Friday, March 7, 2014

' आधार '

सुरात मी बद्ध  केले
   गीत ते समजून घे 
डोळ्यात माझ्या थांबले ते 
   भाव तू उमजून घे 

मी कळ्यांचे स्वप्न न्याले 
   भास ते सारे खरे 
उमलत्या स्वप्नास माझ्या 
    एक तू आधार दे  !
' मी '

शब्दांना माझ्या अर्थ तुझा आहे 
श्वास माझे अन गीत तुझे आहे 

स्पंदने हृदह्याची तुझ्या नावे रुजू आहेत 
ओठावरील हसणे अन आठवणी भेटींच्या आहेत 

जीवनाच्या कित्येक वाटा दिशा फक्त तुझी आहे 
तुझ्याशिवाय "मी" पणाला अर्थ बाकी शून्य आहे  !!

' बंध '

ना जाणिले कधी तू ,
मनात काय होते 
हे श्वास गुंतलेले,
प्रेमात तुझ्या होते 


हे नाते तुझे नि माझे, 
विरुनी धुक्यात गेले 
हे बंध रेशमाचे,
अबोल सांग का झाले  !!


' शब्दात आज सारे सांगायला हवे का '


शब्दात आज सारे  सांगायला हवे का,
    जपले मनात गाणे छेडायला हवे का…

भेटीतल्या क्षणांची झाली फुले सुगंधी,
   आज त्या कळ्यांनी उमलायला हवे का,
      शब्दात आज सारे सांगायला हवे का

सहवास अमृताचा भिजवी क्षणाक्षणाला,
   आषाढ मेघ आता बरसायला हवे का,
      शब्दात आज सारे सांगायला हवे का  !!
      
' फितूर झाली आर्जवे '


गुणगुणावे गीत नव्याने,
  थांब तू रे थांब ना
श्वास होती आज वेडे,
  स्पर्श तू हा ऐक ना…

सावरू दे जाणीवा अन,
  पुन्हा नव्याने गुंतणे
स्पंदने बेभान होता,
  फितूर झाली आर्जवे…

खेळ हा कालचा तरी,
  आज वाटे का नवा
हात माझा सोडूनी तू,
   आजही का एकटा  !!
' आठवण '

आठवण झाली कधी तर डोळे मिटून घ्यावेत,
    खूप मागे हरवले ते क्षण टिपून घ्यावेत…

आठवण झाली कधी तर पहाटवारा व्हावं,
    बेधुंद क्षणात गुंतून फक्त गात रहावं…

आठवण झाली कधी तर स्वप्नामधे यावं,
    हात हाती घेऊन फक्त चालत रहावं…

आठवण झाली कधी तर वाटे एक अश्रू व्हावं,
    अन डोळ्यातून वाहतांना थोड तुझ्यासोबत रहावं  … 

' आस '

आतूर आहे आज हि,
  गुंतण्यास जीव हा
    चांदणे टिपूर होतां,
      लाजल्या या जाणीवा !

चालणे हे एकटे अन्
  आस वेडी सोबती
     आज वाटे का नव्याने,
       परतून येशी तू कधी … 
' नशा '

धुंद वारा साद घाली
   अंतरी पडसाद हा,
सावळे हे मेघ येता
   आवेग वाटे का नवा… 

वादळाचा वेग घेई,
   अंतरीची भावना
पावसाचे गुज सांगे,
   थांब तू रे थांब ना… 

हा दुरावा संपला अन्
   स्पर्श होई बोलका,
आज वाटे का मनाला
   भास आहे हि नशा !!
' एकटी वाट ' 

पहाटवारा आजही,
तसाच आहे बेधुंद
पाकळीवरच्या दवामधे,
पाहतोय तुझ प्रतिबिंब 

आजही हि संध्याकाळ,
आहे अशीच सजलेली 
रातराणीच्या स्पर्शात,
चांदण्यांनी बहरलेली 

आजही ही वाट,
आहे एकटीच थकलेली 
तुला शोधता शोधता,
स्वतः च हरवलेली  !!


' तू '

आभास होता चांदण्यांचा,
भास तुझे सारे खरे
तू नसता आजही,
भास अगतिक बोलके …

हातात आहे आज हि,
सोडलेला हात तू
स्वप्नांच्या गावामध्ये,
भेटलेला एक तू   !!

वेडी सांज 

बेहोष वारा थांब सांगे सांज हि वेडावली,
   आर्जवी तो मेघ आता आस वेडी जागली…

चांदण्यांनी रात सजली रातराणी साक्षीला,
   त्या क्षणांना वेचताना स्पंदने का लाजली …

डोळ्यात वेड्या थांबले अन शब्द सांरे गोठले
   भावनांचा स्पर्श होता अश्रूंत सांरे सांडले !!
रात्र अजूनी एकटी 

तीच रात तोच चंद्र
       तेच चांदणे नभी 
तेच गीत तेच शब्द
       सूर तेच आजही

तोच स्पर्श तोच भास
       रातराणी बहरली 
तीच प्रीत तीच वाट
       रात्र अजूनी एकटी   !!

चुकलेली वाट  


गर्द राई
  स्पर्श खुले
    सांज निळी
      वाट चुके

साथ हि
  आज हि
    पावलांनी
      चालते

शांत या
  स्वप्नात वेड्या
     गुज फक्त
        आपले …