Sunday, June 28, 2015

' पहिला पाऊस '

हिरव्या ऋतूत पहिल्या सरींत
मन चिंब ओले,
गंधाळल्या रोमांचित अवघ्या
क्षणांत भिजले 

थेंबात बरसले मोती अवखळ
शुभ्र सरींचे,
अलवार दाटले मनात सोहळे
आज स्मृतींचे 

निळ्या सावळ्या अवकाशी मग
कान्हा आला,
सतरंगांचा शेला मागे
ठेवून गेला …

Monday, June 15, 2015

' कृष्ण किनारा '

ती सांज निळाई ल्याली,
तो कृष्ण किनारी आलां
या कातरवेळी अवचित,
तो स्पर्श शहारून गेलां

बासरीत हरवून गेले,
क्षितिजावर क्षण ते काही
नि:शब्द सावळ्या राती,
डोळ्यांत दाटले पाणी

मी उरले ना मग माझी,
त्याचीच होवूनी गेले
रंगात रंगुनी त्याच्या,
रितेपण संपून गेले

काठावर कालिंदीच्या,
ती सरून गेली रात
डोळ्यांत ठेवूनी गेला,
सावळा रंग तो शाम …