत  !!!


Saturday, October 24, 2015

                     निळी सावळी रात

मन अलगत हरवत जाते, बहरांत फुलांच्या रानी 
अलवार गीत हे सजले, या धुंद चांदण्या राती 

कधी उनाड होई वारा, या टिपूर निळ्या रातीत 
मग वेड़ लावूनी जाई, तो रातराणीचा गंध 

ती दवांत भिजुनी येई, मग अलगत गोड पहाट 
पारिजात शुभ्र हा नटला, घालून सडा दारांत 

क्षितिजावर हलके येई, मग स्वप्नामधुनी जाग 
मोगऱ्यात हरवून जाई, ती निळी सावळी रात !!!

Friday, October 23, 2015

अवेळीच सांजावल्या या दिशा रे,
             मैफिलीत रुसले तुझे गीत का रे 
मनातले काहूर कसे शांत व्हावे,
             काळजात रुतलेले तुजला कळावे  !!